Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

गडकरींच्या आदेशानंतर दुरुस्ती झालेला 'हा' राष्ट्रीय महामार्ग 4 महिन्यांतच कसा काय उखडला?

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सोलापूर - धुळे हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) स्वप्नातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा राष्ट्रीय महामार्ग. त्यांच्याच आदेशानंतर दुरुस्ती करूनही अवघ्या चार महिन्यांतच हा राष्ट्रीय महामार्ग उखडला आहे.

सदर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी-आडगाव पासून ते करोडीपर्यंत 'टेंडरनामा' प्रतिनिधीने पाहणी केली. साडेतीन वर्षांपूर्वी वाहतुकीस खुला करण्यात आलेल्या या नवीन बीड बायपास रस्त्याची ज्या - ज्या ठिकाणी उड्डाणपूल आहेत त्या पुलाखालच्या रस्त्यांची पार चाळणी झालेली आहे.

दरम्यानच्या काळापासूनच येथे टोल आकारण्यास सुरवात केली आहे. कंत्राटदाराने टोलच्या माध्यमातून कोट्यवधींची माया जमवली असताना मात्र बसथांबे, रस्ते, उड्डाणपूल, फुटपाथ, स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा व सुशोभीकरणाकडे पाठ दाखवली आहे. हा मार्ग सुरू झाल्यामुळे शहरातील जुन्या बीड बायपास रोडवरील वाहतुकीचा भार हलका झाला आहे. मात्र खड्डे व विविध समस्यांनी या महामार्गाला ग्रासल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

सोमवारी या राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांबाबत वाहनधारकांच्या तक्रारी वाढल्यानंतर टेंडरनामा प्रतिनिधीने या संपूर्ण ३० किलोमीटर रस्त्याची दोन्ही बाजुने पाहणी केली. दरम्यान टेंडरनामाच्या वृत्तमालिकेनंतर गडकरींनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती.

या रस्त्याच्या दुर्देशेची प्रधान सचिवांनी दखल घेतल्यानंतर आडगाव (निपाणी) येथून सुरू होणाऱ्या या बायपास रस्त्याची गांधेली, बागतलाव, बाळापूर देवळाई, सातारा, कांचनवाडी, गोलवाडी, वळदगाव, एएस क्लब, करोडी, माळीवाडा अशा ३० किलोमीटर चौपदरी रस्त्याची तातडीने दुरूस्ती केली होती. मात्र वर्षभरातच पुन्हा जैसे थे स्थिती झाल्याचे टेंडरनामाच्या पाहणीत दिसून आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे कांचनवाडी ते सातारा हद्दीपर्यंत जलवाहिनीसाठी जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराकडून खोदण्यात आलेल्या रस्त्याची अद्याप दुरूस्ती न केल्याने पुलाखालून दोन्ही बाजुंचे जोड रस्ते गत दोन वर्षांपासून बंद केल्याने उड्डाणपूलांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच या मार्गावरील बसथांब्याचे शेड चोरीला गेले असून थांबे, फुटपाथला गाजरगवत आणि रानटी झाडाझूडपांनी वेढा घातला आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हीच समस्या असल्याने वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. याच मार्गावर गत चार दिवसांपूर्वी शहराला हादरे देणारा अपघात घडला. साडेतीन वर्षांत अनेकांचे बळी घेतल्यानंतर देखील कंत्राटदार आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत आहे.

रस्त्याच्या दुर्दशेने या नव्याकोऱ्या बायपासवर दर आठवड्याला होणारी अपघातांची संख्या अटोक्यात आणण्यास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार यांना अपयश येत असल्याचे मत या भागातील हाॅटेल, रेस्टाॅरंट आणि इतर व्यावसायिकांसह वाहनधारकांनी मांडले. अगदी डोळ्यांचे पारणे फिटेल, या भागात पर्यटन वाढेल, अशी जाहिरात करून तयार केलेल्या आडगाव निपाणी ते माळीवाडा ते करोडी चौपदरी झालेला ३० किलोमीटरच्या रस्त्याची अनेक ठिकाणी चाळणी झाल्याने या विभागाची जाहिरात फसवी ठरल्याचे रस्त्याची अवस्था पाहून समोर आले आहे.

जमिनीपासून १ ते ९ मीटर उंची वाढवल्यानंतरही रस्त्यावर खड्डे का पडले, हा संशोधनाचा विषय आहे. दुसरीकडे दोन्ही बाजूंनी केलेल्या दगडांच्या पिचिंगमध्ये , दुभाजकात आणि फुटपाथच्या काॅक्रीटमध्ये व गटारीच्या सिमेंट कामांत रानटी झुडप्यांनी डोके वर काढल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दुभाजकात फुलझाडांनी केलेले सुशोभीकरण वाळले असून दुतर्फा बॅरिकेडिंग, लेन मार्किंग, दिशादर्शक फलक व सूचनांच्या पाट्या आडव्या पडल्या आहेत. वळण मार्गावरच रस्त्याची चाळणी झाल्याने वाहनांची खडखड वाढली असून अपघाताचा धोका वाढला आहे.

वन विभागाच्या अखत्यारीत डोंगरावरील मोठा ऑक्सिजन हब नष्ट करून आणि पर्यावरणाची न भरुन निघणारी हानी करून रस्ता तयार केला खरा, मात्र कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या आणि राजकीय पुढाऱ्यांच्या टक्केवारीत रस्त्याचा टंक्का घसरल्याचे दिसून येत आहे.

आडगाव (निपाणी) ते करोडी या तीस किलोमीटरच्या रस्त्यासाठी ५१२.९९ कोटी रुपये खर्च केले गेले. कंत्राटदारांना ९१० दिवसांचा बांधकाम कालावधी दिला होता. २७ फेब्रुवारी २०१८ रोजी करारनामा झाल्यानंतर कंत्राटदाराला ३१ जानेवारी २०१८ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. रस्त्याचे बांधकाम १० ऑगस्ट २०२१ पर्यंत करावयाचे होते. मात्र कोरोना सारख्या महामारीने रस्त्याचे काम लांबले.

काम झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. मात्र छोट्या मोठ्या फुलांसह अंडरपास, व्हेईकल ओव्हर पास, पादचारी अंडरपास, कॅटल अंडरपास, किरकोळ जंक्शन मध्ये सर्वत्र खड्ड्यांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. त्यामुळे गडकरींच्या स्वप्नातील हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा राष्ट्रीय महामार्ग नव्हे तर मृत्यूचा महामार्ग झाला, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

दुसरीकडे या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतला नाही. रस्त्यावरून नेहमी आपल्या आलिशान वाहनातून आमदार, खासदार, पालकमंत्री जात असतात. परंतु त्यांना या रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. लोकप्रतिनिधींना वारंवार सांगूनही उपयोग होत नाही.