Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad : बीड बायपासवरील 'त्या' सदोष पुलाची पाहणी;उद्या सुनावणी

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : बीड बायपासवरील संग्रामनगर चौकातील सदोष उड्डाणपूलाचा प्रकार 'टेंडरनामाने' सर्वप्रथम उजेडात आणला. सरकारचा पैसा वाचला असे कारण पुढे करत पीडब्लुडी अंतर्गत जागतिक बँक प्रकल्प शाखेतील अभियंत्यांनी पुलाची उंची कमी केल्याने भविष्यात अपघातासाठी ब्लॅक स्पाॅट होऊन हा पूल असून अडचण नसून खोळंबा ठरणार असल्याचे तज्ज्ञांच्या पाहणीसह औरंगाबादकरांसमोर मांडले. वृत्तमालिकेची दखल घेत  कोर्टाच्या सूचनेनंतर याचिकाकर्ता ॲड. रूपेश जैस्वाल यांनी रविवारी सातारा-देवळाईतील नागरिकांसोबत या सदोष पुलाची पाहणी केली. सोमवारी (ता. २३) त्यावर सुनावणी होणार आहे. आता कोर्टाच्या निर्णयाकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागून आहे.

शुक्रवारी (२० जानेवारी) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ॲड. रूपेश जैस्वाल यांनी शहरातील रस्ते, उड्डाणपूल, शिवाजीनगर भुयारी मार्गाबाबत दाखल याचिकेवर सुनावणी प्रसंगी न्या. रविंद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी बीड बायपास रस्त्यातील उड्डाणपूलाखाली खोदकाम केले काय, अशी विचारणा सरकारला केली. यावेळी पार्टी इन पर्सन याचिका दाखल करणारे ॲड. रूपेश जैस्वाल यांनी प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि छायाचित्र दाखवत कोर्टासमोर सत्यस्थिती लक्षात आणून दिली.

त्यानंतर पुलाचे असे सदोष डिझाईन करणाऱ्या या अभियंत्यांना आता कोणता राष्ट्रीय पुरस्कार द्यायला हवा, असा टोला मारत कोर्टाने संताप व्यक्त केला होता. यावर आता २३ जानेवारी रोजी पुढील सुनावणी दरम्यान पूलाखालील खोदकामाचे छायाचित्र सादर करा, असे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानुसार रविवारी याचिकाकर्ता रूपेश जैस्वाल यांनी जनसेवा कृती समितीचे बद्रिनाथ थोरात, रामदास मनगटे, रविंद्र वाघ, शिवाजी जाधव, नाना पांढरे, भगवान चव्हाण, दिपक सुर्यवंशी, गोरखनाथ पवार, दिलीप पाळंदे यांच्यासमक्ष पूलाची पाहणी केली. यावेळी कोर्टाने या सदोष पूलाचे काम तातडीने थांबवावे, पूलाची उंची वाढवावी, आमदार रोडसमोरून देखील प्रवेश द्यावा, संग्रामनगर चौकात पूलाची लांबी वाढवावी, आधीच्या टाॅपलेव्हलपासूनच पूलाची उंची वाढवावी अशी मागणी याचिकाकर्ता जैस्वाल यांच्याकडे केली. दरम्यान पावसाळ्यात पाण्याचा निचरा होईपर्यंत पूलात अडकून पडावे का , असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला.

काय म्हणाले तज्ज्ञ

यावेळी इंजिनियर दिलीप सुर्यवंशी यांनी जैस्वाल यांच्यासह पूलाची पाहणी करताना ज्यावर संपूर्ण पूलाचा भार ठेवण्यात आला आहे , त्या आडव्या बीमला सपोर्ट करणारे उभे बीम खोदकामामुळे उघडे पडल्याने पुलाच्या बांधणीला भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. उभ्या बीमला सपोर्टेड फुटींग आणि काँक्रिट बुडापासून तोडले जात असल्याने धोका वाढल्याचे ते म्हणाले. संग्रामनगर आणि दर्गाचौक पुलाखालील सपोर्टेड उभ्या बीमचे काँक्रिट जमीनस्तरापासून वर आहे. प्रचंड मोठ्या वस्तीत जाणाऱ्या आमदाररोड वरच्या दिशेने गेला. त्याला जोडणारा बीडबायपास खड्ड्यात गेला. आमदाररोडला बीडबायपासला जोडण्यासाठी एकाच सरळ रेषेत पर्यायी मार्ग हवा होता. आता सर्व बाजूने येणारी वाहतूक एकाच मार्गावर होणार असल्याने चुकीच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढेल, वाहतूक कोंडी होईल असे त्यांनी ठामपणे सांगितले. कमी उंचीचा पूल बांधला आता चूक झाकण्यासाठी खोदकाम त्यात पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत गटार हा अनावश्यक खर्च कशासाठी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.