Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad: का सुरू आहे चकचकीत रस्त्याचे खोदकाम? मनपाचा गजब कारभार

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादेतीत कोट्यवधी रूपये खर्च करून नुकतेच बांधकाम झालेल्या डांबरी आणि काॅंक्रिट रस्त्यांचे खोदकाम सुरू असल्याचा प्रकार 'टेंडरनामा'च्या पाहणीत उघड झाला आहे. यासंदर्भात प्रतिनिधीने मजुरांना विचारले असता मनपाच्या विद्युत विभागांतर्गत काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दुभाजकातील पथदिवे, फुलदाणी व सौदर्यबेटांच्या विद्युत रोषणाईसाठी केबल टाकत असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, मोठ्या रहदारीचे आणि पर्यटनस्थळांकडे जाणारे हे रस्ते अनेक दिवसांपासून रखडलेले होते. अखेरीस हे रस्ते G -20 साठी बनविण्यात आले; पीडब्लूडीचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी या निमित्ताने मिळालेला निधी योग्य पद्धातीने खर्च करत गत ५० वर्षांत औरंगाबादकरांनी असे रस्ते पाहिले नव्हते इतके आयआरसीचे मापदंड ठेऊन चकचकीत रस्ते तयार केले. याच 'येरेकर पॅटर्न'चे शहरभर कौतुक होत आहे. मात्र त्यालाही मनपा कारभाऱ्यांचे वक्रृ दृष्टीचे ग्रहण लागल्याचे चित्र आज दिसते आहे. 

भूमीगत केबलसाठी खोदकाम; दुरुस्तीकडे यंत्रणेची पाठ

औरंगाबाद मनपाकडून चकचकीत रस्ते खोदन्याची काही नवीन गोष्ट नाही. मात्र, खूप वर्षानंतर झालेले रस्ते विद्युत रोषणाई आणि सुशोभिकरण उजळावे यासाठी त्याला वीजपुरवठा मिळावा म्हणून भूमीगत केबल टाकण्यासाठी चक्क नवेकोरे पक्के रस्ते आरपार खोदून काढण्यात आले आहेत. पीडब्लूडी अंतर्गत आणि मनपा अंतर्गत बहुतांश रस्त्यांवर हे प्रकार सुरू असून, संबंधित ठेकेदार केबल टाकल्यानंतर दुरूस्तीकडे पाठ दाखवत आहे. यामुळे आता या चकचकीत रस्त्यांवर खड्डे आणि आरपार नाल्यांमधून अपघाताची शक्‍यता वाढली आहे. 

बैठकीतील मुद्द्यांकडे मनपाचे दुर्लक्ष

यासंदर्भात 'टेंडरनामा'ने अधिक माहिती घेतली असता G - 20 पूर्व तयारीसाठी दोन महिन्यांपूर्वी  विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक झाली होती. त्यात पीडब्लूडीचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी मिल क्वार्नर ते बारापुल्ला गेट ते नागसेनवन ते विद्यापीठ ते मकईगेट रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर मनपाने रस्ता दुतर्फा फुटपाथचे काम सुरू केले. उंच फुटपाथमुळे पावसाळ्यात डांबरी रस्ते खराब होतील त्यामुळे आधी भुमिगत स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा तयार करा, त्यानंतर फूटपाथ करा , असा मुद्दा विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्यापुढे मांडला होता. 

काय म्हणाले होते प्रशासक

येरेकर यांच्या मुद्द्यावर खुलासा करतापा  मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी G - 20 साठीच ऐनवेळी काम चालू असल्याचे म्हणत स्ट्राॅम वाॅटर पुढील काळात करू, असा खुलासा केंद्रेकर यांच्यासमोर करत वेळ मारून नेली. त्यानंतर या रस्त्यासह आणि बहुतांश रस्त्यांवर असा उरफाटा कारभार केला.

जनतेच्या खिशाला कात्री

अर्थात पाहुणे मायदेशी परतल्यानंतर पुन्हा फुटपाथ उखडणार आणि स्ट्राॅम वाटर यंत्रणा करणार, यासाठी पुन्हा जनतेच्याच खिशाला कात्री लागणार, यानंतर येरेकरांनी रस्ते तयार करण्यापूर्वी जलवाहिनी, विद्युत खांब आणि भूमीगत केबलची कामे करून घ्या, पक्के रस्ते झाल्यानंतर खोदकाम नको, असे स्पष्ट केले होते. यावर प्रशासकांनी होकार दिला. 

