Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

महापालिकेच्या शाळेसमोरच सांडपाण्याचे तळे; वा रे स्मार्ट स्कूल!

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : एकीकडे महापालिका गेल्या अडीच वर्षापासून सीबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरू केल्याच्या बाता करत आहे. त्यात ज्युनिअर केजी, सीनिअर केजी आणि पहिली असे तीन वर्ग सीबीएसई पॅटर्नमध्ये सुरू करण्यात आल्याचे सांगत आहे. त्यालाच जोडून स्मार्ट स्कूल संकल्पनेतून ६५ कोटी रूपये खर्च करून ७१ पैकी ५० शाळा स्मार्ट केल्याचा दावा करत आहे. मात्र सिडको एन दोन परिसरातील विठ्ठलनगर भागात गत दोन महिन्यापासून महापालिका प्राथमिक शाळेच्या प्रांगणात ड्रेनेजमिश्रित पाण्याचा तलाव साचला आहे. त्यामधून आसपासच्या वसाहतधारकांसह पालक आणि विद्यार्थांना नाईलाजास्तव दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

ड्रेनेजमिश्रित पाण्याचा तलाव साचल्याने मैदानाची वाट लागली आहे. त्यामुळे परिसरातील मुलांची खेळण्यासाठी आबाळ होत आहे. या विद्येच्या प्रांगणासमोरच धार्मिक स्थळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देखील दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात आठ दिवसात महापालिकेने सांडपाण्याची विल्हेवाट न लावल्यास जन आंदोलनाचा इशारा शहर सुधार समितीचे सभापती मनोज बन्सीलाल गांगवे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. यापूर्वी स्थानिक नागरिकांनी दिलेल्या तक्रारींना वार्ड अभियंता एस. एस. पाटील यांनी केराची टोपली दाखवली आहे.

मैदानातीलच विठ्ठलनगर  वसाहतीच्या सामायिक सांडपाणी ड्रेनेजच्या चेंबरातून महापालिकेने प्रक्रिया न केलेले सांडपाणी बाहेर पडते. ते सांडपाणी बंद करण्याची जबाबदारी असणारे दुय्यम आवेशक, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उप अभियंता आणि वार्ड अभियंत्याना याबाबत तक्रारी करूनही अधिकारी हात वर करतात. त्यामुळे आसपासच्या शेकडो घरांसह शाळेतील चिमुकल्यांना मैदानात साचलेल्या या ड्रेनेजमिश्रित पाण्याचा उग्रवास, दुर्गंधीचा त्रास मोठ्याप्रमाणात सोसावा लागत आहे.

सांडपाण्याची दुर्गंधी टाळण्यासाठी नागरिकांना दारे खिडक्या बंद कराव्या लागत असल्याने व्हेंटीलेशनची दुसरी समंस्या निर्माण झाली आहे. शाळेतील चिमुकल्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.  या त्रासामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. असे असताना महापालिकेतील कारभाऱ्यांना जाग आलेली दिसत नाही. त्यामुळे आरोग्याचे गांभीर्य लक्षात घेत येत्या दोन दिवसात तातडीची बैठक घेऊन महापालिका प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना न केल्यास महापालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचा इशारा शहर सुधार समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक मनोज बन्सीलाल गांगवे यांनी दिला आहे.