Ajanta Ellora Caves
Ajanta Ellora Caves Tendernama
मराठवाडा

जी-20च्या शिखर परिषदेसाठी औरंगाबाद सज्ज; ...अशी आहे तयारी?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : जी-20 (G 20) राष्ट्रसमुहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने शिखर परिषदेचे प्रतिनिधी 13 व 14 फेब्रुवारी 2023 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा, वेरुळ लेणी आणि इतर विविध स्थळांना भेटी देणार आहेत. या परिषदेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी गुरूवारी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात जी-20 शिखर परिषदेच्या नियोजनासाठी पूर्वतयारी बैठकीस महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे उपस्थित होते. 

जी-20 परिषदेचे सहभागी प्रतिनिधी 13 व 14 फेब्रुवारी 2023 रोजी औरंगाबाद शहराला भेट देणार आहेत. वेरूळ, अजिंठा, दौलताबाद येथील पर्यटन तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीचीही पाहणी करणार आहेत. जगभरातील सुमारे 500 प्रतिनिधी औरंगाबाद येथे भेट देणार आहेत. या प्रतिनिधींच्या निवास, सुरक्षा, वाहतूक, तसेच इतर अनुषंगिक व्यवस्थेसोबतच वेरुळ, अजिंठा येथील सोईसुविधा, रस्त्यांची देखभाल दुरूस्ती, रस्त्यांवरील सूचना फलक, पाणी पुरवठा, आदी व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. 

जी-20 परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच या कालावधीत वेरुळ महोत्सव, तसेच सांस्कृतिक परंपरा, औद्योगिक व पर्यटन स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. याबाबतचे नियोजन काटेकोरपणे करा, आलेल्या पाहुण्यांची निवास व्यवस्था, प्रवास व्यवस्था, आरोग्य सुविधा तसेच सर्व सोईसुविधा देण्याबाबत कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, त्यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिल्या. 

वेरूळ महोत्सव

जी - 20 परिषदे दरम्यान फेब्रुवारी महिन्यात 13 ते 15 तारखेला वेरूळ महोत्सव घेण्याबाबतच्या तयारीचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला. याबाबत सर्व यंत्रणांनी आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देश देखील यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले. औरंगाबाद व लगतच्या पर्यटन संधीबाबत एमटीडीसीचे चंद्रशेखर जैस्वाल यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.