संबंधित कारभाऱ्यांना त्याप्रमाणे सूचनाही केल्या. मात्र विद्युत विभागाच्या कारभाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आता रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम हाती घेतले आहे. यातून येरेकर पॅटर्नवर मनपाचे घाव चालू असल्याचे पाहून औरंगाबादेत संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

सरकारच्या धोरणावर पाणी; कारभाऱ्यांची मनमानी

कोणत्याही शहरात कुठलाही रस्ता तयार करताना आधी संबंधित विभागाशी योग्य समन्वय ठेऊन प्रत्येक रस्त्याचे बांधकाम करण्यापूर्वी संबंधित यंत्रणेतील कारभाऱ्यांनी भविष्यात रस्ता तयार करण्यापूर्वी भूमीगत जलवाहिनी, विद्युत केबल व इतर अत्यावश्यक नागरी सुविधांची दुरूस्ती अथवा शिफ्टींग करून घ्यावी, अथवा आवश्यक त्या ठिकाणी ठराविक अंतरावर भूमीगत पाईप अथवा काॅंक्रिट मोऱ्या बांधून घ्याव्यात जेणेकरून या सेवांसाठी पुन्हा रस्ता खोदण्याची गरज पडू नये, असे सरकारचे धोरण असले, तरी औरंगाबाद मनपाच्या कारभाऱ्यांनी सरकारच्या धोरणावर आणि येरेकर पॅटर्नवर कटिंग मशीनने रस्ते खोदत घाव घालणे सुरू केले आहे. 

शहरभर हळहळ 

चक्क आठ दिवसांपूर्वी तयार केलेल्या चकचकीत रस्त्यांचे आता विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी विद्युत रोषणाई करण्याचे कारण पुढे करत खोदकाम होत  असल्याचे पाहून औरंगाबादकर हळहळ व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, अत्यंत रहदारीचे आणि पर्यटनस्थळांकडे जात असलेले हे रस्ते अनेक वर्षांपासून रखडलेले होते. शेवटी G - 20  साठी हे रस्ते बनविण्यात आले; मात्र त्यालाही मनपाच्या नियोजनशून्य कारभाऱ्यांनी ग्रहण लावल्याचे शहरभर चित्र आहे. 

कारभाऱ्यांचा हा नेहमीचाच विडा

आधी रस्ता बांधायचा, त्यानंतर खोदून सेवा पुरवण्याचा मनपा कारभाऱ्यांनी नेहमीप्रमाणेच  विडा उचललेला आहे.वर्षानुवर्ष हेच दृष्टचक्र सुरू आहे. त्यामुळे जागोजागी रस्त्याला मोठे खड्डे पडतात. मग दुरूस्तीसाठी ठेकेदाराची शोधाशोध होते. त्यात सर्वांचे बंपर बक्षिस ठरलेले असते. मात्र कारभाऱ्यांच्या या उरफाट्या धोरणामुळे रहदारीचे असलेले हे रस्ता सध्या अपघाताला आमंत्रण देत आहे. मात्र, रस्ते बांधण्यापूर्वी का नियोजन केले जात नाही, बांधकामानंतरच का खोदले जातात, संबंधित विभाग आणि प्रमुख अधिकारी का दुर्लक्ष करतात, असे प्रश्न उपस्थित करत औरंगाबादेत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

कारभाऱ्यांचे नशीब उजळते नागरिकांच्या नशीबी कंबरतोड

या खड्ड्यांमुळे ठेकेदारांकडून अधिकाऱ्यांचे नशीब उजळते. पण सामान्य नागरीकांना अपघाताचा धोका वाढतो. मग एखादी अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिक विचारत आहेत. रस्ते बांधकामापूर्वी विद्युत रोषणाई या कामाचा ८२ कामात मनपाने समावेश केला होता. मग आधी केबल टाकण्याची अक्कल कारभार्यांना सूचली नाही का, असा सवाल करत नवे रस्ते खोदून केबल टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.