Aurangabad
Aurangabad  Tendernama
मराठवाडा

औरंगाबादेत मजीप्रा आणि मनपाचा प्रताप; ऑक्सिजन हबवर जलकुंभ?

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : विजयनगर हाउसिंग सोसायटीच्या जागेवर लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन हबवर तसेच उद्यानाच्या आरक्षित जागेवर जलकुंभ बांधण्याचे प्रयत्न मजीप्रा व मनपाने सुरू केले आहेत. मजीप्राचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी येथील रहिवाशांनी एका बाजूने न्यायालयीन लढा सुरू केला असून, हे बेकायदा बांधकाम रोखण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही या रहिवाशांच्या वतीने मनपाचे माजी स्थायी समितीचे सभापती रेणूकादास वैद्य उर्फ राजु वैद्य यांनी मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांच्यासह मजीप्राचे कार्यकारी अभियंता अजयसिंह यांना गुरूवारी दिला.

स्थायी समिती सभापतींकडुन दखल

विजयनगर सोसायटीच्या ग्रीनबेल्ट व उद्यानाच्या जागेवर होत असलेल्या पंपगृह व जलकुंभ उभारणीचा मजीप्रा व मनपाचा डाव स्थानिक रहिवाशांनी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती रेणूकादास वैद्य यांच्या कानावर टाकला. त्यांनी देखील रहिवाशांच्या तक्रारीची दखल घेऊन हे बेकायदा बांधकाम होऊ देणार नसल्याचे पत्र मजीप्रचे कार्यकारी अभियंता अजयसिंह तसेच मनपा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांना दिले. 

शेकडो झाडांची कत्तल

दुसरीकडे लोकसहभागातून कडा कार्यालयाच्या सुरक्षाभिंतीलगत ग्रीनबेल्टमधील लावलेल्या तीन हजार झाडांपैकी शेकडो झाडांची कत्तल करून तोडलेली झाडे रातोरात गायब करण्यात आली आहेत. त्यानंतर जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे. या जागेवर दहा लाख लिटर क्षमतेचा पंपगृह उभारला जाणार असल्याचे मनपा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विजयनगर सोसायटीतील रहिवाशांनी वैद्य यांना गुरूवारी मजीप्रा आणि मनपाच्या मनमानी कारभाराची माहिती देताच वैद्य यांनी तातडीने घटनास्थळी येउन पाहणी केली. दोन्ही प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरूद्ध त्यांनी या भागातील नागरीकांच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी तोडलेली झाडे कुठे गेली याचा देखील ते शोध घेणार आहेत.

काय आहे प्रकरण

गारखेड्यातील सेव्हनहिल आणि कडा कार्यालयाच्या मधोमध नगर भूमापन क्रमांक १५/१८७ (अ) यावर पंचवीस ते तीस वर्षापूर्वी दीड ते दोन एकर जागेवर विजयनगर हाउसिंग सोसायटी स्थापन करण्यात आली आहे. सोसायटीच्या पाठीमागे १९८० दरम्यान मनपाने मजीप्राच्या माध्यमातून ३५ लाख लिटरचा जलकुंभ उभारलेला आहे. तेथेच १० लाख लिटरचा पंपगृह देखील उभारला आहे. कडा कार्यालयाच्या जागेवर उभारलेला हा जलकुंभ कडा जलकुंभ या नावाने ओळखला जातो. या जलकुंभातून गारखेडा, शहानुरवाडी, जवाहर काॅलनी व उल्कानगरी भागातील सुतगिरणीचौक, विद्यानगर, विजयनगर, राणानगर, मेमननगर, संदेशनगर, रोशन आणि अलंकार हाउसिंग सोसायटी, बौध्दनगर तसेच सारंग सोसायटी व गजाजन मंदीर परिसरातील काही वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. क्रांतीचौक जलकुंभातून येथील जलकुंभात संपाद्वारे पाणी चढवले जाते. शिवाय पुंडलीकनगर व सिडको जलकुंभाला याच जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो. 

नव्या पंपगृह व जलकुंभासाठी थेट ऑक्सीजन हबवर कुऱ्हाड 

मात्र, हा जलकुंभ व पंपगृह  ४२ वर्ष जुना झाल्याने मजीप्राने नव्याने जलकुंभ व पंपगृह उभारणीसाठी परिसरात जागेची शोधाशोध केली. तेव्हा जुन्या जलकुंभाशेजारीच विजयनगर येथील एका उद्यानात तीन ते चार हजार झाडांचा ऑक्सीजन हब आणि ग्रीनबेल्टची पंपगृहासाठी निवड केली.

विकास आराखड्यात ग्रीनबेल्ट आणि उद्यान

मात्र नगर भूमापन क्रमांक १५/१८७ (अ) येथे विजयनगर हाउसिंग सोसायटीतील या जागेवर मोठमोठे गृहसंकुल उभारण्यात आले आहेत. या गृहसंकुलातील फ्लॅटची विक्री करताना विकासकाने संपूर्ण गृहसंकुलाचा आराखडा दाखविला होता. त्यानुसार या गृहसंकुलाच्या पाठीमागे  ग्रीन बेल्ट व उद्यान बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. तो आराखडा पाहूनच येथील प्रत्येक रहिवाशाने फ्लॅट विकत घेतले होते. या जागेवर अनेक इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून अनेक वर्षापासून फ्लॅटधारक वास्तव्य करत आहेत. मजीप्राने पर्यावरन विभागाची परवानगी न घेता रातोरात ग्रीन बेल्टच्या जागेवरील शेकडो  झाडांची कत्तल करून तीन दिवसात जागेचे सपाटीकरण केले. या चिंचोळ्या बोळीत पंपगृह उभारण्याचा डाव आखला आहे. दुसरीकडे त्याला लागुनच उद्यानाच्या जागेवर आता जलकुंढ उभारण्याचा घाट मजीप्रा व मनपाने घातल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.

