Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad : जनतेसाठी झटणाऱ्या पीडब्लूडी अधिकाऱ्यांना शिक्षा?

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : जनतेच्या सोयीसाठी झटणाऱ्या पीडब्लूडीतील अधिकाऱ्यांच्या सोसायटीत खड्डेमय रस्ते, पाण्याची कसलीही सोय नाही, पथदिव्याचा उजेड नाही, ना खेळण्याचे पटांगण, ना उद्यानाचा विकास, वाढलेले गवत.. आशा अवस्थेत औरंगाबादच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील सेवानिवृत्त आणि सेवेत असलेले अधिकारी-कर्मचारी वसाहतीत जीव मुठीत घेऊन लोक राहात आहेत. महापालिकेत कर भरूनही ३२ वर्षांत मुलभुत सुविधा मिळत नसल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. टेंडरनामाकडे प्राप्त तक्रारीनुसार प्रतिनिधीने पाहणी केली असता येथील भयावह परिस्थिती पाहता तो दावा खरा असल्याचे पाहणीत उघड झाले आहे.

रस्ते, पाणी, उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेचा विकास, पथदिवे यामागणीसाठी येथील सोसायटीचे आजी-माजी अध्यक्ष व सचिव गेल्या ३२ वर्षांपासून महापालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. परंतु या शासकीय अधिकाऱ्यांच्या सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेकडे मात्र महापालिका कारभाऱ्यांकडून नेहमीच दुर्लक्ष होत आहे. बीड बायपास आणि रेल्वे रूळाच्या मधोमध शहानुरवाडी, मुस्तफाबाद येथे सर्व्हे क्रमांक-१ येथे ही वसाहत असून ३२ वर्षापूर्वीची या भागातील जुनी वसाहत म्हणून तीची ओळख आहे. येथे एकूण ६६ भुखंड आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी ते उप तसेच शाखा, कनिष्ठ अभियंत्यासह  वरीष्ठ व कनिष्ठ लिपीकासह शिपाई अशी १०० पेक्षा अधिक कुटुंब राहत आहेत.

वसाहत स्थापन झाल्यापासून पक्क्या सडका नाहीत, पथदिव्यांची दुरवस्था झाली असून, महापालिकेच्या जलवाहिन्याच नसल्याने विकतच्या तेही बोअरच्या पाण्यावर अधिकाऱ्यांना तहाण भागवावी लागते. विद्युतवाहिण्यांना सहजपणे स्पर्श होईल इतक्या खाली त्या लोंबकळलेल्या आहेत. रस्तेच नसल्याने पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते. रस्ते, पाणी, दिवाबत्ती आणि मलःनिसारण वाहिनी, वृक्ष आणि उद्यान तसेच पथकरासह लाखोचा कर वसुल केला जात असताना गेल्या ३२ वर्षात कोटी रूपये महापालिकेकडे येथील अधिकाऱ्यांनी जमा केलेला आहे. असे असताना रस्त्याच्या व पथदिव्यांच्या व इतर विद्युतकामाच्या डागडुजीची कामे करण्यासाठी निधी असताना सार्वजनिक बांधकाम विभागागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोसायटीत महापालिकेकडून छळ केला जात असल्याचा आरोप रहिवाशांचा आहे. एकीकडे गावभर स्वच्छतेचा डंका पिटणाऱ्या महापालिकेची घंडागाडी देखील निश्चित वेळेत येत नाही. 

संस्थेकडून महापालिकेने मोकळे पटांगण हस्तांतर करून घेतले. तेथे अधिकाऱ्यांनी याच पश्चिम मतदार संघातील आमदार संजय शिरसाट यांच्याकडे पाठपुरावा करून मोकळ्या जागेत सार्वजनिक सभागृहाची पक्की इमारत आणि सुरक्षाभिंत बांधून घेतली. चारदोन बाकडे टाकून घेतले. मात्र उद्यानासाठी आरक्षित असलेल्या याजागेत गवत अन् रानटी झुडपे आकाशाला गवसनी घालत आहे. बाकडेही मोडकळीस आले असून पाण्याअभावी लोक - सहभागातून लावलेली झाडेही जळत आहेत. उद्यानात चिमुकल्यांसाठी खेळणी अन् सुशोभिकरण करावे , अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.

परिसरात दिवाबत्तीची पुरेशी सोय नसल्याने अंधाराचा फायदा घेत अंगावर झडप घालुन खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने  पळवण्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. वसाहतीत मोठय़ा प्रमाणात गवत आणि कचर्याचे प्रमाण वाढल्याने मोकाट जनावरांचा संचार वाढलेमा आहे. सापांचे दर्शनही होत असते. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने तापाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. याबाबत अनेक वेळा येथील रहिवाशानी अधिकाऱ्यांना सांगूनही बदल होत नाही. घरांच्या वाढत्या किमतींमुळे दुसरीकडे  घर घेणेही अशक्य आहे. त्यामुळे जीव मुठीत घेवूनच राहावे लागत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.