Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : देवळाईत MHADA काॅलनीतील महिलांची सुरक्षितता धोक्यात; जबाबदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सातारा–देवळाई महानगरपालिका क्षेत्रात म्हाडाने जिल्हा प्रशासनाच्या मदतीतून काही हेक्टर गायरान जागेवर मोठा गृहप्रकल्प उभारला. त्यामुळे देवळाईमध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये घरांचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र पुढे येथील रस्ते, पथदिवे, खुल्या जागांची देखभाल दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे जबाबदारी टाकण्यात आली होती. कालांतराने सातारा - देवळाईत नगरपालिका स्थापन झाली. त्यानंतर महापालिकेत समाविष्ट झालेल्या म्हाडा काॅलनीत सुविधांची बोंबाबोंब आहे.

देवळाईतील म्हाडा काॅलनीतील मूलभूत सोयीसुविधांबाबत 'टेंडरनामा'ने‌ सातत्याने आवाज उठवला आहे. एवढेच नव्हेतर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, म्हाडाचे सीईओ यांच्यापर्यंत येथील मूलभूत सोयीसुविधांबाबत तगादा लावल्यानंतर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवला. मात्र म्हाडा काॅलनीतील अंतर्गत रस्त्यांसह काॅलनीकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यांची पार चाळणी झाली आहे.

विशेषतः येथील काॅलनी अंतर्गत मिनमिनते दिवे आणि मुख्य रस्त्यांवर दिवेच नसल्याने रात्री अपरात्री आपत्कालीन परिस्थितीत रस्त्यांवर प्रवास करणाऱ्या महिलांची अंधारामुळे सुरक्षा धोक्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात जागा, प्लॉट व फ्लॅटच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांना घर म्हणजे स्वप्नच झाले आहे. अशा स्थितीत छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला झपाट्याने विकसित झालेल्या देवळाई भागात साधारणतः वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातील लोकांचे म्हाडाच्या प्रकल्पामुळे घराचे स्वप्न साकार झाले असले तरी या भागातील नागरिक अद्यापही मूलभूत सोयीसुविधांबाबत कोसो दूर आहेत.

आधी अल्प उत्पन्न गटातील सर्वसामान्यांसाठी घरांची निर्मिती केल्यानंतर याच प्रकल्पाच्या शेजारी जिल्हा प्रशासनाची मोठी गायरान जमीन होती. त्यातील पुढील टप्प्यातील गृहप्रकल्प साकार करण्यासाठी १८ हेक्टर जागा मिळावी यासाठी म्हाडाने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला सन २०१४ मध्ये  जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार म्हाडाने या जमिनीचे मूल्यांकन म्हणून जिल्हा प्रशासनाकडे १८ कोटी ५७ लाख ६० हजार रुपये भरले होते. म्हाडाने मूल्यांकनाचे सर्व पैसे भरल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जागेचा ताबा दिला.

येथील बहुमजली प्रकल्प राबवताना म्हाडाने शहर परिसरात होणाऱ्या दिल्ली–मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे तसेच, त्या काळात २०१४ मध्ये सातारा - देवळाईत ग्रामपंचायतीचे रूपांतर  नगरपालिकेत झाल्याचे स्पष्ट करत आता या भागाला महत्त्व येणार असल्याची जाहिरात करत या भागामध्ये सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकारण्यासाठी म्हाडाने प्रकल्पांचे बांधकाम केले. गट क्रमांक १४५ मधील आठ हेक्टर, गट क्रमांक ७३ मधील दहा हेक्टर अशा एकूण १८ हेक्टर जमीनीवर बहुमजली इमारती बांधल्या. 

आधी फसविले आता पालकत्व नाकारले

देवळाई परिसरातील म्हाडाने येथे जिल्हा प्रशासनाच्या गायरान जागेवर मोठा गृह प्रकल्प उभारला. यात अल्प उत्पन्न गटातील व मध्यम उत्पन्न गटातील लोकांचे घरांचे स्वप्न साकार केले. २० ते २५ वर्षांपूर्वी तसेच काहींना आठ वर्षांपूर्वी घरांचा ताबा देण्यात आला. मात्र, नियमानुसार म्हाडाने कोणत्याच मूलभूत सुविधा पुरवलेल्या नाहीत.

