Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Tendernama Impact: अखेर संभाजीनगरमधील 'त्या' मलनिःसारण वाहिनीचे काम फत्ते

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील सिडको एन - दोन परिसरातील सोहम मोटर्स ते अंबिकानगर मार्गावर महानगरपालिकेची मुख्य मलनिःसारण वाहिनी फुटल्याने या संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. एकीकडे देशात पुन्हा कोरोनासारखी महामारी आल्याच्या वृत्तानी शहरात धास्ती पसरली असताना या जीवघेण्या दुर्गंधीमुळे लाखो प्रवासी, सारा - कासलीवाल गार्डन ते कासलीवाल पार्क येथील गाळेधारक, रहिवाशांना दुर्गंधीमुळे आरोग्याची मोठी समंस्या निर्माण झाली होती.

या मलनिःसारण वाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. याबाबत ‘टेंडरनामा’ने सातत्याने वृत्तमालिकेद्वारे अनेक वेळा प्रकाश टाकला. त्याची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने मलनिःसारण वाहिनी बदलण्याचे काम फत्ते केल्याने नागरिकांची दुर्गंधीपासून सुटका झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत सिडको एन - दोन भागातील मुकुंदवाडी चौक ते सोहम मोटर्स ते कासलीवाल - सारा पार्क ते कासलीवाल मार्केट या परिसरातील मुख्य रस्त्याच्याकडेला ७०० मिलीलीटरची जलवाहिनीसाठी जेसीबीद्वारे खोदकाम करताना रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेली महानगरपालिकेची मलनिःसारण वाहिनी फोडण्यात आली. जीव्हीपीआरच्या कारभार-यांनी हा पराक्रम केल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नव्याने छोट्या व्यासाची मलनिःसारण वाहिनी टाकून दुसऱ्या चेंबरला कनेक्शन जोडले. यासाठी जवळपास अर्धा लाख रुपये खर्च केले. 

हे काम झाल्यानंतर जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराने दुसऱ्याच दिवशी उजव्या बाजुला घरगुती पाणीपुरवठा करणाऱ्या २५० मिलीलीटर जलवाहिनीसाठी जेसीबीद्वारे पुन्हा खोदकाम सुरू केले. त्यात महानगरपालिकेने आदल्या दिवशीच टाकलेली नवीकोरी छोट्या व्यासाची मलनिःसारण वाहिनी पुन्हा फोडली. यावर 'टेंडरनामा' प्रहार करताच महानगरपालिकेचे वार्ड अभियंता मधुकर चौधरी यांनी तातडीने दखल घेऊन नव्याने २५० एमएमचे मोठे आरसीसी पाइप आणि तब्बल आठ ठिकाणी चेंबर बनवत मलनिःसारण वाहिनीची कायमस्वरूपी उपाययोजना केली. 

परिणामी उपरोक्त उल्लेखीत मार्गावरील कायमस्वरूपी दुर्गंधीची कटकट मिटली. जीव्हीपीआरच्या नियोजनशून्य कारभारामुळे वारंवार मलनिःसारण वाहिनी फोडण्याचे टाकण्याचे प्रकार घडत असल्याने मुकुंदवाडी चौक ते जालना रोड ते सोहम मोटर्स ते कासलीवाल मार्केट दरम्यान मुख्य सिमेंट रस्त्यावरून मैलायुक्त सांडपाणी वाहत असल्याने प्रवाशांसह गाळेधारक व येथील रहिवाशांना नरकयातना सोसाव्या लागत असत. या वाहत्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविणेही अवघड झाले होते.

आधीच शहरात कोरोनासारख्या महामारीची धास्ती त्यात साथरोग, डेंग्यूचा प्रसार यामुळे आधीच त्रस्त नागरिकांना रस्त्यावर पुरासारख्या वाहत्या पाण्यामुळे रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. या मलनिःसारण वाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाला केली होती; परंतु संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले गेले. 

याबाबत ‘टेंडरनामा’ने जीव्हीपीआरच्या आणि महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर चांगलाच प्रहार केला. वेळोवेळी वृत्तमालिका प्रकाशित केली होती. या वृत्ताची दखल घेऊन महानगरपालिकेच्याच वार्ड अभियंता मधुकर चौधरी यांनी तातडीने वार्षिक देखभाल दुरुस्ती अंतर्गत लेखाशिर्षातून जवळपास १२ लाखाचे अंदाजपत्रक तयार केले. त्याला कार्यकारी अभियंता राजीव संधा यांनी कुठलेही आढेवेढे न घेता मंजुरी दिली. त्यामुळे सोहम मोटर्स ते कासलीवाल मार्केट रस्त्यालगत ते मुकुंदवाडी चौकादरम्यान ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत नव्याने मोठ्या व्यासाची एक किलोमीटरच्या अंतरात असलेली जुनाट मलनिःसारण वाहिनी बदलन्याचे काम हाती घेतले आहे. सध्या काम प्रगतीपथावर असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर काम शहरातील शीतल पहाडे यांच्या बालाजी कंन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात आले आहे.