Aurangabad Tendernama
मराठवाडा

संचालकांच्या कानउघाडणीनंतर अखेर राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : सोलापूर-धुळे (एनएच 52) या राष्ट्रीय महामार्गाचा दुसरा टप्पा असलेल्या औरंगाबाद हद्दीतील आडगाव-करोडी-माळीवाडा येथे रस्त्यावर दोन्ही बाजूला पडलेले खड्डे दुरूस्तीचे काम एलअँडटी कंपनीकडून गुरूवारपासून तातडीने सुरू करण्यात आले आहे. आडगाव उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना खडी व डांबर टाकून रोलिंग करून खड्डे बुजविण्यात आले आहेत. पावसाळ्यानंतर येथे दोन्ही बाजूंनी खराब झालेले सर्व थर बुडापासून काढून नव्याने पक्का रस्ता तयार करण्यात येणार असल्याचे सहाय्यक अभियंता राहुल पाटील यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.याशिवाय भुयारी मार्गातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा राबविणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

वर्षभरात रस्त्याचे पार वाटोळे

धुळे- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचा दुसरा टप्पा आडगाव-करोडी-माळीवाडा हा नवीन बीडबायपास मार्गावर आडगाव ते बागतलाव दरम्यान उड्डाणपुलाखालील जोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्ता खचून मोठे खड्डे पडले होते. याशिवाय आडगावसह बाग तलाव, गांधेली, निपाणी, बाळापुर, देवळाई, सातारा, कांचनवाडी, गोलवाडी, वाळुज, तिसगाव, करोडी, माळीवाडा येथील उड्डाणपुलाखालील भुयारी मार्गात पाणी पडल्याने सर्वत्र चिखल आणि खड्डे पडले होते.

अपघाताची भीती अन् वाहनांचा खुळखुळा

औरंगाबाद महापालिका आणि ग्रामीन हद्दीतून दक्षिण डोंगररांगाच्या महिरपमधून जाणारा नवाकोरा बायपास पहिल्याच पावसात नादुरुस्त झाल्याने आडगाव - करोडी - माळीवाडा महामार्गावर राज्य - परराज्यातील जड वाहनांसह छोट्या-मोठ्या वाहनांची जास्त गर्दी असते. आसपासच्या ग्रामस्थांची पंचक्रोशी परिसरात जाणारांचीही वर्दळ असल्याने रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाती स्थिती निर्माण झाली होती. खड्ड्यात गाडी आदळल्याने अनेक वाहनांचे पाटे तुटले होते.

टेंडरनामाच्या वृत्ताची दखल

यासंदर्भात 'टेंडरनामा'ने या वृत्तमालिकेद्वारे या रस्त्याची दुरवस्था मांडली होती. त्याची तातडीने NHAI चे प्रकल्प संचालक डाॅ. अरविंद काळे यांनी दखल घेऊन सहाय्यक अभियंता राहुल पाटील तसेच एलअँडटीचे व्यवस्थापक केतन वाखानकर यांना तातडीने आदेश देत लगेच कामही सुरू केले.

वाहतूक वळवली

आडगाव येथील उड्डाणपुलाच्या खालील दोन्ही बाजूंच्या जोड रस्त्याच्या खड्डे दुरुस्तीसाठी खडी, डांबर व रोड रोलर मागविण्यात आला होता. या दोन्ही बाजूकडील खड्डा दुरुस्तीसाठी वाहतूक बंद करून उड्डाणपुलावरून वळविण्यात आली. खड्ड्याची आधी सफाई करून त्यात खडी व डांबर टाकून रोलर फिरवला गेला. त्यानंतर पुन्हा बारीक खडी टाकून रोलर फिरवला गेला. अशाच पद्धतीने भुयारी मार्गातील रस्त्याचे खड्डे दुरुस्ती करण्यात येणार आहे. पावसाळा संपल्यावर कायमस्वरूपी दुरूस्ती केली जाणार आहे. भुयारी मार्गासह पथदिव्यांची दुरूस्तीचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे भुयारी मार्गातील पत्रे बदलून तेथे पावसाच्या पाण्याची गळती थांबवण्यासाठी एलअँडटीला तातडीच्या सुचना देण्यात आल्याचे सहाय्यक अभियंता राहुल पाटील यांनी सांगितले.