ड्रेनेजची व्यवस्था अपुरी असल्याने काॅलनीच्या प्रवेशदारातच दररोज घाण मैल्याचे पाट वाहतात. शेकडो घरांसाठी केवळ अडीच इंचीचे ड्रेनेजचे पाइप लावण्यात आले आहेत. यामुळे हे पाइप कायम गळतात. घरांचे बांधकामही निकृष्ट असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पावसाळ्यात इमारतीमधील अनेक घरांच्या छतामधून पाण्याची गळती होते. ड्रेनेजचे पाइप जागोजागी लीक झाले असल्याने घाण पाणी थेट घरात शिरते. म्हाडा काॅलनीला संरक्षक भिंत नसल्याने मोकाट जनावरे थेट वसाहतीत शिरून त्रास देतात.

विशेष म्हणजे सातारा - देवळाई भागात नगरविकास विभागाच्या विविध लेखाशिर्षातून सिमेंट रस्त्याचे जाळे पसरलेले असताना म्हाडा काॅलनी अधिकृत असताना या भागातील रस्त्यांची पार चाळणी झालेली असताना लोकप्रतिनिधींकडून या वसाहतीकडे कानाडोळा केला जात आहे. आजूबाजूच्या गुंठेवारी सोसायट्यांमध्ये अनधिकृतरित्या सर्व मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. मग म्हाडा काॅलनी या अधिकृत वसाहतीतील नागरिकांना या सुविधांपासून का वंचित ठेवण्यात आले, असा सवाल नागरिक करत आहेत.

अहिल्याबाई होळकर चौकाकडून देवळाई रस्त्याच्या दक्षिणेला म्हाडाने गृहप्रकल्प साकार केला आहे. अहिल्याबाई होळकर चौक ते म्हाडा काॅलनीकडे येणारा मुख्य रस्त्याची वाट लावली आहे. त्यात नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराने जलवाहिनीसाठी खोदकाम करताना रस्ताच होत्याचा नव्हता करून टाकलेला आहे. आधीच कच्चा रस्ता त्यात या मार्गावर एकही पथदिव्यांचा खांब नसल्याने या भागातील नागरिक विशेषतः महिला व मुलींची असुरक्षितता वाढली आहे.

सायंकाळनंतर शाळा, महाविद्यालयातून अथवा खाजगी क्लासेस तसेच नोकरीवरून घरी जोपर्यंत महिला परतत नाहीत तोवर कुटुंबातील सदस्यांचा जीव भांड्यात पडलेला असतो. रात्री अपरात्री रुग्नांना उपचारासाठी दाखल करणे देखील जिकिरीचे होते. येथील खुल्या जागांचा विकास झाला नसल्याने मुलांना खेळण्यासाठी चांगली मैदाने देखील नाहीत. उद्यानांसाठी आरक्षित जागांचे जंगलात रुपांतर झाले आहे.

तत्कालीन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे म्हाडा काॅलनीतील रस्त्यांबाबत टेंडरनामाने सातत्याने तगादा लावला होता. अखेर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून या भागातील मुख्य रस्त्यासाठी साडेपाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र तीन वर्षांपासून निधी मंजूर असताना अद्याप रस्त्याचे बांधकाम झालेली नाही.

या भागातील एका रस्त्यासाठी जुन्याच काळात निधी मंजूर असताना व सदर काम स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या यादीत असताना या कामाचे काय झाले असा तगादा टेंडरनामाने लावताच दोन दिवसांपूर्वी आमदार संजय शिरसाट यांनी रस्त्याचा भूमिपूजन सोहळा पार पाडला. मात्र या भागात अद्याप महानगरपालिकेने ड्रेनेज प्रकल्पाचे काम सुरू केले नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जलवाहिनीचे जाळे पसरले नाही. मग आधी रस्ते तयार करून पुन्हा तोडफोड करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.