National Highway
National Highway Tendernama
मराठवाडा

अखेर ठरलं! औरंगाबाद-पैठण मार्ग होणार सुसाट; 500 कोटींचे टेंडरही...

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद ते पैठण या वादग्रस्त आणि बहुचर्चित पण कित्येक वर्षे रखडलेल्या रस्त्याचे आता ४५ ऐवजी ३० मीटर जागेतच चौपदरीकरण करण्याचे टेंडर २७ जुलै रोजी प्रकाशित करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) मुख्यालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे नव्याने तयार करण्यात आलेल्या सुधारीत विकास आराखड्यात रस्त्याच्या चौपदरीकरणात कुठेही भूसंपादन करण्यात येणार नाही. आधीच्या नियोजनामध्ये रुंदीकरणाबरोबरच गेवराई तांडा, बिडकीन आणि ढोरकीन या तीन गावांना प्रस्तावित केलेले बायपास देखील रद्द करण्यात आलेले आहेत. (Aurangabad-Paithan Highway)

एनएचएआयच्या औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयातील सहाय्यक अभियंता आशिष देवतकर, अनिकेत कुलकर्णी, राहुल पाटील यांनी 'टेंडरनामा'ला याबाबत माहिती दिली. त्यात पैठण रोडची सध्याची संपादीत जागा ३० मीटर एवढी रुंद आहे.औरंगाबाद - पैठण हा रस्ता एनएचएआयकडे हस्तांतरित झाल्यानंतर तो ३० वरून ४५ मीटर म्हणजे अधिकची १५ मीटर जमीन संपादित करून चौपदरीकरण करण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर इजीएस कंपनीकडून तसा विकास आराखडा देखील तयार करण्यात आला होता. मात्र औरंगाबाद - पुणे दृतगती मार्गाची घोषणा केल्याने या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण कमी होईल. यासाठी भूसंपादनासाठी लागणारा ८०० कोटी रुपयांचा खर्च वाचविण्यात आला.

१६०० कोटींचा प्रकल्प ५०० कोटींवर

भूसंपादन आणि चारपदरी डांबरीकरण, तीन उड्डाणपूल, तीन ठिकाणी बायपास असा एकूण १६०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आता नवीन सुधारीत विकास आराखड्यानुसार ५०० कोटींवर आला आहे. त्यासाठीचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. आता या रस्त्याच्या कामासाठी टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

सुरवातीपासूनच वादावादी

२४ एप्रिल रोजी नितीन गडकरी यांनी रुंदीकरणासह चौपदरीकरण होणार असे भूमिपूजन सोहळ्यात जाहीर केले होते. मात्र त्यानंतर औरंगाबाद येथील एनएचएआयच्या विभागीय कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी हे काम रद्द करून केवळ दोनपदरी रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव नागपूर येथील क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवला. त्यानंतर ६ जून रोजी दिल्ली मुख्यालयातून नागपूर क्षेत्रीय कार्यालयातून एनएचएआयच्या औरंगाबाद कार्यालयाला तसे पत्र पाठवून औरंगाबाद ते पैठण हा रस्ता दोनपदरीच करा, अशा सूचना दिल्या होत्या.

औरंगाबादकर , पैठणकरांचा संताप

रस्ता दोनपदरीच होत असल्याचे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांचे बिंग फुटताच दरम्यान, औरंगाबाद, पैठणमधील अनेक नागरिकांसह रोहयो मंत्री तथा पैठण तालुक्याचे आमदार तसेच औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार अतुल सावे यांनी विविध मार्गांनी गडकरींशी संपर्क साधत हा रस्ता चौपदरी करण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे गडकरी यांनी आहे त्याच ३० मीटर जागेत या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

असा होणार रस्ता

औरंगाबाद - पैठण या रस्त्याचे चौपदरीकरण हे ३० मीटरमध्येच होणार आहे. या रस्त्यासाठी नव्याने भूसंपादन केले जाणार नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका बाजूचे दोन पदर हे ७ मीटर एवढ्या जागेत तयार होतील. दोन्ही बाजू मिळून प्रत्यक्ष डांबरीकरणासाठी १४ मीटर जागा लागेल. उर्वरित जागेत दुभाजक, शोल्डर असतील. पाणीपुरवठा योजनेतील पाइप टाकण्यासाठी ६ मीटर जागा सोडण्यात येणार आहे.

सहा महिन्यानंतर होईल कामाला सुरवात

पैठण रस्त्याचा डीपीआर बनवणाऱ्या इजीस या कन्सल्टन्सीकडून ३० मीटर जागेतच चौपदरी रस्त्याचे डिझाइन अंतिम केल्यानंतर त्याला एनएचएआयच्या मुख्यालयाने प्रशासकीय, तांत्रिक व वित्त मान्यता दिली आहे. गत महिन्यात टेंडर देखील प्रसिध्द करण्यात आले आहेत. या प्रक्रियेला सहा महिने लागतील. त्यानंतरच प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरूवात होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सातशे अतिक्रमणांवर पडणार टाच

गोलवाडी चौराहा ते पैठण दरम्यान ४२ किलोमीटर अंतरात रस्ता चौपदरीकरणात किमान सातशे अतिक्रमणांना बाधा पोहोचत आहे. यापैकी इजीएस कंन्सल्टन्सी कंपनीच्या सर्वेक्षणानुसार ४७७ अतिक्रमणधारकांना एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी नोटीसा बजावल्या आहेत. अद्याप २३३ अतिक्रमणधारकांना नोटीसा देणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याच रस्त्याच्या पाइपलाइन संदर्भात विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी देखील आढावा घेतल्याचे विश्वसनीय सुत्राकडून कळाले.