Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

जाऊ तिथे खाऊ : अधिकारी-ठेकेदारांना बाप्पा पावला, पॅचवर्क निकृष्ट

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमवारी (५ सप्टेंबर) रस्त्यांच्या निकृष्ट कामांवर न्यायमुर्ती रविंद्र घुगे व न्यायमूर्ती अरूण पेडणेकर यांनी महापालिका, पीडब्लुडी, एमएसआरडीसी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील बड्या अधिकारी आणि कंत्राटदारांच्या मिलिभगतवर ताशेरे ओढले, भयंकर संताप व्यक्त केला. अगदी चारचौघात अधिकाऱ्यांच्या लाजा काढल्या. मात्र, याच सुनावणीच्या दरम्यान सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान एकीकडे खंडपीठात निकृष्ट कामांची पोलखोल सुरू असतानाच दुसरीकडे महापालिकेने हायकोर्ट ते मुकुंदवाडी चौक या सर्व्हिस रस्त्यासह अनेक मार्गांवर निकृष्ट दर्जाचे पॅचवर्क केल्याचा प्रताप केला. त्याचा हा खास लाइव्ह रिपोर्ट...

आधी निकृष्ट काम करायचे, पावसाच्या कृपेने रस्ता उखडतो, ओरड होते, नेमक्या गणपती विसर्जनाच्या तोंडावर कोट्यावधीची पॅचवर्कची कामे निघतात. काही दिवसांच्या सोयीनंतर पुन्हा नवरात्रोत्सव, दिवाळी-दसऱ्याला तीच ओरड, तीच कामे, तोच भ्रष्टाचार आणि पुन्हा तेच दुष्टचक्र. सगळीकडची हीच स्थिती. मात्र, औरंगाबाद त्याही पुढे आहे. या दुष्टचक्रातील नागरिकांची काही दिवसांची सोयदेखील अधिकारी आणि ठेकेदारांना नको आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. इंडियन रोड काँग्रेसचे सर्व नियम पायदळी तूडवून खड्डे बुजवले जातात. मात्र सनासुदीचे औचित्य साधून घाईगडबडीत केलेल्या कामामुळे रस्त्यारस्त्यांत उंचवटे, सोबतीला नक्षीकाम आणि निकृष्ट कामाची विशेष भेट अधिकारी आणि ठेकेदार देत असल्याने, लोकांना आगीतून फुफाट्यात आल्याचा अनुभव येत आहे. यात मात्र अधिकारी आणि ठेकेदारांना ऐन सणासुदीच्या काळात लक्ष्मी अधिक पावल्याने त्यांची भरभराट होते. इकडे मात्र जनतेच्या पैशाचे दिवाळे निघून कंबरतोड आणि अंगठेफोड सोसावी लागते.

पालिकेत निधी नसल्याची कबुली स्वतः प्रशासकांनी मोठ्या उदार मनाने दिली. मात्र, तोडपाणीच्या कामांसाठी तरतूद होते कशी, हा प्रश्न लोकांपुढे निकृष्ट रस्त्यांपेक्षाही मोठा आहे. लोकांच्या सोयीसाठी करण्यात येणारी कामे त्यांनाच अडचणीची ठरतील, अशा सदोष पद्धतीने आणि निकृष्ट दर्जाची होत असताना त्यावर स्वतः प्रशासक म्हणून सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचे. त्यावर देखरेख करणारे अभियंते झोपेत असतात काय, असा प्रश्न औरंगाबादकरांकडून विचारला जातो जो, की प्रशासकांनीच अधिकाऱ्यांना विचारणे अपेक्षित आहे. ठेकेदार पेमेंट मिळत नसल्याची ओरड करतात; मात्र वर्षानुवर्षे तेच ही कामे का करतात, हादेखील प्रश्न आहे. ‘टेंडरनामा ’कडे वारंवार येणार्‍या तक्रारींनंतर चमूने शहरातील हायकोर्ट ते मुकुंदवाडी चौक व विविध गणपती विसर्जन मार्गावरील पॅचवर्क आणि रस्त्यांची पाहणी केली असता बिनडोकपणे आणि निकृष्ट कामे करण्यात आल्याचे उघड झाले. ‘ट्रिमिक्समध्ये पाणी टाकून सिमेंटचे पैसे’ घेतले जात असल्याचे चित्र दिसले. तात्पुरत्या मलमपट्टीच्या नावाखाली रस्त्याची एक बाजू सोडून दुसर्‍या बाजूने गतिरोधक तयार करण्यात आलेत. सालाबादाप्रमाणे भर पावसात गणपती विसर्जनाच्या तोंडावर होणारी ही खड्ड्याच्या शेजारी खड्डे सोडून होणारी नक्षीदार मलमपट्टी अधिकारी व ठेकेदारांना मुलायम व फायद्याची ठरते.

असे असावे पॅचवर्क

जिथे खड्डा असेल तिथे मार्किंग करावी. खड्डा उकरल्यांनतर फड्याने व तारेच्या ब्रशने त्याला घासून काढावा. त्यात माती नसावी. सर्वात खालच्या थरात खड्डय़ाच्या साइजप्रमाणे 45 सेंटिमीटरचे डबर भरावे. त्यात 35 सेंटिमीटरचा मुरमाचा थर भरावा. त्यावर पाणी शिंपून रोलरने दबाई करावी. त्यानंतर त्यावर पुन्हा 20 सेंटिमीटरचा खडीचा थर टाकावा. त्याची पुन्हा दबाई करायची व त्यावर पुन्हा 6 सेंटिमीटर बारीक खडीचा खच टाकावा. एवढे झाल्यावर डांबराने सीलकोट करून दबाई करावी. हे सर्व मटेरियल संबंधित विभागाने दक्षता व गुणनियंत्रक मंडळामार्फत चाचणी करूनच वापरणे आवश्यक आहे. तरच हे पॅचवर्क व्यवस्थित आणि रस्त्याला समान उंचीचे होईल. कुठेही टेमकाड दिसणार नाही, असे तज्ज्ञ म्हणतात.

प्रशासक साहेब पॅचवर्कचे मोजमाप करा

शहरातील खड्डेमय रस्त्यांवर ओरड होताच महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी गणपती विसर्जनापूर्वी सर्व खड्डेमय रस्त्यांचे पॅचवर्क करणार असल्याची औरंगाबादकरांना कबुली दिली. त्यावर ३ कोटी खर्चाची मुभा देखील अधिकाऱ्यांना दिली. यासाठी अधिकाऱ्यांनी २५ लाखाचे डांबर आणल्याची देखील घोषणा केली. स्मार्ट सिटी योजनेतील रस्ते काम करणार्या ए.जी. कन्सट्रक्शन कंपनीची खंड्डे भरण्यासाठी नियुक्ती केली. मात्र यातही ठेकेदारांची नावे वेगळीच दिसली. त्यातही पॅचवर्कचे नियम तोडून रेडिमेड ट्रिमिक्सने खड्डे भरने सुरू असल्याचे दिसले. त्यामुळे या तीन कोटीच्या कामावर संशय बळावत असून प्रशासकांनी रस्त्यावर उतरून या पॅचवर्क कामाचे मोजमाप करणे गरजेचे आहे.तसेच पॅचवर्कच्या कामाचे बील देताना औरंगाबादकरांच्या जाहिर प्रतिक्रीया मागवा.