Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : हेच का तुमचे दिल्लीच्या धर्तीवरील 'कॅनाॅट प्लेस'? रस्त्यांवरच कचऱ्याचे ढीग...

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको एन - 5 टाऊन सेंटर परिसरात तत्कालीन सिडको (CIDCO) प्रशासनाने 25 वर्षांपुर्वी कॅनाॅट प्लेसची उभारणी केली. दरम्यानच्या काळात येथील स्वच्छता आणि डांबरी रस्ते तसेच आकर्षक उद्यानामुळे परिसराचे सौंदर्य फुलत होते. मात्र १७ वर्षांपुर्वी सिडकोचे महानगरपालिकेत सार्वजनिक सेवा सुविधांची देखभाल व पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी हस्तांतरण झाले आणि सिडको- हडकोची वाट लागली. त्यात सिडको - हडकोतील महत्त्वाची मोठी बाजारपेठ कॅनाॅट प्लेसची स्थिती पाहता हेच का तुमचे देशाची राजधानी दिल्लीच्या धर्तीवरील कॅनाॅट प्लेस, असा सवाल येथील ग्राहकांकडून व्यापाऱ्यांना केला जात आहे.

कॅनाॅट प्लेसच्या सर्वच रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. एवढेच नव्हेतर महानगरपालिकेचे डस्टबीन ओव्हरफ्लो होऊन रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग विखुरलेल्या अवस्थेत आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या सफाई कामगारांकडून होत असलेल्या कामचुकारपणामुळेच याठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

जुन्या व नव्या शहराच्या अगदी सिडको कार्यालय, महानगरपालिका झोन कार्यालय, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय कार्यालय, आयकर भवन, एल. आय. सी.चे मुख्य कार्यालय तसेच वसंतराव नाईक महाविद्यालय व बहूमजली इमारतींच्या चारही बाजूने बंदिस्त कॅनाॅट प्लेस आहे. आत भव्य काही एकर उद्यानाच्या चारही बाजूंनी छोटे गाळे व समोरील चारही बाजूंनी निवासी प्लस व्यापारी गाळे, असे देशाची राजधानी दिल्लीच्या धर्तीवर कॅनाॅट प्लेसची उभारणी केली आहे. येथील विविध संकुलात अनेक नामांकित वकील, इंजिनियर, पतसंस्था, राजकीय लोकप्रतिनिधी व बॅंका यांची कार्यालये आहेत.

विशेष म्हणजे माजी मंत्री राजेंद्र दर्डा व माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री मतदार संघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांचे मुख्य कार्यालय याच भागात आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे उच्च न्यायालय येथून हाकेच्या अंतरावर असल्याने येथे अनेक नागरिक व वकील व न्यायालयीन कर्मचारी दस्तावेज टायपिंग, झेराॅक्स करण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर मोबाईल खरेदी - दुरुस्तीचा हब असल्याने येथे ग्राहकांची मोठी झुंबड उडालेली असते. खवय्यांसाठी खास पेठ असल्याने दिवसा व रात्री उशिरापर्यंत कॅनाॅट भागात गर्दी होते. 

अशा या भव्य कॅनाॅट प्लेसमधील पायाभूत सुविधांची नव निर्मितीतर सोडाच जुन्या सुविधांचे पार वाटोळे झालेले आहे. बकाल निर्मनुष्य उद्यान, बेशिस्त वाहतूक व्यवस्था त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, बंद पथदिवे, जिकडे तिकडे फुटलेल्या मलनिःसारण व जलवाहिन्या, फुटपाथवर भगदाडे, त्यात रस्त्यांवरच कचऱ्याचे ढीग साचून घाणीचे साम्राज्य याठिकाणी निर्माण झाले आहे. पालिकेच्या सफाई कामगारांना वारंवार तक्रार देऊनही येथील कचरा उचलला जात नसल्याने व्यापारी, येथे येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी महानगरपालिकेने तत्काळ कारवाई करावी अशी मागणी व्यापारी व नागरिकांतून होत आहे. येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशीही मागणी आहे.

महानगरपालिकेने केले विद्रुपीकरण

महानगरपालिका प्रशासन येथील व्यापाऱ्यांकडून आणि नागरीकांकडून कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करते. त्याबदल्यात सुविधा तर काहीच देत नाही. तब्बल चाळीस वर्षांनंतर या भागात सरकारच्या कृपेने मुख्य रस्त्यांचे काम झाले. मात्र अंतर्गत रस्त्यांवर ग्राहक आणि नागरिक व व्यापाऱ्यांना अंगठेफोड सोसावीच लागते.

धक्कादायक म्हणजे छोट्या गाळ्यांसमोर व्यापाऱ्यांच्या हक्कातील जागा असलेल्या ओट्यावर व्यापाऱ्यांनी सुरक्षेसाठी केलेले शेड काढून महानगरपालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांची मोठी असुविधा केली.