Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : जीव्हीपीर कधी सुधारणार; जलवाहिनीचे काम रखडले

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको एन-सहा भागातील ई-सेक्टर परिसरातील संभाजी कॉलनीत जलवाहिनी टाकण्यासाठी महिनाभरापासून खोदकाम करून ठेवले. मात्र अद्याप जलवाहिनी टाकण्यासाठी जीव्हीपीआर कंपनीमार्फत कुठलेही पाउल उचलले गेले नाही. पिण्याच्या पाइपलाइन साठी अरूंद गल्ल्यांमध्ये खोदकाम करून काम अपुर्ण ठेवल्याने नागरिकांना वाहने पार्कींगचा प्रश्न पडला आहे. तसेच घरातुन आत-बाहेर पाऊल टाकणे मुश्कील झाले आहे. त्याचप्रमाणे उघड्या नालीत पडून चिमुकल्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. ठेकेदार जीव्हीपीआर, महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या हलगर्जीपणामुळे येथील नागरिकांत भीती पसरली आहे.याशिवाय ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी दहादिशा भटकंती करायची वेळ आली आहे. 

सिडकोतील एन-सहा-ई-सेक्टर संभाजी कॉलनीमध्ये ड्रेनेज मिश्रित पाणी नळाद्वारे येत असल्याची समस्या पाचवीलाच पुजलेली आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा  निर्माण व्हावा , नागरिकांची दुषित पाण्यापासून सुटका व्हावी, यासाठी  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात) गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी महापालिकेतील पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाकडे गत पाच वर्ष पाठपुरावा केला. मात्र याकडे बेजबाबदार अधिकार्यांनी किरकोळ डागडुजी करत नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र समस्या 'जैसे थे'च राहीली.

आंदोलनानंतर यंत्रणेची झोप उडाली

त्यानंतर याच भागातील शेकडो नागरिकांसह नरवडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांची भेट घेत त्यांना थेट दुषित पाण्याच्या बाटल्या दाखवल्या. अखेर चौधरी यांनी तातडीने याप्रकरणी महापालिकेतील कुंभकर्णांना जागे केले. मात्र झोपेच्या धुंदीत असणार्या अधिकार्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि ठेकेदार जीव्हीपीआर मार्फत नागरिकांचे समाधानासाठी आणि प्रशासकांच्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून केवळ  कार्यवाहीच्या अहवालासाठी  फोटोपुरती कार्यवाही म्हणत संभाजी कॉलनीत फक्त नाल्या करून ठेवल्या. काम मात्र शून्य आहे.  

महिन्याभरापासून यंत्रणा पसार

जुनाट जलवाहिनीच्या शेजारी नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी महापालिकेने सुचित केलेल्या स्थळानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ठेकेदार जीव्हीपीआर कंपनीमार्फत जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम केले. मात्र गेल्या महिन्याभरापासून ठेकेदाराने अर्धवट काम सोडून यंत्रणाच पसार केली आहे. मुळात जीव्हीपीआर कंपनीने याकामासाठी शहरातील काही सबठेकेदारांची नियुक्ति करून काम सुरू केले आहे. यावर कंपनीची कुठलीही निगराणी नसते. परिणामी येथील अर्धवट कामामुळे महिन्याभरापासून ई-सेक्टरच्या गल्ल्यांमध्ये ऐन सनासुदीच्या काळात आणि भर उन्हाळ्यात दुष्काळाचे सावट गडद झाले आहे.

अशी निर्माण झाली अडचण

एकीकडे महापालिका-महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि ठेकेदार जीव्हीपीआर निर्मित दुष्काळ तर दुसरीकडे संपूर्ण गल्लींमध्ये खोदकाम करून नाल्या उकरल्याने येथील स्थानिक रहिवाशी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी गल्लीबोळात फिरता व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायीकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. 

खोदकामात फोडली ड्रेनेज लाइन

ठेकेदार जीव्हीपीआरने एका आजारावर उपाय तर शोधलाच नाही. याऊलट एकीकडे मोठ्या जखमा तयार करून त्याशेजारीच दुसरा आजार निर्माण केला आहे. खोदकाम करताना जुन्या जलवाहिनीच्या शेजारी ड्रेनेज लाईन फोडून ठेवली आहे. अनेक ठिकाणी चेंबर उघडे  झाले आहेत. चेंबर गळतीतील घाण पाणी जलवाहिनी टाकण्यासाठी केलेल्या खड्ड्यात साचल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्ग॔धी पसरलेली आहे. परिणामी उष्माघाताने आधीच हैरान असलेल्या या दाट वसाहतीतील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून दुर्गंधी आणि डासांचा सामना करावा लागत आहे. 

चिमुकल्यांना धोका पालकांचा जीव भांड्यात

दारासमोरच खोदलेल्या आरपार नाल्यांत चिमुकली पडून मोठी दुर्घटना घडू शकते. महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासह जीव्हीपीआरच्या अधिकाऱ्यांनी सब-ठेकेदारला ठिकाण दाखवले. त्याने खोदकाम करून अर्धवट काम करून तो पसार झाला. या अत्यावश्यक कामाकडे यंत्रणेचे लक्ष नाही. महिन्याभरापासून येथील रहिवाशांना भर उन्हाळ्यात पाणीपाणी करायची वेळ आली. हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. सांडपाण्यासाठी या भागात कुठेही खाजगी अथवा सरकारी कुपनलिका नाहीत. ज्या भागात कुपनलिका आहेत. त्या भंगार अवस्थेत आहेत. त्यामुळे पिण्यासह सांडपाण्यासाठी नळाच्या पाण्याशिवाय दुसरा पर्यायी मार्ग नाही. परिसरातील अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना पाणीपट्टी भरूनही पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. 

नरवडे यांचा २४ तासाचा अल्टीमेंट

याभागातील युवासमाजसेवक तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचीन खरात ) गटाचे मनिष नरवडे यांनी येथील नागरिकांना सोबत घेऊन वारंवार अधिकाऱ्यांना विनंती केली. मात्र गेंड्याची कातडी पांघरून झोपणार्या अधिकाऱ्यांकडून आज करू उद्या करू, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे.२४ तासात काम सुरू केले नाही, तर थेट महापालिका प्रशासकांच्या निवासस्थानासमोर हंडामोर्चा काढण्यात येईल, असा इशाला नरवडे यांनी थेट महापालिका प्रशासकांना दिला आहे.