Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

रखडलेल्या प्रकल्पांचे काय? सामान्य औरंगाबादकरांचा सवाल!

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादेतील २८ किमीचा डबल डेकर उड्डाणपूल आणि निओ मेट्रोच्या आराखड्याचे सोमवारी (ता. ३१ ऑक्टोबर) लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसमोर संबंधित प्रकल्प सल्लागार संस्थांनी सादरीकरण केले. लोकप्रतिनिधी आणि यंत्रणेतील काही 'मुंगेरीलालां'नी कितीही 'हसीन सपने' दाखविली तरी हे प्रकल्प कधी साकार होणार, आधीच्या कोट्यवधींच्या रखडलेल्या प्रकल्पांचे काय, असा प्रश्न सामान्य औरंगाबादकरांच्या मनात उपस्थित होऊ लागला आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेल्या बहुचर्चित शेंद्रा ते वाळूज या २८ किमी डबल डेकर उड्डाणपूल आणि निओ मेट्रो रेल्वेमार्ग असे ६२७८ कोटी रुपयांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (DPR) सोमवारी खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ अभिजित चौधरी, सिडको प्रशासक दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, शहर अभियंता सखाराम पानझडे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावले, स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, छावणी परिषदचे सीईओ संजय सोनवणे, आरटीओ संजय मैत्रेवार , पोलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता, तसेच औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी, भारतीय सेना, भारतीय रेल, स्मार्ट सिटी व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर महामेट्रो कंपनीचे अर्बन मास ट्रान्झिट कंपनीचे (यूएमटीसी) एस. रामकृष्ण कंम्प्रेन्सिव्हचे मोबीलिटी प्लॅनचे सादरीकरण केले. दुसरीकडे महामेट्रोचे विकास नगुलकर व साकेत केळकर यांनी महामेट्रो व मेट्रो निओचे सादरीकरण केले.

केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशानंतर कार्यवाही

यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर आराखड्यात बदल करण्यात येतील व नंतर सुधारित उड्डाणपुलाचा आराखडा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर, तर निओ मेट्रोचा आराखडा शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यासमोर  सादरीकरण केले जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही मंत्र्यांचा निर्णय झाल्यानंतर विविध विभागांची ना-हरकत मिळाल्यानंतर ३६ महिन्यांच्या कालावधीत हे प्रकल्प पूर्ण होतील, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले. 

आवश्यकता काय?

कंपनीने सादरीकरण करताना शेंद्रा एमआयडीसी ते वाळूज मार्गावर तासाला साडेआठ ते नऊ हजार वाहने प्रवास करत असल्याचे अभ्यासात समोर आल्याचे सांगितले. कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन अर्थात शहराचा सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करताना सध्याची व भविष्यातील वाहतूक व्यवस्था, पार्किंग, सार्वजनिक वाहतुकीचा अभ्यास करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. सकाळी कार्यालयीन वेळेत जाताना आणि सायंकाळी जालनारोडवर मोठ्याप्रमाणात वाहतुकीचा चक्काजाम होत असल्याने शहराला अखंडीत उड्डाणपुलाची आवश्यकता असल्याचे महामेट्रोने स्पष्ट करून सांगितले.

अशी असेल व्यवस्था...

निओ मेट्रोसाठी प्रस्तावित दोन मार्गांवर २२ स्टेशन्स मेट्रो रेल्वे आणि बस यांचे हायब्रीड व्हर्जन म्हणजे निओ मेट्रो जी १८ व २४ मीटर या दोन आकारात असते. त्यात ११० ते १७० आसन क्षमता असेल. ही मेट्रो रुळांवर नव्हे तर बसप्रमाणे टायरवर रस्त्यावरूनच धावते. यासाठी एका पिलरवर स्वतंत्र पूल उभारला जाईल. पहिल्या टप्प्यात शेंद्रा ते वाळूज आणि रेल्वेस्टेशन ते मुकुंदवाडी व्हाया हर्सूल टी पॉइंट या दोन मार्गांवर निओ मेट्रो प्रस्तावित आहे. 

केंद्र आणि राज्य सरकार देणार निधी

या दोन्ही प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार निधी देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पुढील ३० वर्षांची अपेक्षित लोकसंख्या आणि वाहतूक विचारात घेऊन नियोजन केलेले आहे. मनपाची आर्थिक परिस्थिती सर्वज्ञात असल्याने त्यावर आर्थिक संकट लादणार नाहीत, असे डॉ. कराड यांनी स्पष्ट केले. 

असा असेल उड्डाणपूल 

शेंद्रा ते वाळूज एमआयडीसी बजाज गेटपर्यंत एकच २८ किमीचा उड्डाणपूल असेल. लष्कराच्या हद्दीत ४ किमी मात्र हा पूल नसेल. सध्या जालना रोडवर चार उड्डाणपूल आहेत. यापैकी क्रांती चौक, सिडको हा पूल उपयोगात आणला जाईल. पण सेव्हन हिल्स आणि मोंढा नाका पूल पाडावे लागतील. बाबा पेट्रोल पंप येथील आडव्या पुलाचा किती उपयोग होतो याचा अभ्यास करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या संपूर्ण उड्डाणपुलावर शहरात सहा इंटरचेंज असतील. शेंद्रा गेट नंबर १, केंब्रिज चौक, विमानतळाजवळ, एसएफएस शाळेजवळ, महावीर चौक, एएस क्लब, कामगार चौक वाळूज, याशिवाय सिडको येथे देखील इंटरचेंज असावा, अशी सूचना करण्यात आली. छावणी परिसर आणि आवश्यक असेल एक ते दोन अंडरपास करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.

इतर प्रकल्पांचे काय? 

औरंगाबादेतील लोकप्रतिनिधी आणि यंत्रणेतील काही 'मुंगेरीलाल' यांनी या प्रकल्पाद्वारे दाखवलेल्या हसीन स्वप्नांवर हे प्रकल्प साकार होतील काय, आधीच्या कोट्यवधींच्या रखडलेल्या प्रकल्पांचे काय, असा देखील प्रश्न औरंगाबादकरांनी उपस्थित केलाय. यापूर्वीचे कोणकोणते महत्त्वाचे प्रकल्प रखडले त्यावर पुढच्या भागात सविस्तरपणे प्रकाश झोत टाकण्यात येईल.