Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगाबाद महापालिकेतील अधिकाऱ्यांचा प्रताप; खड्ड्यात मातीचे डोंगर

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : रस्ते कामासाठी साडेतेरा कोटींचे टेंडर काढले, स्थायी समितीची मंजुरी घेतली, ठेकेदार नियुक्त केला, परंतु पुढे तब्बल दहा वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या आणि जालना रोडला समांतर ठरणाऱ्या लक्ष्मणचावडी ते कैलासनगर या मार्गावर महापालिकेने खड्डे दुरुस्तीसाठी चक्क शहरातील इतर ठिकाणी खोदलेल्या रस्त्यातील माती आणून त्यावर डोंगर उभे केले आहेत. महापालिकेमुळे यामार्गावर अपघाताची चिन्हे दिसू लागली आहेत.

ऐन गर्दीच्या व वर्दळीच्या या रस्त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने पॅचवर्क न करता खोदकामातील मलबा टाकून बुजवण्याचा प्रताप महापालिकेकडून केला जात आहे. मात्र, त्याला खड्ड्यात पसरवण्याचे कष्ट देखील केले जात नसल्याने नागरिकांच्या त्रासात भर पाडण्याचे काम महापालिका करत आहे. त्यामुळे वाहतुकीची नवी अडचण निर्माण झाली आहे.

वर्दळीचा रस्ता

लक्ष्मणचावडी ते कैलासनगर या मार्गावर दोन्ही बाजुने दाट वसाहती, दुतर्फा दुकाने, लाकडाच्या वखारी, भंगाराचे गोडाऊन ,छोटीमोठी रूग्णालये, धार्मिक स्थळे आणि स्मशानभूमी असल्याने वाहतुकीची नेहमी वर्दळ असते. या रस्त्याला अनेक अंतर्गत रस्ते येतात. शिवाय जड वाहतूक येथे नेहमी असते. अशा स्थितीत इतर ठिकाणी खोदलेल्या रस्त्यातील मातीचे डोंगर निम्म्या रस्त्यावर उभे केल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याबाबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, खड्ड्यात कोणी पडू नये म्हणून त्यांत तात्पुरते मटेरियल टाकुन ते बुजवत आहोत. येत्या दोन दिवसांत ते जेसीबीने पसरवले जातील, असे त्यांनी सांगितले.

कधी होणार रस्त्याचे काम?

तब्बल दहा वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या आणि जालना रोडला समांतर ठरणाऱ्या लक्ष्मणचावडी ते कैलासनगर रस्त्याच्या कामात कायम अडसर असून, या रस्त्याच्या कामाचे टेंडर २०१८ मध्ये निघाले होते. स्थायी समितीच्या बैठकीत देखील टेंडर मंजूर करण्यात आले होते. दहा वर्षापूर्वी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी लक्ष्मणचावडी ते कैलासनगर रस्त्याचे देखील रुंदीकरण केले. २०११-१२ यावर्षी रुंदीकरणाचे काम झाल्यावर लक्ष्मण चावडी ते कैलासनगर स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. पण वर्षभरातच या रस्त्याची 'जैसे थै" स्थिती झाली. पुढे या रस्त्याचे काम रखडले. या रस्त्याचे काम महापालिकेने लवकर सुरू करावे यासाठी आमदार अतुल सावे, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांच्यासह कैलासनगर भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांनी पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, परंतु निधीअभावी रस्त्याचे काम झालेच नाही.

साडेतेरा कोटीच्या टेंडर नंतरही साडेसाती कायम

सरकारने पालिका निवडणुकीवेळी शहरातील रस्त्यांसाठी २४ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी दिला. त्यातून साडेसहा कोटी रुपये महावीर चौक ते क्रांतीचौक या रस्त्यासाठी ठेवण्यात आले. कालांतराने हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित गेल्यामुळे या रस्त्यासाठीचे साडेसहा कोटी रुपये लक्ष्मणचावडी ते कैलासनगर रस्त्यासाठी वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. निधी वळवल्यानंतरही रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही. दरम्यान सरकारने रस्त्यांसाठी पुन्हा शंभर कोटींचे अनुदान दिले. त्यातील पाच कोटी रुपये कैलासनगरच्या रस्त्यासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. साडेतेरा कोटी रुपये या रस्त्यासाठी उपलब्ध झाल्यामुळे महापालिकेने या रस्त्याच्या कामाचे टेंडर काढून ते ए. एस. कन्ट्रक्शन कंपनीला दिले आहे.त्यानंतर स्थायी समितीने देखील टेंडर मंजुरीचा प्रस्ताव मंजूर झाल्यावर देखील या रस्त्याच्या कामाला मुहूर्त सापडला नाही.