मुंबई (Mumbai) : बीडीडी चाळींच्या पुनर्विसाची (BDD Chawl Redevelopment) कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी तेथील रहिवाशांना ऍडव्हान्स भाडे देऊन त्यांचे तातडीने स्थलांतर करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी दिले. बीडीडी चाळींचा पुनर्विकास आणि अन्य संबंधित मुद्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पांतर्गत एकूण 195 चाळींच्या जागी 15 हजार 593 सदनिका निर्माण होणार आहेत. वरळी बीडीडी चाळींच्या जागी काम सुरू झाले असून, नायगाव येथील चाळींचे काम जानेवारीपासून सुरू होत आहे, अशी माहिती देण्यात आली. बैठकीला गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर आदी अधिकारी उपस्थित होते.
बीडीडी चाळींचा पुनर्विकास विहित कालावधी ठरवून त्यात पूर्ण करण्यात यावा, कोविड काळात ताब्यात घेण्यात आलेल्या इमारती त्वरित रिकाम्या कराव्यात, पात्रतेचे विषय तातडीने निकाली काढावेत, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची कामे, कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकास यांच्या सद्यस्थितीबाबत सादरीकरणही करण्यात आले.
राज्यातील पोलिस ठाणी आणि पोलिस निवासस्थानांची कामेही वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला दिले. या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाची बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी पोलिसांच्या निवासस्थानांच्या बांधकामांसंदर्भात आढावा घेण्यात आला. पोलिस ठाण्याच्या ठिकाणीच जागा उपलब्ध असेल तर त्या जागेवरच निवासस्थाने बांधली जावीत, अशा सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या. बांधकामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. जिह्याच्या ठिकाणी पोलिस ठाणी बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही निधी देण्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने पाच वर्षे पूर्ण झालेल्या इमारतींची देखभाल व दुरुस्ती स्वतःकडे घ्यावी. त्यासाठी एखादी यंत्रणा नेमावी आणि या इमारतींची देखभाल व दुरुस्ती तातडीने व्हावी, अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या. यावेळी अपर मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी आदी उपस्थित होते.