Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगाबादेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचा परिसर बकाल

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : पद्मपुरा रोडलगत हे सार्वजनिक बांधकाम कार्यालय आहे. पुढे जिल्हा न्यायालयाच्या मागे बांधकाम भवनच्या मागेच निजाम कालीन इमारतींमध्ये हे कार्यालय उभारण्यात आले. यात उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग विभाग क्र. ३ व ४ तसेच उपविभागीय अधिकारी सा. बां. विशेष प्रकल्प, उप. वि. क्र. २, उपअभियंता सा. बां. यांत्रिकी, उपविभागीय अभियंता यांचे कार्यालय, बांधकाम उपविभाग क्र. १, अनुरेखक व कनिष्ठ प्रशिक्षण केंद्र, उपविभागीय अभियंता. राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र. ३ , तसेच उप विभागीय अभियंता दक्षिण, उत्तर व पश्चिम विभाग तसेच कार्यकारी अभियंता कार्यालय या संपूर्ण परिसरात कुठल्या ना कुठल्या कार्यालयात तुमचे-आमचे रोज काहीना काही काम पडते. त्यासाठी येथे येणार्‍यांना काम होईल का नाही हे पाहण्याआधीच वरील असुविधांचा सामना करावा लागतो.

आवारात बजबजपुरी 

पद्मपुरा रस्त्याकडून थेट कार्यालयात प्रवेश करतानाचे प्रवेशद्वारच तुटले आहे. मुख्य दरवाजातून आत प्रवेश करताच गेल्या कित्येक महिन्यांपासून फुटलेल्या ड्रेनेजच्या डोहाने नाक दाबून आत प्रवेश करावा लागतो. सर्वच मुख्य आणि उपविभागांच्या आवारात जागोजागी कचरा साठलेला असतो. अनेक उपविभागांची बाहेरून रंगरंगोटी केली असली तरी आतून मात्र सर्दावलेल्या भिंती आणि जुन्या काळातील कोलमडलेली विद्युत यंत्रणा पाहून झटका बसायची भिती आहे. बाहेर परिसरात व आतमध्ये मात्र प्रचंड घाण पडलेली दिसते. याच परिसरातील अधिकारी व कर्मचार्यांची निवासस्थाने त्यात घरातील केरकचऱ्याची भर टाकतात. या संपूर्ण घाणींमुळे जनावरांचाही परिसरात ठिय्या असतो.

सहा लाखाचा चुराडा; कचर्‍याची जाळपोळ 

परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी चार भागात दहा फुट खोल व सहा बाय सहाचे आरसीसी हौद करून त्यावर पत्र्याचे शेड उभारत त्याला कचरा संकलन युनिट हे गोंड्स नाव दिले. याकामासाठी पाच लाख २७  हजार ८०६ रूपये खर्च करण्यात आले. ठेकेदार अमोल वाघचौरे यांच्यामार्फत ते बांधण्यात आले होते. सा.बां.उपविभाग क्र. ३ यांच्या निगराणीखाली हे बांधकाम झाले होते. मात्र, लाखो रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या कचरा संकलन युनिट गाजरगवत आणि झाडाझूडपात हरवलेले आहे. कचऱ्यासाठी तयार केलेल्या हौदात कमालीचे घाणीचे साम्राज्य आहे. येथील झाडाझूडपात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग पसरलेले आहेत. अनेक ठिकाणी उकिरड्यांना आग लावलेली दिसते. आधीच दुर्गंधी आणि घाण त्यात कचर्‍याचा धूर यामुळे आमजनतेला त्याचाही त्रास होतो. अशा प्रकारे कचरा जाळणे अपेक्षित नाही.

खराब विद्युत उपकरणे 

येथील विविध कार्यालयातील उप कार्यालयांच्या इमारतीतील विद्युत उपकरणांचे वायर उघड्या पडलेल्या आहेत. त्यातच नादुरुस्त दिवे, पंखे व अन्य उपकरणेही दिसतात. काही ठिकाणी तर उघडे फ्यूजबॉक्सही पाहायला मिळतात.

कार्यालय परिसरात जिथे तिथे कचरा आणि घाण, स्वच्छतागृह बंदिस्त..

पडक्या इमारती, सर्दावलेल्या भिंती, खिडक्यांची फुटकी तावदाने, भंगार वाहनांचा ढिगारा व जागोजागी कचरा ही परिस्थिती आहे सर्वच कार्यालय परिसराची. मोकाट जनावरे आणि चिखल यामुळे परिसरात सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेष म्हणजे मुख्य इमारत वगळता इतर इमारतींमध्ये स्वच्छतागृहही बंद आहे. शिवाय परिसरातच कचरा जाळला जातो. परिणामी सगळीकडे दुर्गंधी पसरते.येथील कार्यालयांच्या काही इमारतींची बाहेरून रंगरंगोटी सुरू असली तरी परिसरात मात्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.

पाणी आणि स्वच्छतागृहांचा अभाव

परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. दुसरीकडे स्वच्छतागृहांचा अभाव आहे. काही जुनाट व अतिशय वाईट अवस्थेतील स्वच्छतागृहे झाकण्यासाठी त्यापुढे भिंत बांधली आहे. त्यामुळे लोकांना पर्याय नसल्याने वाटेल तिथे विधी उरकले जातात. त्यामुळेही परिसरात दुर्गंधी पसरते.

अडचणींचा डोंगर

सार्वजनिक बांधकाम विभागाला दिडशे वर्षाचा इतिहास आहे. या विभागामार्फत मुख्यत: रस्त्यांचे बांधकाम व देखभाल दुरूस्तीसह, पुलांची बांधणी व शासकीय इमारतींचे देखील बांधकाम केले जाते. शासनासाठी तांत्रिक सल्लागार म्हणूनही काम करते. मात्र कोट्यावधींची टेंडर प्रक्रिया करून सार्वजनिक स्तरावर जनहिताचे काम करणाऱ्या याच विभागातील मुख्यालय परिसरातील कार्यालयांची वाट लागली आहे. याच परिसरात अनेक इमारती बंदीस्त असून झाडाझूडपात दिसेनाश्या झाल्या आहेत. परिसरात पार्किंगची सुविधा चांगली नाही त्यामुळे जागोजागी कुठेही वाहने लावलेली दिसतात. विशेष म्हणजे यांत्रिकी विभाग की कुत्र्यांचा कोंडवाडा अशी स्थिती निर्माण झाली आहे.