Jawahar Nagar Road
Jawahar Nagar Road Tendernama
मराठवाडा

जवाहर काॅलनीवासीयांना 'दिवाळी भेट'; अखेर 'त्या' रस्त्याचे काम सुरू

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील त्रिमुर्ती चौक ते आकाशवाणी हा जालना रोडला जोडणारा मुख्य रस्ता आहे. स्मार्ट सिटीने नियोजनानुसार हा रस्ता बुधवारी त्रिमुर्ती चौकापासून उत्तमनगरपर्यंत उखडण्यास सुरूवात केली. मात्र तोच या मार्गावरील दोन बड्या व्यापाऱ्यांनी येथील इतर व्यापाऱ्यांना जमा करत दिवाळीचे कारण देऊन ठेकेदारावर काम बंद करण्यासाठी दबाब आणला.

एवढेच नव्हेतर काही राजकीय नेतेमंडळीची दिशाभूल करत ठेकेदाराला फोनाफोनी करायला लावली. दुसरीकडे पुढील कामासाठी ठेकेदाराने मागे उकरलेल्या माती-मुरूमाचा भराव टाकल्याने एका बाजुने रस्ता बंद केला. तर दुसऱ्या बाजुने ऐकेरी वाहतुकीने या मार्गावर चक्काजाम सुरू झाला. एकीकडे वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिक व इतर व्यापारी, ग्राहकांना बराच त्रास सहन करावा लागला.

त्रिमुर्ती चौक ते आकाशवाणी या मुख्य रस्त्याच्या कामात खोडा घालणाऱ्या त्या दोन बड्या व्यापाऱ्यांचा खरपूस समाचार घेत या रस्त्याच्या दशेबाबत 'टेंडरनामा'ने बुधवारी येथील व्यापाऱ्यांची भेट घेत रस्त्याच्या कामाबाबत काही अडचणी विचारल्या असत्या त्यांनी काहीच नाही, असे उत्तर देत फक्त दोन लोकांना अडचण असल्याचे सांगितले. त्यावर प्रतिनिधीने या वार्डाचे माजी नगरसेवक तथा माजी महापौर त्र्यंबक तूपे व माजी नगरसेविका अंकिता विधाते यांना विचारले असता चार नगरसेवकांच्या हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्यासाठी आम्ही गत दहा वर्षांपासून पाठपुरावा करत असल्याचे म्हणत, हे काम आम्ही बंद पडू देणार नाही, असे स्पष्ट केले.

'टेंडरनामा' प्रतिनिधीकडून माहिती मिळताच तूपे आणि विधाते यांनी रस्त्याचे काम चालू करण्याच्या दृष्टीने तातडीने व्यापाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यात दिवाळीच्या आत काम पूर्ण करणार, असे ठरल्यावर 'टेंडरनामा'चा पाठपुरावा आणि वृत्ताची दखल घेत शनिवारी मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी  ठेकेदार ए. जी. कन्स्ट्रक्शन कंपनीला काम सुरू करण्याचे आदेश दिले. कंपनीने आदेशाची अंमलबजावणी करत येथील काॅंक्रिट रस्त्याचे काम सुरू केले. त्यामुळे शांतीनिकेतन काॅलनी, त्रिमुर्तीचौक, उत्तमनगर, मित्रनगर, विश्वभारती काॅलनीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.