BEST Bus Mumbai
BEST Bus Mumbai Tendernama
मुंबई

गुड न्यूज! मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार नव्या कोऱ्या 2 हजार बसेस

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईकरांच्या सेवेत बेस्टच्या (BEST) आणखी दोन हजार बसगाड्या दाखल होणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या (MMRDA) नुकत्याच झालेल्या बैठकीत या बसगाड्यांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली. त्यासाठी टेंडर (Tender) आणि इतर प्रक्रियाही लवकरच राबविण्यात येणार आहे.

मुंबईकरांच्या सेवेत सध्या ३,६७९ हून अधिक बसगाड्या असून, साध्या बसबरोबरच मिनी, मिडी आणि वातानुकूलित मोठ्या आकाराच्या बसचा त्यात समावेश आहे. उपक्रमाने येत्या काही वर्षांत बेस्टच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या दहा हजारपर्यंत वाढविण्याचे उद्धिष्ट निश्चित केले आहे. लवकरच ताफ्यात दुमजली वातानुकूलित बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे. वातानुकूलित बस ऑक्टोबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होती. मात्र या बसची पुण्यात चाचणी सुरू असल्याने सेवेत दाखल होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

आता आणखी २ हजार बसगाड्या ताफ्यात दाखल करण्यासाठी आवश्यक नव्या परवान्यास मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे भविष्यात मुंबईकरांच्या सेवेत आणखी बस धावतील आणि प्रवाशांचा प्रवास सुकर होईल. बेस्टच्या ताफ्यातील बसची संख्या वाढविण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाकडून परवाना मिळविणे आवश्यक असते.

प्राधिकरणाने नवीन दोन हजार बसगाड्या चालवण्याच्या परवान्यास मंजुरी दिली आहे. मात्र नेमक्या कोणत्या प्रकारच्या बस सेवेत दाखल करणे योग्य ठरेल याबाबतचा निर्णय बेस्ट उपक्रम घेणार आहे. त्यासाठी टेंडर आणि इतर प्रक्रियाही लवकरच उपक्रमाकडून राबविण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी दिली.