water
water Tendernama
मराठवाडा

IMPACT: औरंगाबाद रेल्वे स्थानकावर 8 दिवसांत मिळणार स्वस्तात पाणी

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : पाच वर्षापूर्वी इंडियन रेल्वे कॅटरींग ॲन्ड टुरिझम मार्फत औरंगाबाद रेल्वे स्थानकासह नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, नगरसोल या रेल्वे स्थानकांवर वाॅटर व्हेंडिंग मशीन बंद पडल्याचे वृत्त टेंडरनामाने प्रसिद्ध केले. यामुळे रेल्वे स्टेशनवर पाण्यासाठी गरीब, सर्वसामान्य व मध्यमवर्गीय प्रवाशांना धावपळ करावी लागत होती. इंडियन रेल्वे कॅटरींगने बसवलेल्या या मशिन स्वतः रेल्वे प्रशासनाने चालवण्याचा निर्णय घेतला असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक नागेंदर प्रसाद यांनी सांगितले. येत्या आठ दिवसांत या मशिनच्या साह्याने प्रवाशांना पाच रुपयांचे नाणे टाकल्यानंतर एक लिटर थंड आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार, आठ दिवसात जुन्या मशिनची दुरूस्ती करून कार्यान्वित होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

औरंगाबाद स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दोन मशिन, प्लॅटफॉर्म दोन आणि तीनवर एक मशिन पाच वर्षापूर्वी बसविण्यात आले होते. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम लिमिटेडच्या (आयआरसीटीसी) वतीने ही प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून दररोज किमान ६० ते ७० हजार  प्रवासी ये-जा करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी स्टेशनवरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाणपोईची व्यवस्था आहे. मात्र, तेथील अस्वच्छतेमुळे अनेक प्रवासी ते पाणी पिण्याऐवजी विक्रेत्यांकडील  पाण्याची बॉटल विकत घेतात. अनेकदा विक्रेत्यांकडून खासगी कंपनीच्या अधिक किमतीच्या पाणी बॉटलची विक्री केली जाते. हे सर्व लक्षात घेऊन भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगमने  स्टेशनवर ही वॉटर व्हेडिंग मशिन बसविली होती. मशिन बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर टेंडरनुसार हैद्राबादच्या वाॅटर हेल्थ कंपनीकडे देखभाल दुरूस्तीसह चालविण्यासाठी दिली होती. मात्र ही सेवा  प्रवाशांच्या सेवेसाठी केवळ दोनच दिवस खुली करण्यात आली होती. नंतर कंपनीचे व्यवस्थापक शेषागिरी यांनी औरंगाबादेतून गाशा गुंडाळला.

प्रतिनिधीने यावर वृत्त प्रकाशित करताच औरंगाबाद रेल्वे स्टेशन वरील भारतीय रेल्वे खानपान व टुरिझम विभागाचे व्यवस्थापक राहुल यादव यांनी वाॅटर हेल्थ कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगितले. मात्र, या मशिन पाच वर्षांपासून नव्हे तीन वर्षांपासून बंद असल्याचा दावा करत कंपनीकडे भारतीय रेल्वे खानपान विभागाचे परवाना शुल्क, वीज आणि पाण्याचे बील असे पाच लाख रूपये बाकी असल्याचे ते म्हणाले. मात्र आता सदर कंपनीकडुन मशिनचा ताबा काढुन दक्षिण मध्य रेल्वे विभागामार्फतच त्या चालवल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.