Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगाबाद महापालिका पहिल्यांदाच करणार GIS सर्वेक्षण

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहरातील मालमत्ता आणि संपत्ती यांची नोंद घेण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि औरंगाबाद महानगरपालिका यांच्यातर्फे शहरात GIS सर्वेक्षण करण्यात येत आहे. सध्या शहरातील झोन 8 आणि 9 मध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. आजपर्यंत शहरातील विविध भागात एकूण 1 लाख 23 हजार मालमत्तांना भेटी देण्यात आल्या आहेत.

शहरातील मालमत्ता आणि संपत्ती यांची नोंद घेण्यासाठी आणि त्यांचा मालकीहक्क निश्चित करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली GIS सर्वेक्षण सुरू आहे. शहरात पहिल्यांदाच GIS तंत्रज्ञान वापरून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाद्वारे शहरातील रस्ते, पाईप लाईन इत्यादी विविध घटकांचा मिळून 300 स्तरीय नकाशा तयार करण्यात येत आहे. शहरातील झोन 8 आणि 9 मध्ये सध्या सर्वेक्षण सुरू आहे. झोन 8 वॉर्ड नं. 109 मधील देवानगरी, प्रतापनगर, झोन 9 मधील वॉर्ड नं. 66 अजबनगर, वॉर्ड नं. 72 क्रांती चौक, वॉर्ड नं. 76 विष्णुनगर, वॉर्ड नं. 100 ज्योतीनगर या भागांत सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. झोन 9 मधील वॉर्ड नं. 73 रमानगर आणि वॉर्ड नं. 75 बौद्धनगर या भागांतील सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. झोन 8 आणि 9 मधील विविध भागात लवकरच सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. यासाठी स्मार्ट सिटी तर्फे 150 सर्वेक्षक सर्वेक्षण करत आहेत. औरंगाबाद स्मार्ट सिटी आणि महानगरपालिका कर्मचारी यांच्याद्वारे इंटिग्रेटेड ऑपरेशन कमांड आणि कंट्रोल सेंटर येथे सातत्याने या सर्वेक्षणाचे ट्रॅकिंग सुरू आहे, अशी माहिती औरंगाबाद स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी दिली.

हे सर्वेक्षण करण्यासाठी सर्वेक्षक ठरलेल्या भागातील नागरिकांच्या घरी येतील. आल्यानंतर औरंगाबाद स्मार्ट सिटी ग्राउंड सर्व्हे या ॲप्लिकेशनमध्ये नागरिकांच्या मालमत्तेची नोंद केली जाईल. ही नोंद करण्यासाठी नागरिकांना वीजबिल, पाणी कर बिल, मालमत्ता कर बिल आणि ओळखपत्र म्हणून पॅन कार्ड किंवा आधारकार्ड दाखवणे अनिवार्य आहे. या माहितीव्दारे नागरिकांच्या मालमत्तेची नोंद घेण्यात येईल. या मालमत्ता सर्वेक्षणाद्वारे पूर्ण शहराची विस्तृत माहिती प्रशासनाकडे येईल. या माहिती आधारे शहराचा समान विकास करण्यास मदत होईल. तसेच शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वपूर्ण ठरेल. या सर्वेक्षणाद्वारे मालमत्ता कराचे योग्य आकलन करणे देखील सुलभ होईल. तरी, नागरिकांनी या सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे करण्यात येत आहे.

नागरिक अशी पडताळू शकतात सर्वेक्षण कर्त्याची ओळख

GIS सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक सर्वेक्षणकर्त्याकडे औरंगाबाद महानगरपालिकेचे ओळखपत्र आहे. सर्वेक्षण करण्यासाठी सर्वेक्षण करता घरी आल्यास त्याच्याकडे नागरिक ओळखपत्र दाखवण्याची मागणी करू शकतात. तसेच या ओळखपत्राच्या मागे औरंगाबाद महानगरपालिकेचा +918069092200 हा हेल्पलाइन नंबर देण्यात आला आहे. या हेल्पलाइन वरती संपर्क साधून देखील नागरिक पडताळणी करू शकतात.