Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

सारोळा घाट रस्त्याला वन विभागाची आडकाठी; पर्यटकांचा मार्ग धोकादायक

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : जिल्ह्याच्या पर्यटन, दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेल्या जळगावरोडपासून सारोळा पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या घाट रस्त्याला वन विभागाने ग्रहण लावल्याने हे काम वर्षभर लांबणीवर पडल्याचे टेंडरनामा तपासात उघड झाले. आता पावसाळ्यात डांबरकाम करता येत नसल्याने किमान चार महिने हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढे ढकलल्याने भर पावसात सारोळा पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या पर्यटकांची तारांबळ उडत आहे. तर बहूतांश पर्यटकांनी रस्त्याअभावी पाठ फिरवल्याने येथील महसूलावर पाणी फिरत आहे.

पर्यटन, दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेल्या औरंगाबादपासून २४ किलोमीटर आणि जळगावरोड चौकाघाटापासून ७ किलोमीटर असलेल्या सारोळा पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या घाट रस्त्याच्या दुरूस्तीसाठी राज्य सरकारने २०२०-२१ मध्ये ३ कोटी रुपये मंजूर केल्यानंतर रस्ता बांधकामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निश्चित करण्यात आली होती. औरंगाबादेतील ख्वाजा उद्दीन शेख यांच्या मस्कट कन्सट्रक्शन कंपनीला याकामाचे टेंडर देण्यात आले होते. लघुपाटबंधारे क्रमांक एकचे वन तळे ते सारोळा वन समितीची कमान अशा तीन किलोमीटर घाट रस्त्याचे कंत्राटदाराने वर्षभरापूर्वी काम सुरू केले. जुना उखडलेला डांबरी रस्ता खोदून तीन मीटर रस्त्याचे डोंगर फोडून रस्ता साडेसात मीटर रूंद करण्यासाठी खोदकाम देखील केले. काही ठिकाणी खडीकरण आणि मजबुतीकरण देखील केले.

३० टक्के काम झाल्यावर वन विभागाला जाग

तब्बल महिनाभर काम चालू असताना वन विभागाने कंत्राटदारावर अतिरिक्त खोदकामाचा आरोप लावत आडकाठी लावली. त्यात वन विभागाने कंत्राटदाराला परवानगी नसल्याचा धाक दाखवत मशिनरी जप्त केली. त्यानंतर कंत्राटदाराने रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.

कार्यकारी अभियंत्यांच्या प्रयत्नांना यश...

अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवनियुक्त कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी निश्चित केलेल्या कंत्राटदाराला वन विभागामुळे येत असलेल्या अडचणीमुळे कामात व्यत्यय येत असल्याची बाब माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री मतदार संघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांना कळवली. त्यानंतर बागडे यांनी यावर तोडगा काढण्यासाठी दोनदा विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्याकडे वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांसोबत बैठका घेतल्या. त्यावर केंद्रेकर यांच्या मंध्यस्थीने वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुलेनामा देखील झाला.

पावसाचा व्यत्यय

पावसाळा सुरू झाल्याने कंत्राटदाराने काम सुरू केले नाही. त्यामुळे चार-सहा महिने हे काम थांबल्याने या भागातील पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थांसह पर्यटकांना धोकादायक वळणातून घाट पार करावा लागत आहे.

पर्यटकांनी फिरवली पाठ

मराठवाड्याचे महाबळेश्वर अशी ख्याती आणि थंड हवेचे ठिकाण असा दर्जा मिळालेल्या सारोळा कास पठाराकडे जाण्यासाठी महत्त्वाचा असलेला जळगाव रस्त्यापासून सारोळा घाटाचे डांबरीकरणातून मजबूत करण्यास मंजुरी दिली गेली. ७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण, रुंदीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरवातीला तीन कोटींच्या कामास मंजुरी दिली. तेव्हा वर्षभरापूर्वीच हा रस्ता रूंदीकरण करणे अपेक्षित होते. कालांतराने रस्ता रूंदी वाढवल्याने किमतीत वाढ झाली. पूर्वी बारा महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. रस्त्याची रुंदी वाढल्याने हा कालावधी वाढला. काम सुरू होण्यास वर्षभराचा उशीर झाला. रूंदीकरण करण्यासाठी करण्यासाठी घाट रस्त्यातील वळणमार्गा टेकडीच्या बाजुने ठिकठिकाणी खोदण्यात आल्याने ग्रामस्थांसह पर्यटकांना आगीतून फोफाट्यात टाकण्याचा उद्योग केला गेला.

वाहन चालकांचे हाल

रस्त्याचे कंत्राट औरंगाबादच्याच मस्कट कन्सट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. वन विभागाने नोटीस बजावताच तो घाबरला आणि रस्त्याचे काम बंद पडले. तोपर्यंत रस्त्याचे ३० टक्के काम पूर्ण झाले होते. आता उर्वरित रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनचालकांचे हाल होत आहेत.