Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : कॅनाॅट प्लेसमधील व्यापारी 'पे ॲन्ड पार्क' विरोधात

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको एन-५ टाउनसेंटर भागातील कॅनाॅट प्लेस भागात आधीच दहा बाय दहाच्या दुकान्यातील टीनपत्र्याचे शेड काढुन अवकाळी पावसाने ग्राहकांना उभे राहायला जागा नाही, दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरून मालाचे नुकसान होत आहे. एकेकाळी गजबजलेल्या या व्यापारी पेठेत ग्राहकांची मोठी रेलचेल होती. मात्र आता काही बड्या बिल्डरांनी नव्या व जुन्या शहरात नव्याने गृहप्रकल्प आणि मोठ्या बाजारपेठा विकसित केल्याने तिकडे खरेदीदारांची संख्या वाढावी, दुकाने-फ्लॅट विक्री व्हावेत व झटपट ग्राहक मिळावा या उद्देशाने महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून सिडको, हडको गारखेडा आणि  जुन्या शहरात महापालिकेने 'पे ॲन्ड पार्क' च्या नावाखाली सर्वसामान्यांची लुट सुरू केली आहे. यामुळे येथील बाजारपेठांत आधीच व्यवसायांचे संकट असताना आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेने नव्याने सुरू करण्यात आलेल्या ' पे ॲन्ड पार्क' ला संघटनेने विरोध केला आहे.

प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास संबंधित बाजार घटक संघटनांकडून काम बंद आंदोलनाचा इशारा कॅनाॅट मार्केट असोशिएशनने दिला आहे. येथील जवळपास अडीचशे ते तीनशे दुकान, हाॅटेलात काम करणार्या बेरोजगार कामगारांची घरे प्रशासनाने चालवावीत, दुकानांपोटी शासनाला मिळणारा महसुल आणि व्यापार्यांच्या कौटुंबिक उदरनिर्वाहाची व्यवस्था महापालिकेने करावी, बंद काळात मालमत्ताकर देखील आकारू नये, अशा मागण्या घेऊन असोसिएशन महापालिका प्रशासकांना निवेदन देणार आहे. यासंदर्भात सिडको कॅनाॅट प्लेस येथील हाॅटेल राणा येथे आज शनिवारी दुपारी "पाच"च्या सुमारास बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित व्यापाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कॅनाॅट व्यापारी असोसिएशनने केले आहे.

कॅनाॅट गार्डन परिसरात पहिल्यांदाच महापालिकेने 'पे अ‍ॅन्ड पार्क' सुरू केले असून, त्यासाठी कुठलीही स्पर्धा न करता वसुलीचा ठेका एका ठेकेदाराला दिला आहे. विशेष म्हणजे या एकाच ठेकेदाराला सिडको कॅनॉट प्लेस, निराला बाजार, उस्मानपुरा, अदालत रोड, सूत गिरणी चौक, पुंडलिकनगर, टीव्ही सेंटर या सात ठिकाणी 'पे ॲन्ड पार्क'चा संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला असून, त्यानुसार पहिल्या टप्पात गत दहा दिवसांपासून ठेकेदाराने २० ते २२ कर्मचारी तैनात करत पार्किंग शुल्क वसुली सुरू केली आहे. या संदर्भात 'टेडरनामा'ने वृत्तमालिका प्रकाशित केली. त्यानंतर कॅनाॅट परिसरातील व्यापारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने एकवटला असून  या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याची मागणी कॅनाॅट गार्डन व्यापारी असोसिएशनने केली आहे. या मागणीला कॅनाॅट परिसरातील मोबाईल विक्री व दुरूस्ती केंद्र , बॅका व किराणा व्यावसायिक कटलरी, पुस्ताकालय  व स्टेशनरी, तसेच अंगमेहनती कष्टकरी कामगार वर्गाने देखील पाठींबा दिला आहे. कॅनाॅट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा खर्डे याबाबत येथील सर्व व्यापार्यांच्या महापालिका प्रशासक, पोलिस आयुक्तांना  निवेदन देणार आहेत.

पार्किंग शुल्काच्या भितीने कॅनाॅट प्लेस परिसरात ग्राहकांनी दहा दिवसापासून पाठ फिरवली आहे. येथे २५ टक्केही व्यवसाय होत नाही. येथील उद्योजकांना सरकारचा महसुल आणि महापालिकेचा कर भरणे देखील परवडणार नाही. अर्थातच वस्तुंची किंमत वाढवावी  लागेल. त्यामुळे महागाई वाढणार असून, त्याचा परिणाम हा ग्राहकांपासून सर्व संबंधित घटकांवर होऊन व्यापारपेठ  कोलमडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सद्य:स्थितीचा विचार करून पार्किंग शुल्क आकारण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, अन्यथा आम्हाला नाइलाजस्तव सर्व बाजारातील संबंधित घटकांना काम बंद आंदोलन करावे लागेल, असा इशाराही  संघटनेमार्फत महापालिका प्रशासकांना निवेदनाव्दारे देण्यात येणार आहे.

कॅनाॅट प्लेस येथील  वाहनांना वेगळा न्याय का ?

गत दहा दिवसापासून कॅनाॅट प्लेस व्यापारी पेठेत ४ चाकी व दुचाकी  वाहनांकरिता पार्किंग शुल्क आकारले जात आहे. मात्र, प्रोझोन , एमजीएम, जेएनईसी, डाॅ.वाय.एस.खेडकर रूग्णालय  व महाविद्यालय , भारत बाजार , जालनारोड व अन्य भागात थेट रस्तेच गिळ॔कृत करण्यात आली आहेत. तिकडे बड्यांना सुट देण्यात आली आहे का ?  कॅनाॅट प्लेस भागात खरेदीसाठी येणार्या ग्राहकांना वेगवेगळा न्याय का, असा सवालही संघटनेने  केला आहे.