Garden
Garden Tendernama
मराठवाडा

CSN : श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाकडे भाजप मंत्र्यांचाच कानाडोळा

टेंडरनामा ब्युरो

संभाजीनगर (Sambhajinagar) : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आणि माजी नगरसेविकाच्या प्रयत्नांना अपयश यामुळे वार्ड क्रमांक - ९९ प्रभाग क्रमांक - ७ येथील माजी केंद्रीय मंत्री डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानांची स्थिती विदारक झाली आहे. अगदी स्मशानकळा आलेल्या या उद्यानाकडे भाजपचे केंद्रीय वित्त मंत्री आणि सहकारमंत्र्यांचे देखील का दुर्लक्ष आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तळ्यात पाण्याऐवजी उकिरड्यांचे प्रस्त वाढले असल्याने खेळण्यासाठी येणाऱ्या बाळगोपाळांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

कोण होते मुखर्जी

६ जुलै १९०१ मध्ये बंगालमध्ये जन्मलेले डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगाली भाषक गृहस्थ भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जाता असत. त्यांनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचेच नाव पुढे भारतीय जनता पक्ष झाले.

पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते देशाचे वाणिज्य व उद्योगमंत्री होते. आजही त्यांच्या नावाने अपघात योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना व जन - वन विकास योजना राबवल्या जातात. मात्र त्यांच्या नावाने असलेल्या उद्यानालाच स्मशानकळा प्राप्त झाली आहे, हे विशेष. आता केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार आहे. शहरात विदेशी पाहुणे भेट देणार म्हणून तातडीने ५० कोटीचा निधी दिला. त्यामुळे त्यांचे येण्या जाण्याचे मार्ग उजळले. आता या उद्यानासह शहरातील सर्वच उद्यानांचा कायापालट करण्यासाठी सत्तेतील आमदार आणि मंत्रिमहोदयांनी प्रयत्न करायला हवेत.

तत्कालीन मनपा आयुक्त डी. एन. वैद्य यांनी शासनाच्या विशेष अनुदानातून महापालिकेमार्फत १९९७ मध्ये डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान अद्ययावत केले होते. कालांतराने मात्र महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले. सद्यस्थितीत महापालिका हद्दीत शहराच्या दक्षिणेला जय विश्वभारती काॅलनीत एकमेव मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उद्यानाची दुरवस्था झालेली आहे.

प्रवेशद्वारापासूनच समस्यांना सुरूवात होते. येथे असलेल्या बोटावर मोजण्याइतक्या खेळण्यांची , खुल्या क्रीडांगाची व जाॅगिंग ट्रॅकसह पथदिव्यांची मोडतोड झालेली आहे. घसरगुंडीच्या खाली भले मोठे खड्डे आहेत. यामुळे घसरगुंडी चांगल्या स्थितीत असतानाही तिचा वापर होत नाही. झोपाळे, पाळणे, सी-सॉ या खेळण्यांची मोडतोड होऊन गायब झाले आहेत, मात्र कोणीही लक्ष देण्यास तयार नाही.

उद्यानात प्रवेश केल्यावरच आतल्या बाजूस खोलगट भाग तयार करून त्याच्या चारही बाजुने दगडाची पिचींग केलेली आहे. एकेकाळी उद्यानाच्या उशालाच असलेला जलकुंभ ओव्हरफ्लो झाल्यानंतर थेट जलकुंभाच्या जमीनस्तरावरून काॅंक्रिट नालीने पाणी तलावात यायचे. पाण्याने गच्च भरलेल्या तलावातून उद्यानातील हिरवळ जीवंत ठेवन्याचे काम माळी करायचे. आता तलावात अक्षरश: उकिरडा साचला आहे. यामुळे उद्यानात प्रवेश करतानाच कुबट वास येतो. महापालिकेने येथे आकर्षक मिनी क्रीडांगण तयार केले होते. त्यात विविध शाळेतील सहली येत असत. पॅव्हेलियनवर बसलेले विद्यार्थी शिक्षकांचे मार्गदर्शन ऐकत असत.

आसपासच्या काॅलनीतील नागरीक देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करत असत. येथे डबे खाणाऱ्या चिमुकल्यांना सावलीचा आधार देणारा पॅगोडा देखील निराधार झाल्याने छताखाली त्याच्याच ओट्याला उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. उद्यानात झाडाफुलांसाठी पाण्याची कायमची सोय नाही. महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यावर त्याची मदार आहे. जिथे शहरातल्या नागरिकांनाच आठ दिवसाला एकदा पाणी मिळते, तिथे उद्यानातील झाडांना कसे मिळणार?

समोरच असलेल्या फलकावर देखील मुखर्जींच्या नावाचे नामोनिशान मिटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पथदिवे देखील बंद असल्याने रात्रीच्या काळोखात हे उद्यान की स्मशान असा प्रश्न पडतो.