Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

BAMU : ॲथेलेटीक सिंथेटिक ट्रॅक प्रकरणी टेंडर विभागाची मेहरबानी

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ॲथेलेटीक ट्रॅक बांधकामातील कोट्यावधीच्या प्रक्रियेत टेंडर विभागातील लिपिक आणि विभागीय कार्यालयाने कशा पद्धतीने मेहरबानी दाखवली त्याची कार्यालयीन टिपण्णी टेंडरनामाच्या हाती लागली आहे, त्याचा हा खास रिपोर्ट...

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ॲथेलेटीक सिंथेटिक ट्रॅकचे बांधकाम करणेबाबत टेंडरमध्ये घोळ झाल्याचे टेंडरनामाने उघड केले. या प्रकरणी सर्व अपात्र कंत्राटदारांना सार्वजनिक बांधकाम मंडळ विभाग आणि जागतिक बँक प्रकल्प शाखेकडून न्याय न मिळाल्याने अखेर त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतल्याचे एका विश्वसनीय सुत्रांकडून कळाले. परिणामी एकिकडे आ. प्रशांत बंब यांचा चौकशीचा ससेमिरा, दुसरीकडे प्रकरण न्यायालयात गेल्यास टेंडर विभागातील कारकून आणि सार्वजनिक बांधकाम मंडळाचा अधीक्षक अभियंता तहेच सहा. अधीक्षक अभियंता व जागतिक बँक प्रकल्पातील विभागीय लेखाधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसत आहे. 

असा आहे घोळ

टेंडरनामाने या प्रकरणी खोलात जाऊन तपास केला असता विषयांकीत प्रकरणी ई-टेंडर लिफाफा क्र. २ (आर्थिक देकार) उघडणे बाबत जागतिक बँक प्रकल्पातील कार्यकारी अभियंत्याने २४ नोव्हेंबर २०२२ रोजी दिलेल्या पत्र दिले होते. तत्पूर्वी संबंधित कामाचा लिफाफा क्र. १ (तांत्रिक लिफाफा) ६ ऑक्टोबर २०२२ रोजी उघडण्यात आला होता. त्यात अतुल एस. निकम, पी. आर. पाटील ॲन्ड कंपनी, वाय. पी. देशमुख, पी. व्ही. पाटील कन्सट्रक्शन, समृध्दी कन्सट्रक्शन, के. एच. कन्सट्रक्शन आदी कंत्राटदारांनी सादर केलेल्या लिफाफा क्र. १ मधील कागदपत्रांची छाननी टेंडरमधील अटी व शर्तीनुसार केल्याचा दावा करत निष्कर्ष काढण्यात आला. त्यात पात्र/अपात्रेतेची कारणे देत मर्जीतल्या कंत्राटदाराला कंत्राट मिळावा, यासाठी टेंडर विभागाने कशी मेहरबानी दाखवली हे कार्यालयीन टिपण्णीतूनच स्पष्टपणे उघड होत आहे.

● अतुल एस. निकम या कंत्राटदाराला पात्रतेचा शेरा मारताना केवळ शिवनरेश स्पोर्टस प्रा. लि. या कंत्राटदाराने अतुल निकम यांचे समवेत केलेल्या जाॅईंट व्हेंचर बाबत दृढीकरण केले असल्याचे व टेंडर दाखल करताना प्राधिकृत प्रतिनिधी व्यक्तीशः उपस्थित असल्याचे कंत्राटदाराकडून कळविले आहे. यावरून तो कंत्राटदार टेंडरमधील अटीशर्तीची पुर्तता करत असल्याचे नमुद करत त्याला पात्रतेचा शेरा मारण्यात आला आहे. मात्र त्याने टेंडरमधील अटी शर्तीची पुर्तता कशी केली, तो कसा काय पात्र ठरला, हे टिपण्णीत कुठेही नमुद केलेले नाही, असा आरोप अपात्र कंत्राटदारांनी केला आहे.

●  वाय. पी. देशमुख या कंत्राटदाराने टेंडरमधील अटी-शर्थीनुसार सहा बाबींची पुर्तता केली नव्हती. मात्र टेंडर विभागाने काढलेल्या त्रुटींची पुर्तता करण्यासाठी १५ नोव्हेंबर २०२२ रोजी खास विभागीय कार्यालयामार्फत त्याला पत्र पाठवण्यात आले. मात्र, इतर कंत्राटदारांबाबत इतकी काळजी न घेतल्याचा आरोप काही नाराज कंत्राटदार करत आहेत.