औरंगाबाद (Aurangabad) : सोलापूर-धुळे (एनएच 52) या राष्ट्रीय महामार्गाचा तिसरा टप्पा असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील करोडी ते कन्नड मार्गावरील हतनूर टोलनाक्याजवळील स्वच्छतागृहाची स्कायलार्क कंपनीकडून मंगळवारी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. स्वच्छतागृहाची आतून - बाहेरून स्वच्छता करण्यात आली. तसेच दारे - खिडक्यांचे कडीकोंडे बदलण्यात आले. वाॅशबेसिंनलगत सर्व नळाच्या तोट्या बदलण्यात आल्या. पुरेशा पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आल्याचे सहाय्यक अभियंता आशिष देवतकर यांनी टेंडरनामाशी बोलताना सांगितले. याशिवाय स्वच्छतागृहासह इतर कोणकोणत्या सुविधात त्रुटी आहेत. याचे निरीक्षण करून कंपनीला दंड देखील आकारण्यात येणार असल्याचे देवतकर यांनी स्पष्ट केले.
धुळे - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचा तिसरा टप्पा करोडी-करोडी-माळीवाडा - कन्नड दरम्यान हतनूर येथील टोलनाक्याचे कलेक्शन आणि नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी नॅशनल हायवेच्या दिल्ली मुख्यालयाने फेब्रुवारी २०२१ मध्ये खुल्ये टेंडर काढले होते. त्यात हरियानाच्या स्कायलार्क कंपनीला निश्चित करण्यात आले होते. कंपनीला डेली बेसीसवर १४ लाख ९७ हजार रुपये दिले जातात. कंपनी वाहनकरापोटी मिळालेल्या महसुलातून प्रत्येक आठवड्याला १ कोटी ७ लाख ६६ हजार रुपये नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडियाच्या (NHAI) तिजोरीत भरते. अत्तापर्यंत वाहनकरातून कंपनीकडे ६५ कोटी ५७ लाख ६८ हजार ६३४ रूपये महसूल प्राप्त झालेला आहे.
नाक्यावर सुविधांची वाणवा
कोट्यवधीचा महसूल जमा करणाऱ्या या टोलनाक्यावर स्वच्छ प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, फोस्टेज रिचार्ज, पी.ओ.एस.सेंटर, रुग्णवाहिका आदी सुविधा देणे कंपनीचे कर्तव्य आहे. मात्र येथील अस्वच्छ स्वच्छतागृहाची बाब छायाचित्रासह राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय जाधव पाटील यांनी समोर आणली होती. त्याचा टेंडरनामाने पाठपुरावा केला होता.
धक्कादायक म्हणजे औरंगाबाद विभागाअंतर्गत पारगाव, पाडळशिंगी, भोकरवाडी - माळेवाडी, करोडी येथील टोलनाक्यांवर देखील नागरिसुविधांना झोल दिला जात असल्याची बाब समोर आली. कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा करणाऱ्या NHAIचे सेवा - सुविधांकडे दुर्लक्ष असल्याचे झाल्याचे उघड झाले होते. या संदर्भात 'टेंडरनामा'ने २३ ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते.
मराठवाड्यातून संताप
'टेंडरनामा'ने वृत्तमालिका प्रकाशित करताच संपूर्ण मराठवाड्यातून प्रकल्प संचालक अरविंद काळे यांच्या हलगर्जीपणावर संतापाची लाट पसरली. यात 'टेंडरनामा'ने महसुलाच्या आकडेवारीसह वृत्त प्रकाशित केल्याने औरंगाबादेतील शिक्षक, पत्रकार आणि राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांच्या गृपवर नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांच्या कामकाजाबद्दल अनेकांनी खेद व्यक्त केला.
त्यानंतर काळे यांनी औरंगाबाद विभागांतर्गत सर्वच टोलनाक्यांवरील सुविधांचा आढावा घेतला. सहाय्यक अभियंता अनिकेत कुलकर्णी, राहुल पाटील, आशिष देवतकर , प्रतिक कांबळे व इतर अधिकाऱ्यांना सूचना देत आयआरबी, एलएनटी, डीबीएल व स्कायलार्कसह व्ही. विद्यासागर रेड्डी या कंत्राटदारांचे कान टोचले आणि सेवासुवीधांवर लक्ष केंद्रीत करायला सांगितले. कंत्राटदारांनी देखील दिलेल्या सूचनांचे पालन करत स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली.
काळेंनी खुलासा करावा
'टेंडरनामा'चे आभार. अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला. माझ्या माहितीप्रमाणे करोडी टोल नाका व हातनूर टोल नाका या दोन्हीमधील अंतर हे फक्त ४२ किलोमीटर आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार दोन टोलनाक्यांचे अंतर हे ६० किलोमीटरच्या आत नसावे. याबद्दलही आता काळे यांनी खुलासा करावा. यासंदर्भात काळे यांच्याकडे तक्रार करूनही ते अधिकारी अतिशय बेजबाबदारीने वागत असल्याची कन्नड तालुक्यात चर्चा आहे.
- अण्णासाहेब चव्हाण, माजी सरपंच, चिकलठाण
काय म्हणतात तक्रारदार?
आम्ही गौताळा अभयारण्यातून शनिवारी औरंगाबादेत परत येत असताना वाटेत हातनूर येथील टोलनाक्यावर थांबलो. तेथील महिला व पुरूष प्रसाधनगृहाची अवस्था पाहून संतापलो. यासंदर्भात टेंडरनामाकडे व्यथा मांडली होती. टेंडरनामामध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर स्वच्छतेची व दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली. त्यासाठी टेंडरनामाचे आभार. यापुढे टोलनाक्यावर असुविधा झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल.
- संजय जाधव पाटील, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राष्ट्रवादी शिक्षक संघटना
काय म्हणतात अधिकारी?
हातनूर टोलनाक्याबाबत मागील वर्षभरात ३५ लाखाचा दंड वसूल केला आहे. सद्यस्थितीत देखील दंड आकारणार आहोत. इतर चार टोलनाक्यांवर काहीही तक्रारी नाहीत. हातनूर टोलनाक्यावरील स्वच्छतागृहाची दुरूस्ती हाती घेतली आहे. लोकही नव्या टाक्या, आरसे, हॅन्ड ड्रायर, सोफ वाॅश, तोट्या गायब करतात.अधिकृत टाॅयलेट मधून काही हाॅटेल चालक दमदाटी करून वीज कनेक्शन घेतात. टोल कलेक्शन करणारी कंपनी परराज्यातील असल्याने त्याला धमकवण्याचा पुरेपूर फायदा उचलतात.
- आशिष देवतकर, विभागीय अभियंता