road
road Sambhajinagar
मराठवाडा

छत्रपती संभाजीनगरातील रस्त्यांवर नेहमीच साचते पावसाचे पाणी कारण...

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : गेल्या तीन दिवसांपासून शहर व परिसरात अवकाळी पाऊसाचे जोरदार आगमन झाल्याचे सर्वत्र आल्हाददायक वातावरण निर्माण झाले असले तरी, या पावसामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रकार घडू लागले आहेत. अवकाळी पावसाच्या पाठोपाठ पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेने वेळीच उपाययोजना म्हणून शहरात ज्या- ज्या ठिकाणी तळे साचते अशा सर्व ठिकाणांचे सर्वेक्षण करून तेथे पर्याय शोधणे गरजेचे आहे. अन्यथा भर पावसाळ्यात नागरिकांच्या हाल अपेष्टा वाढतील. शहरात अपघाताचे चित्र निर्माण होईल.

थोडा पाऊस झाला तरी, शहरातील रस्त्यांवर तळे साचू लागले असून, शहरातील बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगपूरा, टिळकपथ, गुलमंडी, देवगिरी महाविद्यालय रोड, अग्रसेन चौक, जालना रोड, कॅनाॅट परिसर, शासकीय दुध डेअरी, बीड बायपास, आमदार रोड, देवळाईरोड व अन्य परिसरात तर चक्क गुढग्याएवढे पाणी साचून जनजीवन विस्कळीत होत आहे. महापालिकेच्या वतीने पावसाळापूर्व गटारी, नाल्यांची साफसफाई करण्यात येत असली तरी, पहिल्याच अवकाळी पावसात त्याचे पितळ उघडले पडले आहे. उंच, सखल भाग, पाण्याचा निचरा होण्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे जागोजागी पाणी साचत असून, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा जालीम उपाय अद्याप महापालिकेला सापडलेला नाही. शहरातील बहुतांश रस्ते अवकाळी पावसामुळे दिसेनासे झाले होते. त्यामुळे वाहनधारकांची नेहमीच तारेवरची कसरत वाढली आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे सिडको उड्डाणपुलाखाली मुकुंदवाडी स्मशानभूमी ते एपीआय क्वार्नर लगत असलेला रस्ता पावसाच्या पाण्याने दिसेनासा झाला होता. गुडग्याइतक्या पाण्यातून पादचाऱ्यांना व वाहनधारकांना नेहमीच तारेवरची कसरत करावी लागते. बीड बायपासवर पावसाळ्यात पावसाचे पाणी नेहमीच साचून परिसरातील बंगल्यांमध्ये शिरत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. महापालिकेच्या वतीने शहरात कोट्यावधी रूपयांची सिमेंट रस्त्यांची कामे केली गेली. मात्र रस्त्याच्या बाजूंनी पावसाळी नाल्यांची काम करण्यात येत नसल्याने शहरात दरवर्षी रस्त्यांवर तळे साचते. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावर कॅम्ब्रीज चौक ते नगरनाका रस्त्याच्या कडेला सिमेंट नाल्याचे बांधकाम केले. परंतु तरीही पाऊस पडल्यावर जालना रोडवर मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचे तळे निर्माण झाल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरतो. महापालिकेने सरकारी अनुदानातून बांधलेल्या काही रस्त्यांवर कोट्यावधी रुपये खर्च करून पावसाळी नाले तयार करण्यात आले  तरी परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते व मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने प्रवाशांच्या जीविताला देखील धोका आहे.‌ तत्कालीन सिडको प्रशासनाने सिडको-हडकोची निर्मिती करताना सिमेंटच्या नाल्या बांधल्या होत्या. सिडकोचे महापालिकेत हस्तांतरण झाले आणि या नाल्याच गायब झाल्या. काही ठिकाणी या नाल्या अजुनही आहेत.‌ मात्र महापालिकेकडून त्यांची देखभाल दुरूस्ती केली जात नाही. त्यात सिमेंट रस्त्यांची उंची वाढल्याने पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरात व दुकानात शिरते.

शहरातील कुठल्याही रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नाल्यांची व्यवस्था नसल्याने व रहिवाशांनी आपापल्या सोईने बेशिस्तपणे घरे उभारली असल्याने अंतर्गत रस्ते व नाल्या अस्ताव्यस्त झालेल्या आहेत. टीव्हीसेंटर ते हडको एन-तेरा मार्गावर हमखास पाणी साचते.त्यामुळे  वाहनांना अडथळा निर्माण होतो.अमरप्रित ते एकता चौक परिसरात पाणी वाहून जाण्यासाठी नाले बांधलेले असले तरी त्यातून पाण्याचा निचरा होण्याऐवजी तेच पाणी रस्त्यावर येऊन चिखल साचतो त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. सिडको-हडको भागातील जुन्या उघड्या गटारी यांची तुटफूट झाली असून मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. लोकसंख्येच्या मानाने गटारी छोट्या पडत आहेत. तसेच उघड्या गटारीमुळे त्यात घाण, केरकचरा, प्लॅस्टिक पिशव्या, दगड-गोटे पडत असल्याने त्या तुंबत आहेत. यामुळे अनेक भागात नव्याने ढापे टाकलेल्या मोठ्या गटारी करणे गरजेचे आहे. तसेच चढ-उतार भागामुळे गटारीचे काम करताना त्यादृष्टीने खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच ज्या ठिकाणी खोलगट भाग आहे व त्यांच्या आजूबाजूचे रस्ते त्यापेक्षा उंचावर आहेत, अशा ठिकाणी रस्त्याची उंची वाढविणे गरजेचे आहे.