Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

औरंगाबादेत सरकारी पैशांचा दुभाजकांवर कोट्यावधी रूपयांचा चुराडा

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : सरकारच्या कोट्यावधी रूपयांचा औरंगाबाद महापालिकेकडून चुराडा होत आहे. मनपाने १९ कोटी ९९ लाखांचे अंदाजपत्रक तयार करून दुभाजक बांधणीसाठी २४ मोठ्या रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात २६ किलोमीटर दुभाजक बसविण्याचे काम अत्यंत संथगतीने आणि निकृष्टपणे सुरू असल्याचे 'टेंडरनामा'च्या पाहणीत समोर आले आहे. एकीकडे 'टेंडरनामा' प्रतिनिधीची पाहणी सुरू असताना मनपाचे स्थायी समितीचे माजी सभापती विजय वाघचौरे यांनी रेल्वेस्टेशन रोडलगत अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा ते पंचवटी दुभाजकाचे निकृष्ट पद्धतीने सुरू केल्याचा आरोप करत काम बंद केले. मात्र, कंत्राटदाराने अद्याप तिकडे काम सुरूच झाले नसल्याचा दावा केला. यावर प्रतिनिधीने पाहणी केली असता काम सुरू झाल्याचे दिसले. यावरून कंत्राटदाराचे कामावर किती लक्ष आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

औरंगाबादेत होत असलेल्या नव्या दुभाजकांपेक्षा आधीचेच दुभाजक बरे होते, असे म्हणण्याची वेळ औरंगाबादकरांवर आली आहे. अत्यंत निकृष्ट साहित्याचा वापर करून दुभाजकाचे बांधकाम सुरू आहे. त्यात कुठेही लाईनदोरीचा वापर न करता ठोबळ मानाने प्लेटा ठोकुन त्यात ओबडधोबड पद्धतीने काँक्रिट ओतले जात आहे. दुभाजकाची एक बाजु उंच तर दुसरी बाजु खाली, अनेक ठिकाणी दुभाजकाचे पोट फाटल्याने दुभाजकांना गर्भ फुटल्याची हास्यास्पद चर्चा शहरभर सुरू आहे. याकडे मात्र मनपा कारभाऱ्यांचा अर्थपूर्ण कानाडोळा असल्याचे बोलले जात आहे. बुधवारी रेल्वेस्टेशन रोडलगत अहिल्याबाई होळकर चौक ते पंचवटी दुभाजकाचे काम निकृष्टपणे होत असल्याचे निदर्शनास येताच शिवसेनेचे मनपातील स्थायी समितीचे सभापती विजय वाघचौरे यांनी ते बंद पाडले. यासंदर्भात त्यांनी मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. आता ते याप्रकरणी काय कारवाई करतात याकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागून आहे.

पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी केंद्राच्या १५ व्या वित्त आयोगाकडून औरंगाबाद मनपाला ६५ कोटींचा घसघशीत निधी मिळाला. या निधीतून मुख्य रस्त्यांवर दुभाजक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात काम सुरू झाले. मात्र दुभाजक बांधण्याआधी जमीनस्तरापासून किमान अर्धा फुट पायाखोदुन  कठड्यांचे बांधकाम न करता जुने दुभाजक तोडुन त्यावरच कठडे उभारणीचे काम सुरू आहे.या प्रकारामुळे  दुभाजकांना मजबुती येत नसल्याने हलक्या वाहनाच्या धडकांमुळे दुभाजकाचे कठडे तूटतात. निकृष्ट दुभाजकांच्या बांधकामामुळे आधीच खंड्ड्यांनी त्रस्त असलेल्या औरंगाबादकरांच्या संतापात अधिक भर पडत आहे. टेंडरनामाच्या वृत्तमालिकेनंतर जिल्हा रस्ते सुरक्षा समितीसह न्यायालयाने मनपावर ताशेरे ओढले. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबर महिन्यात महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगाचा निधी राज्य शासनामार्फत मिळाला. तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ज्या भागात नवीन सिमेंट रस्ते तयार करण्यात आले, तेथे दुभाजक बसविण्याचे आदेश दिले. त्यानुसार तज्ज्ञ अभियंत्यांनी अंदाजपत्रक तयार केले. १९ कोटी ९९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया राबविली. साडेबारा टक्के कमी दराने काम करण्याची तयारी के.एस. कन्स्ट्रक्शनचे खंडु पाटील यांनी निविदा प्रक्रियेत दाखविली. त्यामुळे संबंधित एजन्सीला काम देण्यात आले. १४ कोटी ५४ लाख रुपयांमध्ये हे काम होत आहे. एकूण २४ मोठ्या रस्त्यांवर हे दुभाजक बांधनीचे काम सुरू आहे. ज्यांची एकुण २६ किलोमीटर लांबी आहे.

मागील ऑगस्ट महिन्यापासून नियुक्त कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली आहे. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर मागील काही वर्षांपासून दुभाजक नसल्याने लहान-मोठे अपघात होत होते. नागरिकांनीही या कामाचे स्वागत केले. या रस्त्यावरील जुने दुभाजक काढून नवीन बसविण्याचे काम सुरू झाले. मात्र दुभाजकांचे काम पाहता मनपाकडुन कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी का केली जातेय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.होत असलेले ओबडधोबड काम पाहून  व त्यात  कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असल्याचे पाहून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार सुरू आहे.

काय म्हणाले कंत्राटदार

मनपाने दिलेल्या आराखड्यानुसार स्टील डिझाईन केले आहे. कामात एम - २५ ते एम - ३० पर्यंत रेडिमिक्स काॅक्रीट टाकत आहोत. वेळोवेळी प्रकल्प सल्लागार आणि मनपाचे अभियंता येऊन कामाची पाहणी करतात.बांधकाम साहित्याच्या देखील टेस्ट केल्या जातात. सबठेकेदार नेमणे हा काही गुन्हा नाही. आयआयटीच्या पथकामार्फत कामाची तांत्रिक तपासणी केली जात आहे. कुठेही निकृष्ट काम होत नाहीए. कामाबाबत तक्रारदारांनी कुठेही तक्रारी केल्या तरी मला फरक पडणार नाहीऐ.

- खंडु पाटील , के. एच. कंन्सट्रक्शन 

दुभाजकात बिल्डिंग मटेरियल टाकले जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर तातडीने काॅन्ट्रक्टदाराला सूचना देण्यात आल्या होत्या. आता तो काळीमाती टाकत आहे. जिथे जिथे कामात फुगवटा आला असेल, ते बांधकाम तोडुन नव्याने केले जातील. प्रशासकांच्या आदेशानुसार दुभाजकांचे काम जलदगतीने सुरू आहे.

- बी. डी. फड, कार्यकारी अभियंता, मनपा