Tender 
मराठवाडा

दोनवेळा टेंडर काढूनही का रखडले ‘हज हाऊस’?

वारंवार नोटीस देऊनही काम कासवगतीने

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्य सरकारने औरंगाबादच्या किलेअर्क येथील मैदानात ‘हज हाऊस’ बांधण्याचा निर्णय २०१३ साली घेण्यात आला. आतापर्यंत दोन वेळा निविदा काढण्यात आल्या; मात्र मागील अनेक वर्षापासून ‘हज हाऊस’चे बांधकाम कासव गतीने सुरू आहे.

औरंगाबादेच्या ‘हज हाऊस’साठी राज्य सरकारकडून २८ कोटी मंजूर करण्यात आले. दरम्यान, प्रस्तावित ‘हज हाऊस’च्या कामाचे कंत्राट एका एजन्सीला २ मार्च २०१५ रोजी देण्यात आले होते. हे काम ऑगस्ट २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. संबंधित एजन्सीकडून कामात दिरंगाई करण्यात येत होती. त्यामुळे वारंवार नोटीस देऊन कामात वेग येत नसल्याने अखेर सिडको प्रशासनाने ८ सप्टेंबर २०१७ रोजी ‘हज हाऊस’च्या कामाचे कंत्राट रद्द केले. या कंत्राटदाराला सिडकोने काळ्या यादीत टाकले. त्यानंतर उर्वरित कामाची पुन्हा निविदा काढण्यात आली.

दरम्यान, ‘हज हाऊस’ उभारणीचे जुने कंत्राट रद्द केल्यानंतर नवी निविदा काढण्यात आली. या नव्या निविदेप्रमाणे ‘हज हाऊस’च्या कामाला फेब्रुवारी २०१७ पासून सुरूवात करण्यात आली. साधारणतः १८ महिन्यांत म्हणजे जुलै २०१९पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. दरम्यान, या मुदतीला दोन वर्षे पूर्ण झाले असून अद्यापि ‘हज हाऊस’चे काम अपूर्णच आहे.

प्रकल्पातील सुविधा
- एकूण ३५० यात्रेरकरूंसाठी २४ सामुदायिक वसतिगृहे.
- १०० यात्रेकरु सामावतील, अशी १६ स्वयंपूर्ण कौटुंबिक वसतिगृहे.
- अतिविशिष्ट व्यक्तींसाठी निवास व्यवस्था.
- सौर ऊर्जा, जलपुनर्भरण, अल्पोहार, भोजन कक्ष.
- ४५० आसनक्षमतेचे सभागृह.
- प्रशासकीय कार्यालय, प्रार्थना सभागृह, वाहनतळ.

पहिल्या कंत्राटदाराकडून काम व्यवस्थित होत नसल्याने दुसऱ्या कंत्राटदाराला काम देण्यात आले. दरम्यान ‘हज हाऊस’ चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सर्व इमारत पूर्ण झाली असून केवळ फर्निचरचे काम बाकी आहे. परंतु या निविदेत फर्निचरच्या कामाचा उल्लेख नसल्यामुळे फर्निचरसाठी वेगळा निधी लागणार आहे. यासंदर्भात अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्याशी चर्चा झाली आहे. दरम्यान, कंत्राटदाराने डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होईल असे सांगितले आहे.
-इम्तियाज जलील, खासदार