Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

वाढदिवशी मनोजने असे काही केले की सारे औरंगाबाद पाहतच राहिले!

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : वाढदिवस म्हणजे केक कापणे, मित्रांना पार्टीसाठी निमंत्रित करणे, जल्लोष करणे, असेच चित्र आपल्यासमोर उभे राहते; मात्र या प्रथेला फाटा देत औरंगाबादेतील मनोज मेहरे या युवकाने बुधवारी (ता. २६) औरंगाबाद शहराची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या जालना रस्त्यावरील खड्डे बुजवून स्वतःचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. 

युवकांमध्ये वाढदिवसानिमित्त जल्लोष करण्याची पद्धत रुढ होते आहे. वाढदिवस जंगी पद्धतीने साजरा केला जातो, काही जण विधायक पद्धतीने म्हणजे विविध शाळांमध्ये अनाथ, अपंग, अंध मुलांच्या सोबत वाढदिवस साजरा करतात. वाढदिवसानिमित्त उपक्रमही घेतले जातात; मात्र या सर्वांपेक्षा वेगळा वाढदिवस औरंगाबादमधील मनोजने साजरा केला. समाजासाठी आपणही देणे लागतो, म्हणून खारीचा वाटा उचलता आला पाहिजे, अशी भावना ठेवून मनोजने अतिशय वेगळ्यापद्धतीने वाढदिनी काम केले.

जालना रस्त्यावरील जळगाव टी पाॅइंट उड्डाणपुलाखाली रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा नव्हे तर आरपार आठ फूट लांबी, चार फूट रुंदी आणि दीड फूट खोली असलेला खड्डा म्हणजे या मार्गावरील दररोज पाच लाख वाहनधारकांसाठी मौत का कुऑं बनला होता.

डोळ्याने पाहिला होता मृत्यू

मनोज मेहेरे नोकरीनिमित्त दररोज या रस्त्याने जात येत असतो. त्यात गत चार महिन्यांपूर्वी याच खड्ड्यात साडेतीन वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ एक दुचाकीस्वार युवकही गंभीर जखमी झाला होता. या दोन्ही घटनांचा साक्षीदार असलेल्या मनोजने हा महाकाय खड्डा बुजवून आपण काही प्रमाणात तरी दिलासा द्यावा असा विचार केला. स्वतःच्या वाढदिवशी हा महाकाय जीवघेणा खड्डा स्वखर्चाने बुजविण्याचा निर्णय त्याने घेतला. 

यासाठी त्याने सिमेटच्या पाच गोण्या, खडी, मुरूम आणला. पाण्याची व्यवस्था केली. वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी फायबर बॅरिकेट्सची व्यवस्था केली. त्याने एपीआय क्वार्नर ते मुकुंदवाडी दरम्यान अशाच पध्दतीने चार खड्ड्यांची निवड केली. ते खड्डे स्वखर्चाने सिमेंट, रेती आणि खडी मिक्‍स करून बुजविले. सोमवारी दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत मजुरांच्या मार्फत त्यांनी खड्डे बुजवून वाढदिवस साजरा केला. या त्याच्या कामाचे माजी नगरसेवक मनोज गांगवे, मनोज बोरा, शिवसेना शहर प्रमुख ज्ञानेश्वर डांगे, माजी सभागृह नेता राजू वैद्य, माजी महापौर किशनचंद तनवानी यांनी कौतुक केले.

वाढदिवस किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तर मोठ्या प्रमाणात वायफळ खर्च केला जातो. समाजात अनेक प्रश्‍न आहेत. हे आव्हान पेलण्यासाठी अनाठायी खर्च टाळून खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला तर मोठे काम उभे राहू शकते. 

- मनोज मेहरे