Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

शहानुरवाडी बाजारातील पार्किंगच्या जागेवर कोट्यावधींचा गोरखधंदा

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील शहानुरवाडी येथील युरोपीयन धर्तीवर आधारित आठवडी बाजारातील टेंडरनुसार दोन हजार स्केअर मीटर पार्किंगच्या जागेवर विकासकाची हातगाडी आणि पथविक्रेत्यांकडून वसूली करत आहे. यातून प्रतिवर्षी कोट्यावधींचा गोरखधंदा सुरू आहे. विशेष म्हणजे जवळपास दिडशेहून अधिक हातगाड्या आठवडी बाजारासमोरील  रस्त्यावर भरतात. त्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह रिक्षांना जागाच नसल्याने हातगाड्यां पुढे भर वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांच्या होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत होते. यासंदर्भात संबंधित महापालिकेतील बी.ओ.टी. कक्ष प्रमुख आणि समितीचे अर्थपुर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा बाजार वर्तुळात चर्चा ऐकायला मिळत आहे.

वाहनतळाची सोय कागदावर; वाहने रस्त्यावर

शहानुरवाडी येथील विकसित जमीनीवर बी.ओ.टी. तत्वावर उभारलेल्या आठवडी बाजारात व्यापारी, दुकानदार व खरेदी करिता येणाऱ्या ग्राहकांसाठी विकासक श्रीहरी असोसिएट्स प्रा. लि. चे सचीन मुळे यांना सवलत करारानुसार दहा हजार स्केअर मीटर जागा देण्यात आली आहे. त्यातील दोन हजार स्केअर मीटर जागेवर पार्किंगची व्यवस्था करणे बंधनकारक असताना विकासकामेही व्यवस्था देखील कागदावरच ठेवली. पार्किंगच्या जागेवर हातगाडी विक्रेत्यांकडून वसुली करत मागील आठ वर्षात कोट्यावधीची माया जमवली असल्याची बाजारात कुजबुज सुरू आहे. पार्किंगच्या जागेवर गोरखधंदा सुरू केल्याने दर आठवड्याला सोमवारी शहरातील आणि जिल्ह्यातून जवळपास आठशे ते हजार व्यापारी दुकानदार आपले दुकाने लावतात. या बाजाराच्या निमित्ताने अनेक व्यापारी/दुकानदार व खरेदी करिता येणाऱ्या लोकांना आपले वाहन बाजारापासून जवळपास पाचशे मीटर पेक्षाही दुरवर रस्त्याच्या कडेला लावून रस्ता ओलांडून बाजारामध्ये यावे लागते. त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजुने हातगाड्यांची भर पडते.

निम्मा आठवडी बाजार रस्त्यावर भरतो. हजारो वाहने रस्त्यावर असतात. तेथे होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत होते. याचा त्रास वाहनचालकांसह सामान्य नागरिकांनाही होतो. गत आठ वर्षापासून भेडसावत असलेल्या या अडचणीवर महापालिकेतील मालमत्ता विभाग, बी.ओ.टी. कक्ष प्रमुख, नगररचना आणि बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता आणि वाहतूक शाखेने विकासकाला पार्किगच्या जागेबाबत चकार शब्दही विचारला नाही. साऱ्यांचेच अभय पाहून विकासकाने देखील पार्किंगवर तोडगा काढला नाही. आठवडी बाजारातील नकाशाप्रमाणे पुल क्रमांक तीन कडून स्वच्छतागृहाच्या बाजुला पार्किंगसाठी दोन हजार स्केअर मीटर जागेचे आरक्षण  टाकण्यात आल्याचे बाजारातीलच काही दुकानदारांनी टेंडरनामा प्रतिनिधीला सांगितले. मात्र  ठरवून दिलेल्या ठिकाणी देखील विकासक दुकानदारी भरवत वसुली करतात. अगदी पुल क्रमांक दोनकडून बाजाराकडे जाणाऱ्या चिंचोळ्या रस्त्यावर देखील  किरकोळ विक्रेते दुकाने थाटतात. यामुळे बाजाराकडे जाणारा आणि चाणक्यपुरी ते एकताचौक मुख्य रस्त्याचा ५० टक्के भाग व्यापला जातो तर २५ टक्के जागेवर ग्राहकांची वर्दळ असते. परिणामी, वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी  रस्त्याचा फक्त २५  टक्केच भाग शिल्लक राहतो. त्यामुळे बाजाराच्या दिवशी या भागात वाहनकोंडी ठरलेली असते. 

महापालिका बी.ओ.टी.कक्ष झोपेत 

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दर आठवड्याला वाहतूक पोलिस विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. महापालिकेला येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्तांनी अनेकदा सांगूनही महापालिकेतील बी.ओ.टी. कक्ष विकासकावर कोणतीही कारवाई करीत नाहीत. अनेक जण बाजाराच्या दिवशी पर्यायी रस्ता निवडतात. बाजारातील सर्वासाठी महापालिकेने विकासकाला जागा ठरवून दिलेली आहे. रस्त्यावर दुकाने थाटण्यास मनाई केली आहे. तरीही महापालिकेच्या आदेशाचे विकासकाकडून अनेक ठिकाणी सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येते.