Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad: 'या' वर्दळीच्या रस्त्याचे काम कासवगतीने

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : दोन महिन्यांपासून सुरू असलेले शहानुरवाडी एकता चौक ते प्रतापगडनगर या मुख्य व वर्दळीच्या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, एक किमीचा रस्ता एका बाजूने दोन ते अडीच फूट खोदून ठेवला आहे. त्यातून उडणारी धूळ यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक हैराण झाले आहेत.

रस्त्यालगत दाट वसाहत आणि मोठी व्यावसायिक प्रतिष्ठाने, रुग्णालय आणि क्लासेस असल्याने पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने व्यापारी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे संग्रामनगर चौकातील सदोष उड्डाणपुलाखालचे रस्ते जुळवन्यासाठी देवानगरी उड्डाणपूल बंद केल्याने या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण अधिक असल्याने त्रासात भर पडली आहे.
रस्त्याच्या कामाचा वेग वाढवण्यासाठी स्मार्ट सिटी कार्पोरेशन व महानगरपालिका ठेकेदाराकडे तगादा लाऊन काम करून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

सध्या बीड बायपास येथील संग्रामनगर चौकातील सदोष पुलाची चूक झाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करून बांधकाम सुरू आहे. दरम्यान देवानगरी रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक एक महिना बंद ठेवण्यात आली आहे. त्यात पोलिस आयुक्तांनी दिलेला पर्यायी मार्ग शहानुरवाडी एकता चौक ते प्रतापगडनगर या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम गत दोन महिन्यापासून सुरू आहे. याठिकाणी सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता हे काम पूर्ण होण्यास किमान अजून सहा महिन्याचा कालावधी लागेल, अशी स्थिती आहे. 

हा रस्ता एका बाजूने दोन ते अडीच फूट खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या अरुंद रस्त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. रस्ता खोदलेल्या ठिकाणी केवळ सिमेंटचे पोते मातीने अर्धवट भरून कडेला ठेवलेले आहेत. आसपासच्या नागरीकांना पार्कींगची गैरसोय झाल्याने वाहने इतरत्र रस्त्यांवर उभी करावी लागत आहेत. परिणामी कोंडीत कोंडी होत असल्याचा अनुभव वाहनधारकांना घ्यावा लागत आहे. रस्त्याच्या खोदकामादरम्यान अनेकांचे पिण्याचे पाईप फोडल्याने दोन महिन्यापासून या भागात दुष्काळ निर्माण झाला आहे.

शहानुरवाडी ते प्रतापगडनगर ज्योतीनगरच्या दिशेने अर्ध्या बाजूचा रस्ता करून अनेक वर्ष झाले. परंतु उर्वरित बाजू तशीच अर्धवट ठेवलेली होती. दुसऱ्या बाजुने अतिक्रमण असल्याचे ठेकेदाराकडून कारण दिले जात होते. त्यानंतर महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी तातडीने रस्त्याची पाहणी केली. रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढून सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम देखील सुरू केले. मात्र स्मार्ट सिटीच्या कारभारी या रस्त्याच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत.

एका बाजुने संपुर्ण रस्ता खोदल्यामुळे अपघाताचा मोठा लांबलचक घाट तयार करण्यात आला आहे. या धोकादायक व अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या रस्त्यातून नागरिकांची सुटका करावी, अशी  मागणी या भागातील नागरिक करत आहेत.