Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगाबाद : खड्डा बुजवताना 'एमआयडीसी'च्या अधिकाऱ्यांकडून काळाबाजार

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील शहानुरवाडी ते संग्रामनगर उड्डाणपुलाच्या उतारावर गेल्या दोन आठवड्यांपासून एमआयडीसीची (MIDC) जलवाहिनी फुटली होती. यामुळे होत असलेल्या पाण्याची नासाडी आणि वाहत्या पाण्यामुळे पुलासह पुलाखालील जोड रस्त्यातील खड्डे उघडे पडत होते. परिणामी दररोज दहा ते पंधरा हजार वाहनधारकांच्या त्रासात भर पडली होती. टेंडरनामाने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सचित्र ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर एमआयडीसीने जलवाहिनीची दुरूस्ती केली. मात्र जलवाहिनीच्या दुरूस्तीनंतर येथील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यातील खड्डा बुजविण्याच्या कामात देखील अधिकाऱ्यांनी काळाबाजार केल्याने वाहनधारकांना पुन्हा अडचण निर्माण केली आहे. दरम्यान, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करत आठ दिवसात खड्डा चांगला बुजवून रस्ता टकाटक करणार असल्याचा दावा केला आहे. मात्र अधिकाऱ्यांचा हा प्रताप शहर अभियंत्यांपुढे उघड करताच त्यांनी एमआयडीसी प्रशासनाला कारवाईचा ईशारा दिला आहे. 

मनपाने बजावली नोटीस

एमआयडीसीतील कारभाऱ्यांचा खड्डा बुजविण्यातील जुगाड आणि काळाबाजार पाहताच मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी संबंधितांना तडकाफडकी नोटीस देखील दिली आहे. अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा कारभाऱ्यांचा जुगाड पाहताच या निकृष्ट कामाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज दुपारीच एमआयडीसी प्रशासनाला नोटीस बजावली आहे.

एमआयडीसीच्या कारभाऱ्यांचा असा हा जुगाड

रस्त्यावरील जलवाहिनी दुरूस्त केल्यानंतर भल्यामोठ्या पाच ते सहा मीटर खड्ड्यात चक्क बिल्डिंग मटेरियल टाकल्याने वाहनांच्या वजनाने खड्ड्या ढासळत होता. यासंदर्भात काही जागरुक नागरिकांनी टेंडरनामाकडे तक्रार केल्यानंतर प्रतिनिधीने सोमवारी सकाळी ९ च्या दरम्यान पाहणी केली असता, हे काम अतिशय तकलादू पद्धतीने केल्याचे समोर आले. बिल्डिंग मटेरियलने खड्डा बुजविलेला दिसला. त्यातील मोठमोठ दगड आणि खडी रस्त्यावर पसरल्याने तसेच धक्कादायक बाब म्हणजे अर्धवट बिल्डिंग मटेरियलचा डोंगर पुलावर तसाच ठेवल्याने अरूंद रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना त्यामुळे विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, या कामातील एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा फोलपणा व निकृष्ट कामाचा कारभार उघडकीस आला आहे. 

वाहनधारकांचा संताप

संग्रामनगर उड्डाणपुलावरील रस्ता शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असून, रहदारीसाठी नागरिक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. तसेच या रस्त्यावर सातारा, देवळाई व बीडबायपासकरांची सर्वांत जास्त वाहतूक असते. शहरातील सर्वांत जास्त वाहतूक असणारा हाच मुख्य रस्ता असतो. त्यामुळे या सर्व गोष्टी विचारात घेऊन रस्त्यावरील उकरलेल्या खड्ड्याचे काम गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, या सर्व गोष्टींकडे संबंधित अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष करीत असल्याचे एकंदरीत चित्र या घटनेवरून उभे राहिले आहे. त्यामुळे वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शहर अभियंता भडकले 

