औरंगाबाद (Aurangabad) : पंचतारांकित शेंद्रा औद्योगिक वसाहतीची मुख्य वाट असलेल्या औरंगाबाद जालना राष्ट्रीय महामार्गालगत येथे तब्बल अर्धा किलोमीटर अंतरावर डांबरी रस्त्याच्याच बाजुला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. घरगुती कचऱ्यासह बांधकाम व रस्त्याच्या कामाचा राड्यारोड्यासह हाॅटेलांमधील उष्टावळी, निकामी मांस, कोंबड्याची पिसे टाकली जात आहेत. या कचऱ्यामुळे दुर्गंधी सुटली असून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आरोग्याचा धोका तर निर्माण झालाच आहे, त्यात धक्कादायक म्हणजे कचऱ्यावर ताव मारणाऱ्या प्राण्यांमुळे रस्त्यावर जीवघेणे अपघात होत असल्याची स्थिती मार्गस्थांनी सांगितली. नेमक्या याच कारणामुळे शेंद्रा एमआयडीसीच्या जागतिक दर्जाच्या औद्योगिक क्षेत्र म्हणून उंचीला गालबोट लागत असल्याचे उद्योजकांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
पंचतारांकित शेंद्रा औद्योगिक वसाहत आता खऱ्या अर्थाने जागतिक उद्योग क्षेत्रात आपले स्थान मजबूत करत आहे, अशा वल्गना करत सरकार महसुली विभागाचा दंडुका वापरत कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करून एमआयडीसीच्या घशात ओतत आहे. त्यानंतर एमआयडीसी भूखंड पाडून कोटींच्या भावात उद्योजकांना त्याची विक्री करत अब्जावधीचा महसुल जमा करत आहे. मात्र रस्ते , दिवे , पाणी, वीज आदी मूलभूत सुविधा पुरविण्याकडे नंतर प्रशासन डोळेझाक करत असल्याचे म्हणत उद्योजक संताप व्यक्त करत आहेत.
सद्यस्थितीत ह्युसंग, ऑडी इंडिया, स्कोडा ऑटो, फोक्सवॅगन, परकीन्स, ग्लेनमार्क फार्मास्युटीकल्स, लिभेर इंडिया, एनआरबी, इंडस्ट्रियल बेरिंग, बोनाट्राॅस, व्हेराॅक इंजिनिअरींग, अशा विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योगांनी शेंद्रा एमआयडीसीत आपले प्रकल्प कार्यान्वीत केल्याने एमआयडीसीत बर्यापैकी चैतन्य पसरलेले दिसत आहे. त्यात याच औद्योगिक क्षेत्राला अधीक विकसित करण्यासाठी केंद्र सरकारच्या डीएमआयसी आणि ऑरिक सिटी या महत्त्वाकांक्षी योजनेच्या रुपाने शेंद्रा एमआयडीसीला सुवर्णसंधी प्राप्त झाल्याचे म्हणत याच एमआयडीसीलगत दहा हजार एकर एवढ्या भव्य क्षेत्रात विकसित झालेल्या ऑरिक सिटी हा भारतातील सर्वात सुनियोजित, हरित आणि स्मार्ट औद्योगिक प्रकल्पाची उभारणी केली गेली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भव्य वास्तूचे उद्घाटन देखील केले गेले.
शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत जगातील औद्योगिक क्षेत्रातील लिडर्स असलेल्या उद्योगांचे अनेक प्रकल्प इथे आपले उत्पादन सुरू करण्यास उत्सुक नाहीत. स्मार्ट सिटी प्रकल्पातील ऑरिक सिटी सेंटरचे काम झाले, उद्घाटन झाले मात्र म्हणावी तशी येथे भरभराट नाही. याचे कारण म्हणजे संबंधित व्यवस्थापनातील कारभाऱ्यांचा इकडिल पायाभूत सुविधांकडे असलेला कानाडोळा. ज्यामुळे शेंद्रा एमआयडीसीच्या जागतिक दर्जाच्या औद्योगिक क्षेत्र म्हणून नव्या उंचीवर औरंगाबाद शहराच्या उज्वल भविष्याला साद घालणाऱ्या सुवर्णसंधीला गालबोट लागत आहे. याला प्रशासनासह या भागातील ग्रामस्थ हाॅटेल व्यावसायिक तेवढेच जबाबदार आहेत.
उद्योजकांच्या मते हे आहे मुख्य कारण...
औरंगाबाद - जालना राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. यात शेंद्रा औद्योगिक वसाहतीमुळे काही प्रमाणात कामगार बसेस, उद्योजकांच्या चारचाकी, कामगारांच्या दुचाकींची देखील भर पडली. कुठे गुळगुळीत तर कुठे उखडलेल्या याच रस्त्याच्या शोल्डरमध्ये दुतर्फा दूरपर्यंत कचरा टाकण्यात येत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यातूनच प्रवास करावा लागतो. अत्यंत घातक कचरा देखील येथे टाकलेला असतो. काही ढिगाऱ्यांना आग लावली जात असल्याने प्रदूषनाच्या दाट धुक्यातून वाहन काढताना अपघातासह श्वसनाचे त्रास भोगत ठसकत ठसकत प्रवाशांना वाट पार करावी लागते. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे जागतिक दर्जाच्या ऑरिक सिटी आणी एमआयडीसी पंचतारांकित डीएमआयसीकडे जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाचे विद्रूपीकरण होत आहे. नेमका हाच प्रकार उद्योजकांच्या मनात रोष निर्माण करणारा आहे.
जागतिक पातळीवर पर्यटन राजधानी औरंगाबादची (Aurangabad tourism) चर्चा व्हावी तसेच येथील औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढावी, उद्योगांना चालना मिळावी या उद्देशाने मार्च २०२१ मध्ये विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आलेल्या विदेशी पाहुण्यांनी रस्त्यांच्या कडेला असलेली दुर्गंधी आणि खराब झालेल्या रस्त्यांबाबत खेद व्यक्त केला होता.
याच धर्तीवर पुन्हा फेब्रुवारी महिण्यात विदेशी पाहुणे शहरात दाखल होणार आहेत. मात्र या मार्गातील कचऱ्याचे ढिग दिसू नयेत, यासाठी पाहुण्यांना काळ्या काचाच्या वाहनातून स्मार्ट ऑरिक सिटीकडे प्रशासन घेऊन जाणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. कारण या रस्त्याच्या कडेला असलेली अस्वच्छता आहे तशीच आहे. हे प्रकार रोखण्यासाठी संबंधितांना प्रशासनाने चाप लावावा अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.