Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

गडकरींची घोषणा 'खड्ड्यात'; करमाड-लाडसावंगी-चौका रस्त्याची वाताहत

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : करमाड - लाडसावंगी रस्त्याची दुर्दशा लागली आहे. धक्कादायक म्हणजे याच मार्गावरील लहुकी नदीवर असलेल्या अरूंद पुलाला कठडे नसल्याने रात्री अपरात्री प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. रस्ता दुरुस्ती संदर्भात गत दहा वर्षांपासून येथील पाच - पंचवीस गावातील ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार हरिभाऊ बागडे व अन्य लोकप्रतिनिधींकडे मागणी करत आहेत. मात्र त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

डिसेंबर २०१६ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व दळण-वळण मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद - जालना रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या केंद्रीय रस्ते निधीतून ३८ कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा केली होती. त्यातून करमाड - लाडसावंगी आणि चौका भागातील रस्ते तयार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यांची ही घोषणा खड्ड्यात गेल्याचे चित्र समोर आले आहे.

धोकादायक पूल 

लहुकी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, नदी दुथडी भरून वाहत आहे. याच नदीवरील पुलाचे कठडे गेल्या कित्येक वर्षांपासून गायब झाले आहेत. मात्र, तरी देखील संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या कठडे नसलेल्या अरूंद पुलाने एखाद्याचा जीव घेतल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न वाहन चालकांसह नागरिकांनी विचारला आहे.

समृध्दी महामार्गाने लावली वाट

करमाड ते लाडसावंगी हा पंधरा किलोमीटर लांबीचा रस्ता, तसेच लाडसावंगी ते चौका ६ किमीचा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. जागोजागी खड्डे पडल्याने खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे पडले असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यात या रस्त्यावरून समृद्धी महामार्गाच्या कामासाठी जाणाऱ्या जड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे हा रस्ता खचला आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघात सत्र वाढू लागले आहे.

रास्ता रोको आंदोलनानंतर ४५ लाखांची मलमपट्टी

गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर आता बांधकाम विभागाने या रस्त्याचे कामासाठी ४५ लाख रुपये मंजूर केले आणि त्वरित काम सुरू केले आहे. पण ठेकेदार फक्त मोठे खड्डे भरत आहे. त्यातही हातचलाखी करत असल्याने ४५ लाखांत दुरूस्ती करूनही खड्डे उघडे पडणारच, असे म्हणत या संपूर्ण रस्त्याचे एकदाच डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी  दुधड, पिंपळखुटा, मुरुमखेडा येथील नागरिकांनी केली आहे.

गडकरींची घोषणा 'खड्ड्यात'

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील रस्त्यांसाठी १५ हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यातून अनेक राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, रस्ते रुंदीकरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. २२ डिसेंबर २०१६ रोजी गडकरींनी औरंगाबादेत येऊन औरंगाबाद - जालना महामार्गाच्या कामाचे उद्घाटनही केले होते. तेव्हा जिल्ह्यातील रस्त्यांसाठी जाहीर केलेला १५ हजार कोटींचा निधी कोणत्या रस्त्यांसाठी मिळणार याबाबत लोकप्रतिनिधींनी चर्चा केली होती. तेव्हा पहिल्या टप्प्यात भाजप आमदारांच्या मतदारसंघात प्राधान्य देण्यात येईल, असे सांगत केंद्रीय रस्ते निधीअंतर्गत औरंगाबाद तालुक्यातील तीन रस्त्यांसाठी ३८ कोटी रुपये मंजूर केल्याचे गडकरी म्हणाले होते.  त्यात करमाड - लाडसावंगी हा रस्ता दोन टप्प्यात दहा किलोमीटर, तर चौका - लाडसावंगी हा सहा किलोमीटरचा रस्ता घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र सात वर्षांत ना या रस्त्यांचे  सर्वेक्षण करण्यात आले, ना  कामाचे टेंडर काढण्यात आले, ना रस्त्याच्या कामाला सुरवात झाली.