Ajintha caves
Ajintha caves Tendernama
मराठवाडा

अजिंठा व्हिजिटर सेंटर धुळखात; जपानने दिलेला कोट्यवधी निधी पाण्यात

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जपान सरकार व महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल ८८ करोड रुपये खर्च करून जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी अजिंठा व्हिजिटर (अभ्यागत) केंद्र बनविण्यात आले आहे. मात्र, सध्या हे अभ्यागत केंद्र केवळ शोभेची वस्तु बनले असून पाच ते सहा वर्षापासून बंद असल्याने त्यावर जपान सरकारने केलेला खर्च पाण्यात गेला आहे.

चार लेण्यांची प्रतिकृती जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय मार्गाच्या शेजारी असलेल्या शॉपिंग फ्लाझाजवळ जपान सरकारच्या मदतीने अजिंठा लेणीतील जशीच्या तशी पेंटिंग केलेल्या चार लेण्यांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहे. त्यातील लेणी क्र १२, १६ आणि १७ यांचा समावेश आहे. अभ्यागत केंद्रात पर्यटकांना वाहनतळ व बैठकीसाठी ५४ खुर्च्या लावण्यात आल्या आहे. भगवान बुद्ध मूर्ती, ड्रामा, मूव्ही हॉल, रेस्टॉरंट, शॉपिंग प्लाझा तसेच लिप्ट व अन्य सुविधा येथे उपलब्ध करण्यात आल्या आहे.

विशेष म्हणजे देखभाल करण्यासाठी जपान सरकारने करोडो रुपये निधी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाला दिला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सध्या जवळपास गेल्या पाच ते सहा वर्षांपासून येथील अभ्यागत केंद्र बंदच असून त्याची आता देखभाल सुद्धा होत नसल्याने आतील पेंटिंग धुळ साचून खराब होत आहे, अशीच परिस्थिती राहिल्यास अभ्यागत केंद्र नामशेष होऊन जपान सरकारने दिलेले करोडो रुपयांचा रुपये वाया जाणार आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात भारतात येणाऱ्या टी-२० परिषदेचे सदस्य येणार असल्यामुळे येथे मोठा गाजा-वाजा करीत लाखो रुपये पाणीपुरवठा व वीज पुरवठ्याच्या नावाखाली भरण्यात आले होते. मात्र, अभ्यागत केंद्र सुरु न होताच त्‍याचे वीजबिल थकले कसे असा प्रश्न पर्यटकांना उपस्थित केला आहे. सध्या बंद असलेले अभ्यागत केंद्र प्राण्यांचा निवास बनले असून काही दिवस अगोदर बिबट्याचे बछडे तिथे आढळून आले होते.

कर्मचारी झाले बेरोजगार
- येथील अभ्यागत केंद्र सुरुच न झाल्याने येथे भरती करण्यात आलेले जवळपास ५० ते ५५ कर्मचारी बेरोजगार झाले आहे. कर्मचारी कामावर नसल्याने परिसरातील बगीचाचे अस्तित्व जवळपास संपले आहे. अभ्यागत केंद्रातील पेंटिंग साफसफाई होत नसल्याने धुळीच्या विळख्यात सापडली आहे. जपान सरकारने दिलेल्या करोडो रुपयांच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे