Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad:हर्सूल रस्त्याबाबत प्रशासकांच्या जुन्या आश्वासनाचे काय?

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : गेल्या ४० वर्षांपासून रखडलेल्या हर्सूल रस्त्याची रुंदीकरण मोहिम फत्ते झाली आणि अखेर या रस्त्याचा श्वास मोकळा झाला. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या संपूर्ण मालमत्ता पाडण्यास आल्या आहेत. आता मलबा उचलायचे काम प्रगतीपथावर आहे. यानंतर तातडीचे रस्ता बांधकाम करून ३० मीटर अर्थात शंभरफुट रस्त्याचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. दोन्ही बाजुने अकरा मीटर लेअर आणि रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकला जाणार आहे.

रस्त्याचे भव्यदिव्य रूंदीकरण पाहुण भारावलेले महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी पुन्हा ३० मीटर रूंद रस्त्याच्या शेजारी दोन्ही बाजुने १५ मीटरचे सेवा रस्ते तयार करण्याचे स्वप्न औरंगाबादकरांना दाखवले. हे स्वप्न साकार झाले तर हर्सूल ते थेट सिडको बसस्थानकापर्यंत अखंडीत सेवा रस्ते तयार होऊन वाहतुक कोंडी फोडण्यास अधिक फायदा पोहोचणार आहे. महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांचे या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल अभिनंदन. पण यासाठी महापालिकेला पुन्हा पंधरा ते वीस कोटी रूपये लागतील इतका पैसा महापालिका प्रशासक आणणार कोठुन अशी चर्चा शहरात सुरू आहे. विशेष म्हणजे प्रशासकांच्या या वक्तव्यानंतर शहरभर टिकास्र देखील पसरले.

टेंडरनामाने हर्सूल गावात फेरफटका मारला असता हर्सूल कचरा प्रकल्पाचा मोबदला घेण्यासाठी याच गावातील शेतकरी वर्षभरापासून महापालिकेसह जिल्हाप्रशासनाच्या पायऱ्या झिजवत आहेत. हा अनुभव पाहता गावातील लोक भूसंपादनास विरोध करण्याची दाट शक्यता आहे. गेल्या कित्येक वर्षापासून शहर विकास आराखड्यानुसार शंभर फुटाच्या दमडीमहल ते आकाशवाणी जालनारोड, लक्ष्मण चावडी ते एमजीएम, जिन्सी ते राजा बाजार तसेच सिडको एन - २ मुकुंदवाडीतील झेंडाचौक ते विश्रांतीनगर या रस्त्यांचे रूंदीकरण रखडलेले आहे. बीड बायपास पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा महापालिका हद्दीतील सेवा रस्ते केलेच नाहीत. याशिवाय जुन्या शहरातील औरंगपुरा, गुलमंडी भागात वाहतुक कोंडी कायम आहे. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर दीडशे कोटी रस्ता योजनेतील महापालिकेच्या वाट्यातील ५० कोटी ५८ लाखापैकी ३५ कोटीची थकबाकी देण्यास शिंदे सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे तिजोरीचा अंदाज आणि सरकार काही देईलका याची विचारणा करूनच प्रशासकांनी पाऊल उचलायला हवे, असा सल्ला वजा टोला औरंगाबादकरांकडून मारला जात आहे.

काय म्हणतात नागरिक

औरंगाबादेतील रस्ते रुंदीकरण मोहीम ही गेल्या काही वर्षात रखडली आहे.शहर विकास आराखड्यानुसार काही रस्त्यांचे अधिग्रहण झाले नसल्याने या मोहिमेला ब्रेक लागला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी ही नेहमीचीच झाली आहे. अरुंद रस्ते असल्याने वाहनांना येजा करण्यात अडसर निर्माण होत आहे. मात्र, रुंदीकरण करण्यासाठी महापालिकेला मुहुर्त सापडत नाहीए. नागरिकांनी देखील शहर विकासासाठी स्वतःहून मालमत्ता रिकाम्या करून देणे गरजेचे आहे.

- प्रा. शेखर टोमने

जगप्रसिद्ध पानचक्की, मकबराकडे जाण्यासाठीचे महत्वाचे रस्ते देखील अरूंद आहेत. मकईगेट, महमूद आणि नौबतगेटचे बारापुल्ला गेटप्रमाणेच दोन्ही बाजुने रूंदीकरण करावे, जेनेकरून गेटचे संवर्धन वाढेल व वाहतूकीची कोंडी देखील फुटेल.

- डाॅ. विशाखा अरणकल्ले

मुकुंदवाडीतील झेंडाचौकापर्यंत ठेकेदाराने काॅक्रीट केले आहै. पण पुढे विश्रांती चौकापर्यंत रूंदीकरणाचे फंक्त तीनशे मीटर काम रखडले आहे. हा रस्ता पुर्ण झाला,तर थेट जालनारोड ते  बीड बायपासला जुळणार आहे. यामुळे जालना रस्त्यावरची कोंडी कमी होईल. प्रषासकांनी या महत्वाच्या रस्त्यांकडे लक्ष द्यावे.

- ॲड. शिवराज कडू पाटील

शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या भूसंपादनासाठी दोन ते अडीच कोटीचा निधी देता आला नाही. याभागातील नागरिकांनी लढ्याचे बळ दिले. प्रकरण न्यायालयात गेले, सुनावणीनंतर शासनाने निधी उपलब्ध करून दिला. भूसंपादनाचा सुधारीत प्रस्ताव आणि मोजणीनंतरही मुल्यांकनासाठी महापालिकेने  विशेष भूसंपादन विभागाची अडवनुक केली. कागदी खेळात आता प्रकल्पाच्या किमतीत वाढ झालीतर प्रशासकांनी भरपाईची रक्कम तयार ठेवावी. मग हर्सूल रस्ता दोनशे फुट करण्याचे स्वप्न दाखवावे.

- डाॅ. सोनाली नायगव्हाने