Amrut Garden
Amrut Garden Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar: कोणी घेतला सिडकोतील अमृत उद्यानाचा बळी?

टेंडरनामा ब्युरो

संभाजीनगर (Sambhajinagar) : सिडको (Cidco) एन - तीन या हायप्रोफाईल वसाहतीत असलेले अमृत उद्यान फुलवण्यासाठी महापालिका कारभाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, लाखो रुपये लावून पालापाचोळा आणि धुळीने माखलेला उद्यानातील अकराशे मीटरच्या जाॅगिंग ट्रॅकची स्वच्छता करावी, उद्यानातील रानटी गवत, झाडेझुडपे काढावीत, बागेची शोभा घालवणारे नगरसेवक तथा माजी उपमहापौरांच्या नावासह आडवे पडलेल्या भंगार बाकड्यांची विल्हेवाट लावावी, उद्यान विकसित करण्यासाठी महापालिका प्रशासकांनी स्वतः पुढाकार घेऊन पाहणी दौरा केल्यास उद्यान तथा वृक्षप्राधिकरण अधिकारी निदान स्वच्छतेचे काम तरी हाती घेतील, अशी माफक आशा येथील करदाते करत आहेत. 

सिडको एन - तीन या हायप्रोफाइल वसाहतीतील रहिवाशांच्या मागणीमुळे माजी महापौर तथा या भागातील माजी नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या पुढाकाराने ‘अमृत’ उद्यानातील काही वर्षापूर्वी स्वच्छता करण्यात आली होती. सुरक्षाभींत बांधून तेथे तब्बल अकराशे मीटरचा भव्य जाॅगिंग ट्रॅक बांधन्यात आला होता. लोकांनी त्यावर पुन्हा धावायला सुरूवात केली होती. मात्र, गेल्या सात ते आठ वर्षांपासून महापालिका उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाचे या अमृत उद्यानाकडे दुर्लक्ष केल्याने बंद पडलेल्या उद्यानातील झाडांना वाळवी लागली आहे.

याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर प्रतिनिधीने प्रत्यक्ष उद्यानाची पाहणी केली असता  राजकीय लोकप्रतिनिधीची अनास्था आणि कुणाचाही वचक नसलेले अधिकारी यांच्यामुळे अमृत उद्यान  पार कोमात गेल्याचे दिसले. 

राजकीय अनास्थेमुळे गेल्या आठ वर्षांपासून बंद असलेल्या अमृत उद्यानातील हायमास्ट देखील बंद आहे. उद्यानाची स्वच्छता करावी, जाॅगिंग ट्रॅक पालापाचोळा आणि धुळमुक्त करावा , यासाठी येथील रहिवाशी महापालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र अद्याप विकासाची कामे सुरू झाली नाहीत.

भाजपचे  माजी नगरसेवक तथा उप महापौर प्रमोद राठोड यांनी  येथील उद्यानात बाकड्यांची सोय केली होती. हायमास्ट लावला होता. जाॅगिंग ट्रॅकची बांधला होता. नियमित स्वच्छता राहत असे. झाडेही लावली होती. मोठ्या प्रमाणात उद्यानाचा कायापालट  झाल्यानंतर येथे लोकांचा मोठा वावर वाढला होता.  मात्र नंतरच्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना करण्यात आली. त्यानुसार राठोड यांचा प्रभाग बदलला गेला. त्यानंतर अमृत उद्यानातील बालगोपाळांचे प्रमुख आकर्षण असलेल्या खेळण्या, जाॅगिंग ट्रॅककडे दुर्लक्ष झाले. उद्यानाचे वाळवंट झाले. त्यामुळे लोकांचा वावर कमी झाला.  उद्यान पुन्हा  फुलवण्यासाठी नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा  केला , पण परिणाम शून्य.

कारभाऱ्यांचे दुर्लक्ष

महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपुष्टात आल्यानंतर कारभार प्रशासकांच्या हाती आला. उद्यान विकसित करण्यासाठी नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार कामांसाठी संबंधित विभागाने कामे अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. कोणत्याही विकासकामांना प्रारंभ झाला नाही.