Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

शिंदे सरकार आले; आता 'या' रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण होणार

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : ग्रामीण भागातील दळणवळण सोयीस्कर होण्याकरिता माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे (नाना) यांच्या प्रयत्नातून भाजपच्या कार्यकाळात तीन वर्षापूर्वी चिकलठाणा ते लामकाना या २१ किमी पैकी ११ किमी रस्त्याचे विशेष दुरूस्ती अंतर्गत बांधकाम सुरू केले होते. पण पुढे भाजप सरकार कोसळले अन् निधी अभावी काम अर्धवट सोडून ठेकेदाराने यंत्रणा पसार केली. ठेकेदाराच्या अशा अडेलतट्टू धोरणामुळे मात्र नागरिकांना रहदारीला अडचण निर्माण होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद यांच्या अखत्यारीतील चिकलठाणा-महालपिंप्री-पिरवाडी-वडखा-वरझडी-गेवराई कुबेर-लामकानापर्यंत रस्त्याच्या दुरूस्तीचे काम गेल्या तीन वर्षापासून रखडलेले आहे. या कामाकरिता ११ कोटी रुपयांची मंजुरी आहे. या रस्त्याचे काम औरंगाबादच्या अमन कन्सट्रक्शनचे शेख जाॅनी यांच्याकडे आहे.त्यांनी शिवप्रसाद आढे या लेबर काॅन्ट्रक्टर मार्फत दुरूस्तीचे काम सुरू केले होते. तीन वर्षात झालेल्या दुरूस्तीवर खड्डे पडल्याने पुन्हा अडचणीत भर पडली आहे.

चिकलठाणा सुखनानदीच्या पुलापासून महालपिंप्रीकडे जाणारा साडेतीन ते कुठे चार मीटरचा रस्तावर खडीकरण मजबुतीकरण केले आहे. पुढे प्रत्येक गावाच्या दोन किमी अंतरावर खडीकरण व मजबुतीकरण झाले आहे. परंतु, त्यावर डांबरीकाम अर्थात कारपेट आणि सिलकोट केलेच नाही.

रस्त्याचे अर्धवट बांधकाम करून ठेकेदाराने तीन वर्षापासून यंत्रणा पसार केली आहे. आता शिंदे सरकारात भाजप सरकार असल्याने निधी मिळायला अडचण येणार नाही. आता निधी मिळेल, पण पावसाळ्यात डांबरी काम करता येत नसल्याने दिवाळीनंतरच रस्त्याचे काम सुरू होईल, असे ठेकेदार म्हणत आहेत. परंतु गेल्या तीन वर्षापासून काम पूर्णतः बंद पडले असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. ठेकेदाराला निधी न मिळाल्यामुळे काम अर्धवट सोडून तो गायब झाला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांच्याकडे विचारणा केली असता निधी मिळाला नाही हे खरे आहे. आता हा रस्ता गुळगुळीत करून देऊ अशी हमी ते देत आहेत.