Kumbhefal
Kumbhefal Tendernama
मराठवाडा

कुंभेफळ भुयारी रेल्वे मार्गाचे काम अर्थवट; ठेकेदारही गायब

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : संरक्षक भींत न बांधल्याने त्यातून बाहेर आलेला मातीचा भराव, त्यावर उभे असलेले दक्षिण मध्य रेल्वेचे १३२ के.व्ही.चे धोकादायक खांब, असे तकलादू चित्र निर्माण झाले आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याकडे क्षेत्रीय अधिकारी कानाडोळा करत आहेत. यासंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेचे सहाय्यक मंडळ अभियंता पंकजकुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. परिणामी त्यांची बाजू समजू शकली नाही.

कुभेफळ मार्गावरील भुयारी रेल्वे मार्गाचे काम कसेबसे चार वर्षात ठेकेदाराने पार पाडले. मात्र संरक्षक भिंत न बांधल्याने येणाऱ्या पावसाळ्यात मातीचा भराव ढासळल्यास सब - स्टेशनचे खांबच कोसळून येथे मोठा अपघात व रेल्वेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिवाय गेल्या अवकाळी पावसात भुयारी मार्गातील माती, दगड आणि मुरूम कोळल्याने वाहनधारकांची पंचाईत झाली होती. शिवाय भुयारी मार्गात गुडघ्याइतके पाणी साचल्याने मोठ्या कसरतीचा सामना करावा लागला होता. नागरिकांच्या आंदोलनानंतर चार वर्षाच्या प्रतिक्षेनंतर कुंभेफळ मार्गावरील भुयारी रेल्वे मार्गाचे काम केले. मात्र यातील स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा व दोन्ही बाजुने संरक्षक भिंतीचे काम न करता ठेकेदार काम सोडून गेला आहे.

यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांचे हाल होत असून वाहनांच्या नुकसानी बरोबरच पावसाळ्यात भुयारी मार्गात साचलेल्या पाण्याचा त्रास होऊ लागला. शिवाय संरक्षण भिंत न बांधल्याने सब स्टेशनला देखील धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्‍वभूमीवर त्रस्त झालेले नागरिक थेट रेल्वे मार्ग रोखण्याच्या तयारीत आहेत. जालना रोड ते कुंभेफळ येथे रेल्वेचे गेट होते. मात्र वाहतुकीची कोंडी होत असल्याने या ठिकाणी भुयारी रेल्वे पूल बांधण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. २०१९ मध्ये कामाला सुरवात झाली. मार्च २०  पर्यंत काम करण्याची मुदत होती, मात्र चार वर्ष झाले तरी काम अर्धवट स्थितीत आहे. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधली नाही, परिणामी दोन्ही बाजुने मातीचा भराव बाहेर आला आहे. त्यावरच महावितरणचे सब स्टेशनचे पोल धोकादायक स्थितीत उभे आहेत. ते वाहनधारकांसाठी आणि रेल्वेसाठी धोक्याचे आहे.

रस्त्यांत दोन्ही बाजुने चढ उतार आहे. पावसाळी पाण्याचा निचरा करणारी सोय न केल्यामुळे  त्यात पावसाचे पाणी साचते. अवकाळी पावसाने वाहनधारकांची मोठी त्रेधातिरपीट उडाली. येणाऱ्या पावसाळ्यात वाहनधारकांना त्यातूनच मार्ग काढावा लागेल का, असा सवाल ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाला केला. मात्र अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.

गत अवकाळी पावसाळ्यात येथे जवळपास पंधरा ते सतरा फूट पाणी दिवसेंदिवस साचून होते. आंदोलने, निदर्शने करूनही काम झालेले नाही. नागरिकांचा उद्रेक पाहून आ. हरिभाऊ बागडे यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून तत्काळ काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यावेळी मे पर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. मात्र अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही.