Tunnel
Tunnel Tendernama
मराठवाडा

मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी असणाऱ्या ‘नीरा- भीमा नदीजोड’ला आणखी 2 वर्षांची प्रतिक्षा

टेंडरनामा ब्युरो

वालचंदनगर (Walchandnagar) : मराठवाड्यासाठी महत्त्वाकांक्षी असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या १९ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून, ८ पैकी ५ बोगदे एकमेकांना जोडण्यामध्ये यश आले असून, काम वेगाने सुरू आहे. काम पूर्ण होण्याला आणखी दोन वर्षे लागतील, अशी शक्यता आहे.

१२०० मीटर उघडा कालवा

नीरा-भीमा नदी जोड प्रकल्पाच्या कामाचे टेंडर सन २००९ मध्ये झाले आहे. साधारण सन २०१२च्या सुमारास प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. अनेकवेळा काम बंद होते. एकूण प्रकल्पाची लांबी २३.८० किलोमीटर असून, २२.४० किलोमीटर लांबीमध्ये बोगदा आहे. तसेच, डाळज बाजूकडे ३०० मीटर व तावशी बाजूकडे १२०० मीटर उघडा कालवा तयार करण्यात येणार आहे.

आठ ठिकाणी खोल विहिरी

बोगद्यामध्ये जाण्यासाठी आठ ठिकाणी खोल विहिरी (शाफ्ट) खोदल्या आहेत. त्यामधूनच बोगद्यातील दगड व इतर साहित्य बाहेर काढण्यात येते. सहा बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. बोगद्याच्या एकूण २२.२४ किलोमीटर लांबीपैकी १९ किलोमीटर लांबीमध्ये बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत आठपैकी पाच बोगदे एकमेकांना जोडण्यामध्ये यश आले आहे.

७ टीएमसी पाणी भीमा नदीत येणार

बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यामध्ये नीरा नदीमधून वाया जाणारे नीरा नदीवरच्या तावशीजवळील बंधाऱ्यातून बोगद्याद्वारे भादलवाडीजवळ उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये भीमा नदीत येणार आहे. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी जमिनीमध्ये झिरपू नये, यासाठी संपूर्ण बोगद्याला सिमेंट क्रॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर १८७२ क्यूसेकने ४३ दिवसांमध्ये ७ टीएमसी पाणी नीरा नदीमधून भीमा नदीत जाणार आहे. त्यानंतर भीमा नदीतून जेऊरच्या बोगद्याच्या माध्यमातून सोना- कोळेगाव प्रकल्पामध्ये पाणी जाणार आहे. या प्रकल्पामधून उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याला पाणी मिळणार आहे.

नीरा-भीमा प्रकल्पाची वैशिष्ट्ये

एकूण प्रकल्पाची लांबी- २३.८० किलोमीटर

बोगद्याची लांबी- २२.२४ किलोमीटर

बोगद्याची उंची- ८ मीटर

बोगद्याची रुंदी- ८.२५ मीटर

बोगद्याचे पूर्ण झालेले काम- १९ किलोमीटर

बोगद्याची जमिनीपासून खोली- ४० ते ८३ मीटर