Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगाबाद पालिकेचा महाप्रताप; आता पॅचवर्कच्या नावाखाली रस्त्यांवर..

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : शहरातील बहुतांश रस्त्यांची पावसामुळे वाट लागली आहे. त्यात भर पावसाळ्यात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्त्यांच्या कामात कासवगती आणि खोदकामामुळे औरंगाबादकर मेताकुटीस आले आहेत. याशिवाय महापालिका निधीतील १०० कोटीच्या कामांना ठेकेदारांनी कायमचे ग्रहन लावले आहे. स्मार्ट सिटी आणि महापालिका निधीतून रस्ते चकचकीत होणारच आहेत, असे गृहीत धरून वायफळ खर्च नको म्हणून महापालिकेने पावसाळ्यापूर्वी पॅचवर्कचे काम हाती घेतले नाही. शहरातील ९ झोन मधील ११५ वार्डात पॅचवर्कसाठी प्रभाग अभियंत्यांनी पाठवलेले अंदाजपत्रक देखील लेखाविभागात धुळखात पडल्याचे टेंडरनामा तपासात उघड झाले आहे.

त्याऐवजी होत असलेल्या रस्ते कामातील खडी, मुरूम आणि डांबराचे डेब्रिज खड्ड्यात टाकून बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची धम्मस न करता थातूरमातूर काम केल्याने खड्ड्याच्या त्रासातून सुटका करत टेमकाडाचा त्रास औरंगाबादकरांना भेट देत आहेत. माघे पाण्याचे डबके आणि पुढे टेमकाडावरून जात असतांना प्रवाशांना नदीघाटातून जाण्याचा भास निर्माण होत आहे.अर्थातच औरंगाबादकरांना आगीतून फोफाट्यात नेण्याचा प्रताप महापालिकेने थांबवायला हवा अशी मागणी होत आहे.

मुळात आयआरसीच्या (इंडियन रोड काॅग्रेस) नियमाप्रमाणे डांबरी रस्त्यावरील खड्ड्याला चारही बाजुने मार्किंग करून जुन्या सरफेसपर्यंत खोदकाम करून फड्याने त्याची स्वच्छता करून झारीने डांबर शिंपून त्यात जीएसबी (ग्रॅन्युवल सब बेस) अर्थात खडीकरण मजबुतीकरण करणाचा पहिला थर दिल्यानंतर जाडबारीक खडीचा थर टाकुन त्यावर डांबराचा डोस देणे आवश्यक आहे. जिथे काॅक्रीट रस्ता असेल त्यातील खड्ड्याचा भाग ग्रृव्हकटरने कापुन तेवढ्या भागात त्याच पध्दतीने काॅक्रीट करणे गरजेचे आहे. मात्र या शास्रोक्त पध्दतीचा अवलंब न करता थेट जुनाट खडी, डांबर, मुरुम व मातीचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे ते खड्ड्यात न पसरवता , दबाई न करता कुठे डोंगर , तर कुठे टेमकाडं उभी केली जात आहेत. सुमार आणि नियोजनशुन्य, गलथान आणि हलगर्जीपणामुळे सुमार दर्जाच्या या कामावर हे औरंगाबादकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशाच पद्धतीने ही ' जुगाडू ' पॅचवर्क मोहीम सुरू राहिल्यास शहरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून शहरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरातील ५९ किमीचे काही रस्ते वगळता एकही रस्ता खड्डेमुक्त दिसत नाही. महापालिका प्रशासन तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करते. पण नंतर काही दिवसांतच पुन्हा वाहनधारकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. शहरातील रस्त्यांची अशी स्थिती असताना त्यामध्ये पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांची पक्की दुरूस्ती करण्याऐवजी त्यात दुसर्याच समंस्यांची भर रस्त्यांत घातली जात आहे. रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. जीवघेण्या खड्ड्यातून प्रवास करावा लागत दिवसेंदिवस शहवासीयांमध्ये रोष निर्माण होत आहे. मॉन्सूमपूर्व कामाचा भाग म्हणुन महापालिकेने जानेवारी फेब्रुवारी दरम्यान पॅचवर्क व नवीन रस्त्यांच्या कामाला सुरुवात करायला हवी. पण आधी कामाला विलंब लावायचा, मग नागरिकांची ओरड होते. भर पावसाळ्यात थेट डेब्रिज आणून ओतायचे असा भोंगळ कारभार औरंगाबाद महापालिकेकडुन सुरू आहे.