Tuljabhavani Temple Tendernama
मराठवाडा

आगामी साडेतीन वर्षात होणार तुळजापूरचा कायापालट; 1865 कोटींचे बजेट

पुरात्त्वीय जाण असलेल्या संस्थांना प्राधान्य

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नवरात्रौत्सवात तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी स्मार्ट क्यू मॅनेजमेंट सिस्टीम, हिरकणी कक्ष, उद्यान विविध सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी १,८६५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आगामी तीन ते साडेतीन वर्षात ही सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प तीन ते साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी माहिती परिवहनमंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी तुळजाभवानी मंदिर व शहराचा कायापालट करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजाभवानी देवी, तुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे. देशभरातून दरवर्षी १ ते १.५ कोटी भाविक श्रीक्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात. तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने शासनाने तुळजापूर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या सर्व गोष्टी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवरील सर्व संबंधितांशी चर्चा करून श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा व लागणारा निधी याचा आराखडा धाराशिवचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने तयार केला आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून ६ मे २०२५ रोजी चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता घेण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यातच या आराखड्यास प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय नियोजन विभागाने जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार विकास आराखड्यातील कामे करताना ऐतिहासिक वास्तूंची मूळ शैली जपण्याचे तसेच पुरात्त्वीय जाण असलेल्या संस्थांकडून ही कामे करून घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.