या रस्त्यावरील खड्डा बुजवताना वाहन क्षमता लक्षात घेऊन त्यात जाड मुरूम व मानकाप्रमाणे खडी न टाकताच, आहे त्या स्थितीत उकरलेले मटेरियल टाकून त्यावर पून्हा जुनाट बिल्डिंग मटेरियल टाकण्याचा प्रताप अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. ही बाब टेंडरनामाने मनपाचे  शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी तातडीने घटनास्थळाची पहाणी केली व त्यांनी थातुरमातूर होत असलेल्या या कामाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच होत असलेल्या  कामाची चित्र एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दाखवली. त्यामध्ये वर्दळीच्या या रस्त्यातील मोठ्या भगदाडाचे हे काम किती निकृष्ट दर्जाचे होत आहे, अशी विचारणा करत नोटीस देखील बजावली.

जुनाट जलवाहिनीसाठी टेंडर पे टेंडर

वाळुज एमआयडीसीतील जलशुध्दीकरण केंद्र ते चिकलठाणा एमआयडीसी अशा २० किलोमीटरसाठी तब्बल ३० कोटीचे टेंडर काढून जुन्या जलवाहिनी शेजारीच नव्या जलवाहिनीचे काम सुरू आहे. हे काम औरंगाबादेतील रूद्राणी कंन्सट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. या कामाची मुदत तीन महिने असताना , पुन्हा एमआयडीसीने जुन्या जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीसाठी १६ लाखाचे टेंडर काढले. यासाठी ए. एम. सुरकुतवार या कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. मात्र, दरवर्षी इतकी मोठी रक्कम खर्च करूनही जुन्या जलवाहिनीच्या दुरूस्ती कामाचा दर्जा राखला जात नसेल, तर याला काय म्हणावे, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर  सदर जलवाहिनीची कालमर्यादा संपली आहे. जोपर्यंत नव्या जलवाहिनीचे काम पुर्ण होत नाही, तोपर्यंत जुनी जलवाहिनी सज्ज ठेवावी लागणार आहे. जलवाहिनीत कधी काय बिघाड होईल हे सांगता येत नाही, जरी नव्या जलवाहिनीची कामाची मुदत संपत आली, तरी तीन महिन्याच्या कालावधीसाठी प्रयोजन म्हणून टेंडर काढले आहे. भविष्यात जलवाहिनी फुटली तर ऐनवेळी धानपळ होऊ नये यासाठी प्रक्रीया करून ठेवल्याचे कार्यकारी अभियंता गिरी यांनी स्पष्ट केले.

थेट सवाल : प्रशांत सरग, सहाय्यक अभियंता, एमआयडीसी.

Q :  संग्रामनगर उड्डाणपुलावरील धावपट्टीच्या उतारावरील ख॔ड्ड्यात बिल्डिंग मटेरियल का टाकले.

A :  खड्डा बुजविण्यासाठी जाड खडी आणि मुरूम मागवला होता. मात्र वाहतूक पोलिसांनी वाटेतच वाहनचालकावर कारवाई केल्याने खुप उशिर झाला होता. खड्ड्यामुळे वाहतूक खोळंबली होती. म्हणून तातडीने बिल्डिंग मटेरियल आणून ओतावे लागले.

-----

Q : पण सरकारी व अंत्यावश्यक कामकाजासाठी तर गौणखनिज वाहतूकीला जिल्हा प्रशासनाकडून शहरात परवाना असतो. कारवाई होणार कशी, दंड भरलेल्या पावत्या दाखवणार काय.

A : त्या वाहनचालकाकडे गौणखनिजाची राॅयल्टी भरल्याच्या पावत्या नव्हत्या. त्यामुळे पोलिसांनी वाहने ताब्यात घेतली.

-----

Q : पण गौणखनिज कायद्यानुसार गौणखनिजाची वाहने ताब्यात घेण्याचा अधिकार महसुल शाखेच्या अधिकार्यांना आहे. वाहतूक पोलिस दंड भरून वाहने सोडून देतात. 

A : मला याबाबत अधिक काही सांगता येणार नाही. तुम्ही आठ दिवसात येऊन बघा , आम्ही काम कसे केले , ते पहा. आठ दिवस थांबा, मग काम कसे ते ठरवा.