Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : 'टेंडरनामा'च्या वृत्तानंतर अधिकाऱ्यांना साक्षात्कार; 'ते' धोकादायक खांब...

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको एन-२ झोन क्रमांक-६ अंतर्गत मुकुंदवाडी सोहम मोटर्स ते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत महापालिकेच्या सर्व्हिस रस्त्यात उभे असलेले व वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे विजेचे खांब व लाईन काढण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशा आशयाचे पत्र वार्ड अभियंता मधुकर चौधरी यांनी महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना ७ फेब्रुवारी रोजी दिले आहे. त्याला महावितरण कंपनीने प्रतिसाद दिला असून, लवकरच वीजेचे खांब हटविण्यात येणार असल्याने आता खऱ्या अर्थाने येथील वाहतूक कोंडी फुटणार आहे. महापालिकेने वीजेचे खांब न हटविताच सर्व्हिस रस्त्याचे डांबरीकरण सुरू केले होते. अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारावर "टेंडरनामा"ने प्रहार करताच अधिकाऱ्यांना वीजेचे खांब मधोमध असल्याचा साक्षात्कार झाला अन् ते खांब हटवण्याबाबत हालचाली सुरू केल्या.

झोन क्रमांक-६ सिडको एन-२ मुकुंदवाडी परिसरातील सोहम मोटर्स ते शिवछत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत जालनारोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सर्व्हिस रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त नगरविकास विभागाने शहरातील पायाभूत सुविधांसाठी दिलेल्या ५० कोटी रूपयातून या कामासाठी ७० लाख रूपये खर्च केले जात आहेत. त्यातून डांबरीकरण, फुटपाथ व सुशोभिकरणाचे काम महापालिका प्रशासन करत आहे. यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी या कामासाठी टेंडर काढण्यात आले होते. टेंडर प्रक्रियेत ६.८७ इतक्या कमी टक्के दराने सहभाग घेतलेल्या शितल पहाडे यांच्या बालाजी सिव्हिल इंडस्ट्रीज कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

महापालिकेने कंत्राटदार पहाडे यांना १४ डिसेंबर २०२३ रोजी कार्यारंभ आदेश दिला होता. त्यांनी वेळेत कामही सुरु केले होते. मात्र हे काम करताना काही मालमत्ताधारकांनी आक्षेप घेत काम बंद पाडले होते. तब्बल दोन महिने काम थांबवले होते. त्यानंतर महापालिकेचे कार्यकारी अभियंता बी. डी. फड, वार्ड अभियंता मधुकर चौधरी व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. दरम्यान मालमत्ताधारकांची फड यांनी समजूत घातली. दरम्यान सोहम मोटर्स ते शिवछत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत सर्व्हिस रस्त्यालगत वीजेचे खांब, लाईन व रोहित्रे असल्याचे "टेंडरनामा"ने निदर्शनास आणून दिल्यानंतर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली व आता हा मोठा अडथळा दूर होणार असल्याचे वार्ड अभियंता मधुकर चौधरी यांनी "टेंडरनामा" प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.