Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

कन्नड : औट्रम घाटात रुंदीकरणाचा 'घाट'; बोगद्याच्या कामाला ब्रेक

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या तिसऱ्या पॅकेजचा सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या कन्नड येथील बहुचर्चित औट्रम घाटाच्या बोगद्याला अखेर ब्रेक देण्यात आला आहे. सध्या अस्तित्वातील रस्त्यातच ३० मीटरपर्यंत चौपदरीकरण करण्याचा घाट नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) घातला आहे. याकामासाठी नव्याने डीपीआर करण्यासाठी नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडिया च्या संकेतस्थळावर टेंडर मागविण्यात आले आहेत.

निधीची तरतूद नाही

केंद्र सरकारकडून बोगद्याच्या कामासाठी निधीची तरतूद होत नसल्याने बोगद्याचे काम रद्द करून आहे त्याच रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. सोलापूर-धुळे रस्त्यावरील औरंगाबाद-धुळे पॅकेजमधील औट्रम घाटाचा टप्पा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. डोंगर पोखरुन त्यातून बोगदा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापुर्वी स्वित्झर्लंडच्या अँबार्क इंजिनिअरिंग कंपनीकडून डीपीआर करून घेतला होता. त्यात सहा प्रकारचे डिझाइन बनविण्यात आले होते.

असा प्रस्तावित केला होता बोगदा

'एनएचएआय'ने निश्चित केलेल्या डिझाइननुसार घाटात १४ हजार मीटर डोंगर फोडणे, काँक्रिटीकरण करणे, वरील भाग अर्धचंद्राकारात कापणे, बोगद्यातील इलेक्ट्रीसिटीचे काम करणे, व्हेंटिलेशन सुविधेसह हॉस्पिटल बांधण्याच्या कामांचा प्रस्तावात समावेश होता. बोगदा तयार करून त्यात सात किलोमीटरचा रस्ता प्रस्तावित केला होता. घाटातून रस्ता करताना समुद्रसपाटीपासूनचे अंतर, डोंगरकडांची उंची, रस्ता दीर्घ काळापर्यंत सुरक्षित राहावा, यासाठी मोजमापानुसार बोगद्यातून पूल करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. ज्यामुळे वाहनांच्या सुरक्षितेतला अधिक चांगला पर्याय उपलब्ध राहणार असे मानले जात होते.

सहा हजार कोटीचे टेंडर

या कामासाठी सहा कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक देखील तयार करण्यात आले होते. या कामासाठी टेंडर प्रक्रिया सुरू असतानाच देशासह जगात करोना संकट उभे राहिले. अन्य विकासकामांवरील निधी आरोग्यविषयक सुविधांकडे वळविण्यात आल्याचे कारण पुढे करत सरकारने औट्रम घाटातील बोगद्याला निधी उपलब्ध होणे अवघड असल्याचे म्हणत कामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे धुळे-सोलापूर रस्त्यावरील अन्य काम पूर्णत्वाकडे जात असताना औट्रम घाट बोगद्याच्या कामाला मात्र विघ्न लागले.

आता पुन्हा रस्ता रूंदीकरणाचा 'घाट'

औरंगाबाद-धुळे महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. घाटातून मार्गक्रमण करताना अनेक जडवाहनांचे अपघात होतात. पावसाळ्यात डोंगरावरून दगड कोसळतात. यामुळे रस्त्याचे विस्तारीकरण व मजबुतीकरणावर भर न देता वाहतूकीची कोंडी कमी करण्यासाठी घाटातून बोगदा काढण्याबाबत डिझाइन निश्चित केले गेले. औट्रम घाटातील बोगदा डीपीआर वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला गेला. त्यानंतर विविध विभागांची मान्यता घेऊन भूसंपादन, संयुक्त मोजणी प्रक्रियाही बऱ्यापैकी पूर्ण झाली होती. आता मात्र बोगदाच रद्द करून रस्त्याचे रूंदीकरण करण्यात येणार असल्याचे नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडियाचे म्हणणे आहे.

दोन हजार कोटीचा खर्च गेला सहा कोटींवर

औट्रम घाटातील बोगद्याचे काम ११ वर्षांपासून रखडलेले होते. सुरूवातीला २ हजार कोटींवरून हे काम साडेतीन हजार कोटींवर गेले. त्यानंतर ६ हजार कोटींवर बोगद्याच्या कामाचा खर्च गेला. पुन्हा बोगद्यातील काही कामे रद्द करत खर्च साडेपाच कोटींवर आणला. आजवर या बोगद्याची केवळ चर्चा झाली. प्रत्यक्षात काम सुरू झालेच नाही. आता बोगद्याच्या खर्चात कपात करण्याचा ‘घाट’ एनएचएआय मुख्यालयाकडून घातला गेला. आता तर बोगद्याचे कामच रद्द केले.