Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगपुरा विसर्जन विहिरीने घेतला एकाचा बळी; पालिका मात्र ठिम्मच

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : गणेश विसर्जन अवघ्या ९ दिवसांवर आले असले तरी औरंगपुरा जिल्हा परिषद मैदानावरील गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी असलेली विहीर अजूनही गाळ व घाणीच्या विळख्यात आहे. धक्कादायक म्हणजे याच विहिरीने नुकताच एकाचा बळी घेतल्याने महापालिकेच्या विरोधात औरंगाबादकर संताप व्यक्त करत आहेत.

यासंदर्भात महापालिकेचे उपअभियंता एस. एस. रामदासी यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, येथील विहिरीतील गाळ काढण्यासाठी शुक्रवारी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. औरंगाबादेतील मोहिते कंन्सट्रक्शन कंपनीला २० टक्के कमी दराने काम देण्यात आले आहे. सहा लाख ७० हजार रूपये यावर खर्च केले जाणार आहेत. वर्क ऑर्डरसाठी प्रस्ताव कार्यकारी अभियंता भागवत फड यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. अद्याप वर्क ऑर्डर दिलेली नसल्याने काम प्रलंबित आहे.

विशेष म्हणजे सदर विहिरीचा गाळ हा पोकलेनने काढण्यात येणार असल्याने तेथे लेबरचे काम नसल्याचे देखील त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या विहिरीमुळे झालेल्या मृत्यूलाही महापालिका जबाबदार आहे, असे म्हणणे उचित होणार नाही, असा खुलासा देखील त्यांनी केला आहे.
औरंगाबाद शहरात गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी औरंगपुरा जिल्हा परिषद मैदान, चिकलठाणा विमानतळासमोरील विहिर, जालनानगर, सातारा येथील विहीर, सातारा तांडा, संघर्षनगर, जुने मुकुंदवाडी गाव, स्वामी विवेकानंद नगर आणि हर्सूल तलावाजवळील कृत्रिम तलाव आदी ठिकाणी सोय करण्यात आली आहे. औरंगाबाद महापालिकेने गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी नेहमीप्रमाणे आठ दिवसाअगोदरच टेंडर काढून विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. खाजगी ठेकेदारांमार्फत होणाऱ्या या कामावर जवळपास ५० लाख रूपये खर्च केले जात आहेत.

शहराच्या मध्यभागी असलेल्या औरंगपुरा भागातील जिल्हा परिषद मैदानावरील विहिर अजूनही गाळाच्या व घाणीच्या विळख्यात आहेत. विशेष म्हणजे गत वर्षी काढलेला विहिरीतील गाळ देखील भोवतीच ढिगारा करून रचून ठेवला गेला आहे. त्याची अद्याप विल्हेवाट लावण्यात आली नाही. या विहीरीमधील गाळ, कचरा व जुन्या गणेश मुर्तीसह कुजलेले निर्माल्य काढण्यासाठी गत शुक्रवारी टेंडर देखील काढण्यात आले होते. मात्र त्यात यशस्वी झालेल्या मोहिते कंन्सट्रक्शन कंपनीला एक आठवडा उलटून देखील वर्क ऑर्डर देण्यात आली नाही. परिणामी विहिरीची स्थिती जैसे थे आहे. या विहिरीत जुन्या शहरातील घरगुती व सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होते. या विहिरीत निर्माल्य व अन्य गाळ अद्याप कायम आहे. या विहिरीची स्वच्छता झालेली नाही.

विहिरीत एकाचा बळी
बुधवारी पहाटे याच विहीरीने उस्मानपुऱ्यातील विकास उत्तम शिंदे (वय ५०) यांचा बळी घेतल्याने महापालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट पसरली असली आहे. दुसरीकडे विसर्जन करणाऱ्या कुटुंबियांना याच विहिरीतील घाणपाण्यात विसर्जन विधी करावा लागणार आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विहिरीच्या कठड्याची उंची वाढवा, त्यावर गोलाकार सुरक्षा जाळी टाका, असे सूचविल्यानंतर त्याची फारसी आवश्यकता नाही. विहिरीत दोन्ही बाजुने चढ - उतार करायला पायऱ्या आहेत, कठडे आहेत. सदर इसम भल्या पाहटे गेलाच कसा? या प्रश्नाचे उत्तर शोधने हे पोलिसांचे काम आहे. लघुशंकेसाठी गेलो असे कारण जरी इसमाने दिले असले तरी विहिरीकडे जाण्याची आवश्यकताच काय, असा प्रश्नच उपस्थित करत महापालिकेचे वार्ड अभियंता एस. एस. रामदासी यांनी मोकळ्या पटांगणाकडे बोट दाखवले.