औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहराची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रस्त्यावरील, तसेच जुन्या शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी तत्कालीन मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी २०१६ मध्ये सिडकोतून जुन्या शहराला जोडणाऱ्या मदनी चौक - संजयनगर - बायजीपुरा - गंजेशहिदा कब्रस्तान जिन्सी ते राजाबाजार संस्थान गणपती पर्यंत रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली होती. याचबरोबर जुन्या शहरातील १६ रस्त्यांचे रुंदीकरण प्राधान्याने त्यांनी हाती घेतले होते. मात्र रस्त्यांचा हा विकास आराखडा त्यांनी बाहेर काढताच काही राजकारण्यांनी त्यांच्या बदलीसाठी शासनाकडे तगादा लावला. अखेर त्यांची बदली करण्यात यश मिळवले. तेव्हापासून शहरातील रस्ता रुंदीकरण मोहीम थंडावली. ही मोहीम विद्यमान मनपा प्रशासक हाती घेतील काय, असा सवाल औरंगाबादकर करत आहेत.
जुन्या व नव्या शहराला जोडणारा मदनी चौक - संजयनगर - बायजीपुरा - गंजेशहिदा कब्रस्तान - जिन्सी - राजाबाजार - संस्थान गणपती पर्यंत हा रस्ता १९९१ च्या विकास आराखड्यात ५० फुटाचा आहे. तत्कालीन नगरसेवक मों. इस्माइल यांनी या रस्त्याबाबत १८ एप्रिल १९९२ रोजी तत्कालीन महापौर मनमोहनसिंग ओबेराॅय यांच्यासमोर रस्ता रुंदीकरणाबाबत सभागृहात आवाज उठवला होता. मात्र तब्बल तीस वर्षांत या रस्त्याचे रुंदीकरण झालेच नाही. रेंगटीपुरा पंचायत मस्जीद समोरील काही भाग वगळता ५० फूट रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण देखील करण्यात आले. मात्र पुढे राजाबाजार ते संस्थान गणपतीपर्यंत काम रखडले.
१९९१च्या शहर विकास आराखड्यातील या रस्त्यांचे रुंदीकरण करणे अपेक्षित असताना मनपा प्रशासनाला तब्बल ३१ वर्षे जमले नाही. ते काम मदनीचौक - जिन्सी - रेंगटीपुरा ते पंचायत मस्जीद पर्यंतच्या रस्ताचे काम तीन दिवसांत बकोरीयांच्या आदेशाने मनपा अधिकाऱ्यांनी करून दाखवले.
या रस्त्यानंतर शहर विकास योजनेनुसार १६ रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम बकोरीयांनी हाती घेतले होते. त्यापैकी सहा रस्ते प्राधान्याने रुंद केले जाणार होते. त्यातीलच एक रस्ता राजाबाजार ते जिन्सी असा निश्चित केला होता. या रस्त्याच्या रुंदीकरणात सुमारे १५० मालमत्ता त्यात बाधित होत असल्याचा अहवाल देखील सहाय्यक संचालक नगर रचना विभागाने बकोरीयांच्या हवाली केला होता. त्यानंतर बकोरीयांनी स्वतः रुंदीकरणाच्या कामाची पाहणी करत तीन दिवसांत मोहीम फत्ते करायचे आदेश दिले होते. त्यानुसार काही - मालमंत्ताधारकांना २०१७ - १८ च्या रेडिरेकनर दरानुसार ३६ हजार प्रति. चौरस मीटर दराने मोबदला देऊन मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्या होत्या.
जुन्या शहरातील अत्यंत संवेदनशील भाग समजल्या जाणाऱ्या जिन्सी रस्त्याचे रुंदीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मोठी यंत्रसामुग्री आणि जास्तीचे मनुष्यबळ लावण्यात आले होते. टीडीआरच्या स्वरुपात मोबदला घेऊन मालमत्ता ताब्यात द्या, बकोरीयांच्या या विनंतीला अनेक मालमत्ताधारकांनी प्रतिसाद दिला होता. मात्र चार ते पाच जणांनी रोखीने मोबदला हवा आहे, अशी गळ घालत बकोरीयांच्या मोहीमेला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावर देखील बकोरीया ठाम राहीले. रोखीने मोबदला मागणाऱ्यांशी देखील चर्चा केली. त्यांना रोखीने मोबदला हवा असेल तर आधी मालमत्ता मनपाच्या ताब्यात द्या, बकोरियांच्या या विनंतीलाही काही मालमंत्ताधारकांनी सहकार्य करण्याचे मान्य केले. मात्र काही मालमंत्ताधारकांनी राजकीय दबाब आणत बकोरियांच्या रस्ता रुंदीकरणाच्या मोहीमेला खिंडार पाडले आणि मोहीम अर्धवटच राहीली.
या रस्त्यांचे रुंदीकरण झालेच नाही
- भाजीवालीबाई पुतळा ते उत्सव मंगल कार्यालय
- गुलमंडी ते मोंढा (दिवाण देवडीमार्गे)
- रोशनगेट ते आझाद चौक
- राजाबाजार ते मोंढा
- चंपाचौक ते जालनारोड
- चेलिपुरा ते चंपाचौक