Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

टेंडरनामा इम्पॅक्ट : झोपलेल्या पालिकेला ४ महिन्यानंतर जाग

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : सिडकोतील एन - ३ व एन - ४ परिसरातील अनेक घरांमध्ये चार  महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत होता. सोमवारी पाण्यात ड्रेनेजमिश्रित पाणी आढळल्याने नागरिकांनी 'टेंडरनामा'कडे तक्रार केली होती. मंगळवारी वृत्त प्रसिध्द होताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या परिसरातील जलवाहिनीचा माग घेऊन दूषित पाण्याच्या स्त्रोताची शोधाशोध सुरू केली आहे. स्त्रोत सापडल्यानंतर संपूर्ण जलवाहिनी स्वच्छ केली जाणार असून, ड्रेनेज व जलवाहिनीची दुरूस्ती तातडीने करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या भागात मागील चार महिन्यांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. नागरिकांनी याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही काहीही उपयोग होत नव्हता. सोमवारी या परिसरातील नळांमधून आलेल्या पाण्यात ड्रेनेजमिश्रित पाण्यासह आळ्या व अन्य जीवजंतू आढळून आल्याने संतप्त जेष्ठ नागरिक अर्जून चव्हाण यांनी समाजसेवक मनोज बोरा यांच्याकडे तक्रार केली होती. बोरा यांनी या भागातील कंत्राटी कनिष्ठ अभियंता कल्याण सातपुते यांना तातडीने घटनास्थळी बोलावून परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विनंती केली होती. मात्र आम्हाला वरिष्ठ सांगतील तिथेच आम्ही पाहणी करायला जातो, असे उत्तर देत सातपुते यांनी टाळाटाळ केली. याबाबतचे वृत्त मंगळवारी 'टेंडरनामा'ने प्रसिद्ध केले होते.

शहर अभियंत्यांकडून वृत्ताची दखल

वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर परिस्थितीची जाणीव लक्षात घेऊन पानझडे यांनी तातडीने कार्यकारी अभियंता भागवत फड, राजीव संधा व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोहम्मद काझी यांना या प्रकरणी लक्ष देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर दुपारपासून महापालिकेच्या पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून जलवाहिनी आणि ड्रेनेजलाईनची  पूर्णपणे पाहणी केली. या वेळी पाण्यात घाण आढळल्याने नागरिकांनी सांगितलेल्या गोष्टीत तथ्य असल्याचे दिसून आले. त्यानुसार संपूर्ण परिसरात ड्रेनेजलाइन व जलवाहिनी एकत्र येत असलेल्या परिसराची पाहणी करून ज्या ठिकाणी लिकेज असेल तेथे सुधारण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

आता तरी लक्ष द्या

सिडकोतील एन - ३, एन - ४  याच भागात नव्हे तर अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन व पाणीपुरवठा करणारी लाईन जवळ टाकल्याने शहरभर दुषित पाण्याची समस्या आहे. आता औरंगाबाद नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना राबवताना मजीप्रा आणि महापालिकेने दोन्ही लाईन बदलताना विशिष्ट अंतर ठेवण्याची तरतूद  करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नवीन जलवाहिन्या टाकल्यानंतर भविष्यात अशा प्रकारे दूषित पाणीपुरवठा होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन जीवितहानी झाली तर याची जबाबदारी महापालिका आणि मजीप्रासह कंत्राटदार जेव्हीपीआर घेणार काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.