sambhajinagar
sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : दमडी महल ते चंपा चौक रुंदीकरणाच्या नुस्त्याच बाता; 700 मालमत्ताचे मार्किंग, पण कारवाई कधी?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनग (Chhatrapati Sambhajinagar) : तत्कालीन महानगरपालिका आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या आदेशानंतर शहर विकास आराखड्यातील चंपा चौक ते जालना रोड या ६० फुटी रस्त्यासाठी ७ डिसेंबर २०१५ रोजी महानगरपालिकेने सुमारे ७०० पेक्षा जास्त रस्ता बाधित सामान्यांपासून बड्याच्या मालमत्तावर मार्किंग केले होते. यात काही बड्या राजकीय आणि व्यापाऱ्यांच्या मालमत्ताचा देखील समावेश होता. महानगरपालिकेने मार्किंगची कारवाई हाती घेताच दमडी महल - चंपा चौक - रेंगटीपुरा - कैसर काॅलनी - जालना रोड हा रस्ता मोकळा होणार असल्याची वार्ता शहरभर पसरताच छत्रपती संभाजीनगरकरांनी वाहतूक कोंडीतून सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र सिंघम फेम केंद्रेकरांची मोहीम थंडावली अन् या महत्त्वाच्या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून रुंदीकरणाची चर्चाच राहिली.‌ प्रत्यक्षात मार्किंग करूनही रुंदीकरणाचे घोडे अडले कुठे, हा संशोधनाचा विषय आहे.

याआधी २०११-१२ दरम्यान महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी शहरातील १४ रस्त्यांचे रुंदीकरण केले होते. त्याच वेळी त्यांनी चंपा चौक ते जालना रोड या नव्या रस्त्यासाठी मार्किंग करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु दरम्यानच्या काळात त्यांची बदली झाली आणि ही मोहीम थांबली.

डिसेंबर २०१५ मध्ये सुनील केंद्रेकर यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर चंपा चौक ते जालना रोड या प्रस्तावित रस्त्यासह शहर विकास आराखड्यातील काही रस्त्यांची पाहणी केली होती. त्यांनी सर्वप्रथम दमडी महल -  चंपा चौक - रेंगटीपुरा - निजामगंज - भवानीनगर - जालना रोड या अडीच किलोमीटर लांब आणि साठ मीटर रुंद रस्त्याचे मार्किंगचे काम सुरू करण्याचे आदेश नगररचना विभागाला दिले होते. ७ डिसेंबर २०१५ रोजी नगररचना विभागाने रस्त्याच्या मार्किंगचे काम केले होते. यात जवळपास सातशे मालमत्तावर लाल निशाण मारण्यात आले होते.

या रस्त्यात चंपा चौक, रेंगटीपुरा, कैलासनगर, भवानीनगर, नवाबपुऱ्याचा काही भाग आदी परिसर बाधित होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. दाट लोकवस्ती असलेल्या या परिसरात चार ते पाच दशकांपासूनची घरे आहेत. अर्थात १९९१ च्या शहर विकास आराखड्यापूर्वीची या भागात घरे आहेत. मात्र हा रस्ता तयार झाल्यानंतर जालना रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होईल, तसेच दक्षिण व उत्तर शहराला जोडणारा हा एक नवीन दुवा ठरेल.

जुन्या शहरात जाण्यासाठी सध्या मोंढानाका, महर्षी दयानंद चौक, सेव्हन हिल्स हे पर्यायी रस्ते आहेत. तथापि सेव्हन हिल्स वगळता अन्य रस्ते अरूंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. शहर विकास आराखड्यातील हा कागदावरचा रस्ता प्रत्यक्षात अमलात आणला तर शहरात पूर्णपणे नव्या स्वरूपाचा हा पहिलाच रस्ता ठरेल.

विशेष म्हणजे केंद्रेकरांना रस्त्याचे महत्व पटल्यावर त्यांनी बाधीत मालमत्तांवर मार्किंगसाठी दोन पथक तयार केले होते. ७ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०१५ सलग आठ दिवस मार्किंगचे काम सुरू होते. दरम्यान ज्या भागात मार्किंग त्या भागात मोठा जमाव जमायला उशिर लागत नव्हता. सिंघम फेम केंद्रेकरांनी मोहीम हाती घेताच घरे पडण्याच्या धास्तीने या परिसरात अस्वस्थता निर्माण झाली होती.

मार्किंगनंतर केंद्रेकरांनी भूसंपादनाबाबत निर्णय घेतला होता. मात्र मालमंत्ता धारकांना रोख मोबदला न देता पर्यायी जागा किंवा टीडीआर देण्याची तयारी केंद्रेकरांनी दर्शविली होती. दोन वर्ष ही प्रक्रिया राबवली जाणार होती. मात्र केंद्रेकरांकडून प्रभारी आयुक्त पदाचा कारभार काढल्यानंतर मोहीम कामयची थंडावली. 

अतिक्रमण जैसे थे! 

दरम्यान दमडी महल ते चंपा चौक ते रेंगटीपुरा कैसर काॅलनीपर्यंत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. दमडी महल ते चंपा चौक पर्यंत काम कसेबसे फत्ते करण्यात आले. मात्र पुढे चंपा चौक ते रेंगटीपुरा कैसर काॅलनीपर्यंत शहर विकास आराखड्यातील ३० मीटर रस्त्यालगत अनेक मिळकत धारकांनी रस्त्याचा जागेचा वापर दुकाने, हॉटेल व इतर व्यवसायासाठी केला होता. दरम्यान पुढील रस्ता बांधकामासाठी मोठा अडथळा निर्माण झाल्याने सिमेंट रस्त्याचे बांधकाम रखडले होते.

महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी १२ मे २०३३ रोजी या ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई करत तिक्रमण विभागामार्फत सलग दोन दिवस कारवाई केली. चंपाचौक ते कैसर कॉलनी पर्यंत मागील ५० वर्षांपासून असलेले अतिक्रमण काढले होते. त्यामुळे या रस्त्याला अडथळा निर्माण करणारे सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली होती व रस्ता मोकळा करण्यात आला होता.

मात्र तातडीने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या कारभाऱ्यांनी रस्त्याचे काम हाती न घेतल्याने या सर्व अतिक्रमणधारकांनी पुन्हा अतिक्रमण "जैसे थे " केले आहे. गत आठ महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडल्याने चंपाचौक ते रेंगटीपुरा कैसर काॅलनीपर्यंत वाहतूक कोंडी जैसे थे दिसून येत आहे.