कोट्यावधीची वसुली ; विकासाच्या नावानं बोंबाबोंब

१९९८ च्यादरम्यान निर्माण करण्यात आलेल्या या गृहसंकुलाच्या विकासकाकडुन मनपाने बांधकाम परवानगी, रस्ते विकास शुल्क व शहर विकास शुल्कासह बेटरमेंट चार्जेसपोटी कोट्यावधी रूपये उकळले. गृहसंकल्प उभारणीनंतर वसाहतधारकांकडून गेल्या २५ वर्षात पुन्हा मालमंत्ताकरापोटी कोट्यावधीची माया जमा केली. मात्र विकासाच्या नावाने बोंबाबोंब आहे. धड चालायला रस्ते नाहीत. उषाशी जलकुंभ असताना आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नाही. दिव्याखाली अंधार आहे.

रहिवाशांचा संताप; सभापती आक्रमक

मनपा आणि विकासकाला दायित्त्वाचा विसर पडल्यानंतर येथील विष्णू पालखेडकर, विजय देशमुख, अमृत खाबीया, पंकज शहा,  प्रवीन पांडे या नागरिकांनी एकत्र येत येथे ग्रीन बेल्ट व उद्यान विकास समिती स्थापन केली. त्यात वसाहतधारकांकडुन पाच ते सहा लाख रूपये निधी जमा केला. त्यातून उद्यानासह ग्रीन बेल्टला सुरक्षाभिंतीचे बांधकाम केले. पाण्याचा बोअर घेतला. गेल्या पंधरा वर्षात लोकसहभागातून येथे भारतीय वंशावळीसह वनौषधींची जवळपास तीन ते चार हजार झाडांचा मोठा ऑक्सिजन हब तयार केला. झाडांची निगा राखण्यासाठी चार हजार रूपये महिन्याचा माळी कायमस्वरूपी कामाला लावला.मात्र  त्यापैकी पंपगृहासाठी मजीप्राने ग्रीनबेल्टमधील शेकडो झाडांची जेसीबीने कत्तल केल्यानंतर उद्यानात जलकुंभासाठी जागेची मोजणी करण्यात आली. या प्रकारानंतर येथील रहिवाशांचा संताप उफाळून आला आहे.

सिडकोची एनओसी न घेता कारभाऱ्यांचा प्रताप

औरंगाबादेत नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ५३ जलकुंभांचे बांधकाम प्रस्तावित आहे. यापैकी केवळ ३५ जलकुंभासाठी मनपाने मजीप्राला जागा उपलंध्ध करून दिल्या आहेत. त्यात केवळ ११ जलकुंभांचे बांधकाम सुरू आहे. उर्वरीत जलकुंभांच्या बांधकामांचा पाया देखील खोदण्यात आलेला नाही. धक्कादायक म्हणजे सिडको-हडकोत खुल्या जागा, क्रीडांगणे, उद्याने, ग्रीनबेल्टच्या आरक्षित जागांवर बेकायदा जलकुंभांची बांधकामे सुरू आहेत. यापैकी एका पर्यावरनप्रेमीने सिडको एन - १ मधील ग्रीन बेल्टच्या जागेवर अनधिकृतपणे जलकुंभ उभारणीसाठी खड्डा खोदताना संबंधित विभागांकडे धाव घेतली. त्यात सिडकोच्या ना-हरकतीशिवाय काम होत असल्याचे समोर आले. त्यानंतर सिडकोने देखील अद्याप ना-हरकत दिलेली नाही.परिणामी हे काम थांबलेले आहे. मग इतर जागेवर सिडकोच्या ना-हरकतीशिवाय  जो त्यापर्यंत काही जलकुंभांची बांधकाम झालेली आहेत.  आता सिडको ही बांधकामे पाडणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोर्टात न्याय मिळेल

लोकांची तहान भागवण्यासाठी काम करणाऱ्या मजीप्राने अशा पद्धतीने लोकांची फसवणूक व झाडांची कत्तल करून पर्यावरणास हानी पोहोचवने हे दुर्देव आहे. गारखेड्यासह शहरात कोणत्याही वसाहतीत इतका स्वच्छ आणि सुंदर ऑक्सिजन हब येथील रहिवाशांनी स्वखर्चातून  केला आहे. जलकुंभ व पंपगृह उभारणीला येथील रहिवाशांनी आक्षेप घेतला असून त्याबाबतच्या तक्रारी मनपा प्रशासक व मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यांकडे करण्यात आल्या आहेत. निर्णय न बदलल्यास शिवसेना स्टाइलने धडा शिकवणार. या प्रकरणात न्याय मिळावा, यासाठी कोर्टातही धाव घेतली आहे. आम्हाला नक्कीच न्याय मिळेल.

- रेणूकादास उर्फ राजु वैद्य, माजी स्थायी समिती सभापती, मनपा, औरंगाबाद